उत्तर प्रदेश - मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा विजय
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रणनितीस यश
08-Feb-2025
Total Views |
नवी दिल्ली : (Milkipur Bypoll Election Results 2025) अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपने विजय प्राप्त केला असून समाजवादी पक्षाचा (सपा) पराभव झाला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून सपाचे अवधेश प्रसाद विजयी झाले होते. या विजयाचे चित्र सपाने ‘भाजपचा अयोध्येत पराभव’ असे रंगविले होते. हा पराभव भाजपलाही चांगलाच जिव्हारी लागला होता. येथून विजयी झालेले अवधेश प्रसाद हे मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. लोकसभेतील विजयानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर हा विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला होता.
फैजाबाद लोकसभेतील पराभव पुसून काढण्यासाठी भाजपने मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीस अतिशय गांभीर्याने घेतले होते. खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूकीची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री योगी सतत अयोध्येला भेट देत होते. मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणूक लक्षात घेऊन, त्यांनी अर्धा डझनहून अधिक वेळा भेट दिली. यावेळी विकास योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. त्याचा परिणाम निवडणूक निकालांवर दिसून येतो. भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे आणि बूथ पातळीवरील व्यवस्थापनाचे काम केले, त्याचा परिणाम दिसून येतो.
अखिलेश यादव यांच्यासमोर आता सर्वात मोठी चिंता म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये विश्वास पुन्हा प्रस्थापित करणे. नुकत्याच झालेल्या ९ पैकी ७ पोटनिवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर, अखिलेश यादव यांच्यावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता हा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.