धक्कादायक , ऑस्ट्रेलियन जोडप्याला १४ तास मृतदेहाशेजारी बसवलं
कतार एअरवेज कडून केले गेले खंडन
01-Mar-2025
Total Views |
नवी दिल्ली : कतार एअरवेजच्या विमानात एका ऑस्ट्रेलियन जोडप्याला तब्बल १४ तास मृतदेहाशेजारीच बसायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मेलबोर्न ते दोहा कडे जाणाऱ्या विमानात ही घटना घडल्याचे समोर आले आहे. ऑस्ट्रेलियन जोडप्याच्या म्हणण्यानुसार या महिलेचा मृत्यू हा विमान प्रवासादरम्यान झाला होता आणि विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्याला झाकून ठेवण्यापलीकडे कुठलीच कारवाई केली नाही. त्या मृतदेहाला त्यांनी बिझनेस क्लासमध्ये हलवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरल्यामुळे त्यांनी तिथेच आसनावर त्या मृतदेहाला ठेवून दिले. रात्रभर पूर्ण प्रवास या जोडप्याला त्या मृतदेहाशेजारीच बसून करावा लागला.
कतार एअरवेज कडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगल्या पध्दतीने हाताळली असून, प्रवाशांना तात्काळ वेगळ्या आसनाची सुविधा उपलब्ध करुन दिली गेली आणि कर्मचारी रात्रभर म्हणजे दोह्यापर्यंतचा प्रवास संपेपर्यंत मृतदेहाच्या बाजूलाच बसून होते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
यानिमित्ताने हवाई प्रवास आणि त्यामध्ये घेतली जाणारी प्रवाशांची सुरक्षा हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.