ठाणे: ( Sanjay Vaghule on illegal constructions ) डोंबिवली आणि दिवा येथील ११९ इमारतींमधील रहिवासी बेघर होण्याच्या भीतीने हवालदिल झाले आहेत. ठाणे शहरात वेगाने सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर तातडीने अंकुश ठेवावा. तसेच, रहिवासी राहत नसलेल्या आणि बांधकामे सुरू असलेल्या इमारती तातडीने पाडाव्यात, अशी मागणी भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
डोंबिवली येथील ६५ इमारती उभारताना बिल्डरांनी बनावट कागदपत्रे सादर करून ‘महारेरा’ क्रमांक मिळविला. तर, दिवा परिसरात १७ वर्षांपूर्वी उभारलेल्या ५४ इमारतींवरही टांगती तलवार आहे. या प्रकारात संबंधित इमारती उभारणारे बिल्डर परागंदा झाले आहेत. जमीन मालकांनी नामानिराळे राहण्याचा प्रयत्न केला. तर, महापालिकेचे संबंधित साहाय्यक आयुक्त आणि प्रभाग अधिकार्यांना कारवाईची झळ पोहोचलेली नाही. त्यामुळे या बेकायदा बांधकामांमध्ये घर घेणार्या सामान्य कुटुंबांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे. याकडे संजय वाघुले यांनी लक्ष वेधले. बेकायदा बांधकामांप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेने साहाय्यक आयुक्तांना निलंबित केले. मात्र, ठाणे महापालिकेने अद्यापी कोणत्याही अधिकार्यावर कारवाई केलेली नाही. यापूर्वी आयुक्तांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर बेकायदा बांधकामे थांबविण्याची सूचना देणार्या तत्कालीन महिला साहाय्यक आयुक्तांनाही बदली करून कारवाई टाळली गेली, अशी आठवण संजय वाघुले यांनी आयुक्तांना पत्रात करून दिली आहे.
मुद्रांक शुल्क विभागाला माहिती द्यावी
गेल्या काही वर्षांपासून सामान्य मध्यमवर्गीय नागरिकांना सातत्याने बेकायदा बांधकामांचा फटका बसला आहे. त्यामुळे सुरू असतानाच बेकायदा बांधकामांवरच हातोडा टाकण्याची गरज आहे. ज्या इमारतीत कोणीही राहत नाहीत, अशा बेकायदा इमारती आणि सुरू असलेली बांधकामे पाडून टाकावी. तसेच, बेकायदा बांधकामे असल्याबाबत घरे खरेदी करू नयेत, असे फलक लावावे. या इमारतीतील घरांचे रजिस्ट्रेशन होऊ नये, यासाठी मुद्रांक शुल्क विभागाला माहिती द्यावी, अशी मागणी संजय वाघुले यांनी केली आहे. त्यामुळे सध्या डोंबिवली आणि दिवा येथील नागरिकांप्रमाणेच भविष्यात होणारी सामान्य नागरिकांची फरपट टाळावी, असे वाघुले यांनी पत्रात म्हटले आहे.
बेकायदा बांधकामांना आशीर्वाद कोणाचा?
ठाणे महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांबाबत बीट मार्शलकडून संबंधित प्रभाग अधिकारी, साहाय्यक महापालिका आयुक्तांना माहिती कळविण्यात आली. मात्र, त्यानंतरही संबंधित बेकायदा बांधकामांना अभय देण्यात आले. त्यामुळे या बेकायदा बांधकामांना आशीर्वाद कोणाचा आहे, असा सवाल जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केला आहे.