तपस्विनी

    07-Feb-2025
Total Views |

pta. maneesha sathe
आज ‘स्वर्णवंदना’ या कथ्थक नृत्य कार्यक्रमाचे भव्य आयोजन होत आहे. ज्यांच्या प्रेरणेतून, मार्गदर्शनातून ही वंदना दिली जात आहे, त्या तपस्विनी ‘नृत्यार्पिता’ पं. मनीषा साठे यांच्याविषयी...
च्या दशकात साधारणतः पं. बाळासाहेब गोखले यांच्याकडे एक लहान मुलगी नृत्य शिकण्यास दाखल झाली. जसा संगीत हा माणसाच्या आनंदाचा अविभाज्य भाग, तसेच नृत्याचेदेखील. त्याला हवी तशी समाजमान्यता दुर्दैवाने नसली, तरी जे दर्दी आहेत, त्यांनी अशा नृत्यातून जीवनात आनंदाची लय, नजाकत अबाधित ठेवली. किंबहुना, अशा दर्दींमुळेच पं. मनीषा साठे नृत्यगुरूपर्यंत वाटचाल करू शकल्या आणि त्यांनी नृत्यप्रेमींसाठी आपले जीवन समर्पित केले. आज त्यांच्या पिढीतील सदस्य त्यांच्या अविरत कारकिर्दीचा गौरव म्हणून ‘स्वर्णवंदना’ सादर करीत आहेत. खरेतर ही त्यांच्या कारकिर्दीची खरी दाद आहे, असे म्हणता येईल.
 
नृत्यांगना आणि नृत्यगुरू असलेल्या मनीषा साठे यांनी पुण्यात पं. बाळासाहेब गोखले यांच्याकडे शिक्षण घेतले. नंतर त्या पं. गोपीकृष्ण यांच्याकडे मुंबईत शिक्षणासाठी रूजू झाल्या. त्यानंतर मग त्यांची कारकीर्द बहरतच गेली. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ‘सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव’, ‘खजुराहो नृत्य महोत्सव’, ‘शनिवारवाडा नृत्य महोत्सव’, ‘लखनऊ नृत्य महोत्सव’, गोहत्ती येथील ‘कामाख्या महोत्सव’, मुंबईमधील ‘नेहरू सेंटर’ आणि ‘टाटा थिएटर’ अशा भारताच्या विविध ठिकाणी कथ्थक नृत्य सादर केले आहे. तसेच, भारताबाहेर अमेरिका, चीन, बहारीन, स्वित्झर्लंड, स्वीडन इ. देशांत त्यांनी कार्यक्रम केले आहेत. कथ्थक नृत्यात आधुनिक संगीत आणि विश्वसंगीताचा वापर हे त्यांची वैशिष्ट्ये. त्यांनी चक्क जपानी संगीताच्या तालावरही कथ्थक सादर केले आहे. जपानी संगीतकार आणि ताईको वादक यासुहितो ताकीमोतो यांच्याबरोबर त्यांनी गेल्या १५ वर्षांत अनेक ‘फ्युजन’ मैफली सादर केल्या आहेत. त्या पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र, पुण्यातील भारती विद्यापीठ व अहिल्यानगर येथील ‘व्हिडिओकॉन अकादमी’ येथे अभ्यागत प्राध्यापिका म्हणून शिकवतात. पुणे विद्यापीठात ‘पीएचडी’साठीच्या मार्गदर्शक आहेत. त्यांची कन्या आणि शिष्या शांभवी दांडेकर हीदेखील कथ्थक नृत्यांगना आहे.आजचा पुण्यातील ‘स्वर्णवंदना’ कार्यक्रम हा त्यांनीच आयोजित केला आहे. त्यांची स्नुषा तेजस्विनी साठे ही मनीषा साठे यांचा वारसा चालवत आहे. आपल्याकडे शिकलेल्या पुण्यातील २५ मुली स्वतःचे नृत्यवर्ग घेतात. जगभरात माझ्या शिष्यांच्या ४० संस्था आहेत, असे त्या अभिमानाने सांगतात. विशेष म्हणजे, त्यांची नात परमेश्वरी आणि बहिणीची नात आलापी जोग या त्यांच्या पुढील पिढीतील नृत्याची आराधना करणार्‍या ही परंपरा पुढे नेतील, असा विश्वास त्यांना वाटतो.
 
“माझ्या दृष्टीने सहृदय कलाकारांनी असे एकत्र राहणे, एकमेकांना तत्परतेने मदत करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे,” असे पं. मनीषा साठे यांना वाटते. “नृत्यासाठी दृष्यसेन निर्माण होण्याची गरज आहे,” असे त्या म्हणतात. नव्या पिढीला अजूनही शास्त्रीय नृत्याबाबत रस नाही, याबद्दल खेदही त्या व्यक्त करतात. तथापि, आपल्या या भारतीय संस्कृतीच्या वैभवास टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. “विशेष म्हणजे, जगात कुठेच नाहीत. मात्र, केवळ भारतातच नऊ नृत्यशैली आहेत, असा अभिमान आपल्याला भारतीय म्हणून वाटलाच पाहिजे,” असेही त्या आग्रहाने सांगतात. रसिकाश्रयाशिवाय नृत्याची खरी शोभा नाही.
 
मनीषा साठे यांनी ‘सरकारनामा’ आणि ‘वारसा लक्ष्मीचा’ यांसह अनेक चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन म्हणून काम केले आहे. ‘महाराष्ट्र राज्य पुरस्कार’ आणि ‘अल्फा टीव्ही पुरस्कार’ सोहळ्यात त्यांना ‘सर्वोत्तम नृत्य दिग्दर्शकाचा पुरस्कार’ मिळाला आहे. साठे या ‘मनीषा नृत्यालय ट्रस्ट’ या नावाची कथ्थक नृत्याचे शिक्षण देणारी संस्था चालवतात. त्यांच्या अनेक विद्यार्थिनींना भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याची शिष्यवृत्ती मिळाली आहे. ‘सारंग सन्मान’, ‘महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार २००६’, ‘गानवर्धनचा विजया भालेराव पुरस्कार’, ‘सिटाडेल एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘श्री. गोळवलकर गुरूजी पुरस्कार’, ‘अजित सोमण स्मृती पुरस्कार’, ‘अशोक परांजपे पुरस्कार’, पुणे महापालिकेचा ‘पं. रोहिणी भाटे पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. “ज्या कलाकाराकडे खरे आत्मिक सौंदर्य असते, तोच बाह्य जगापर्यंत आपली कला अधिक सुंदर पद्धतीने पोहोचवू शकतो. मी नृत्य कलेची अशीच अखंड सेवा करत राहीन. गेली ६४ वर्षे मी नृत्याला दिली,” असे त्या अभिमानाने सांगतात. “मनीषा नृत्यालयाच्या नृत्य प्रशिक्षणाला ५० वर्षे पूर्ण झाली, यामागे गुरू पं. गोपीकृष्ण, आईवडील, गुरू यांचे आशीर्वाद आहेत. रसिकांच्या सदिच्छा आहेत. शिष्यांनी नृत्य सादर करताना वा नृत्यरचना करताना, पूर्वी स्वतः वा दुसर्‍याने केलेल्या रचना वा विचारांची पुनरावृत्ती करू नये, तर प्रत्येक वेळी नवनवीन विचार, कथा, संकल्पना याद्वारे नृत्यरचना नावीन्यपूर्ण सादर करावी, अशी माझी अपेक्षा असते,” असेही त्या नमूद करतात. विशेष म्हणजे, सिनेमातील नृत्य म्हणजे नृत्य नव्हे, असे परखड मत त्या आजही मांडतात. नृत्यातून नवोन्मेष प्रकट व्हावे आणि त्यासाठी परिश्रम घ्यावे, अशी त्यांची मनीषा आहे. एखाद्या तपस्वीप्रमाणे आपले आयुष्य या नृत्यकलेस वाहवून घेतले, अशा या तपस्विनीस दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
 
 अतुल तांदळीकर 
 
(अधिक माहितीसाठी संपर्क : ९८८११२९४९४)