मुंबई,दि.८: प्रतिनिधी म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालय घराचा ताबा घेण्यासह विविध कामांसाठी तान्ह्या बाळाला सोबत घेऊन येणाऱ्या महिलांची अनेकदा अडचण होते. स्तनपान वा बाळाच्या आरामासाठी जागा नसल्याने त्यांची गैरसोय होते. आता मात्र त्यांची ही गैरसोय आता दूर झाली आहे. वांद्रे येथील म्हाडा भवनात सुसज्ज असे हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने सार्वजनिक, निमसार्वजनिक, संस्थात्मक, शैक्षणिक व तत्सम इतर वापराच्या इमारती ज्या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात काम करतात, अशा इमारतींमध्ये "हिरकणी कक्ष" स्थापन करणे बंधनकारक केले आहे. याच पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबईतील वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात "हिरकणी कक्ष" उभारण्यात आला आहे. स्तनदा माता, गरोदर महिला, नवजात बालकांच्या माता यांना सुविधा देण्यासाठी हा कक्ष वांद्रे म्हाडा भवनाच्या प्रांगणात उभारण्यात आला आहे.
या कक्षात बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र खोली, या खोलीत आकर्षक खेळणी, टीव्ही आणि आकर्षक फर्निचर बनविण्यात आले आहे. यासोबतच महिलांना आराम करण्यासाठी २ पलंगही आहेत. यासोबतच शुद्ध आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधाही कक्षात करण्यात आली आहे. तसेच, या कक्षात सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिनही बसविण्यात आले आहे.