नवीन नॅरेटिव्ह तयार करण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
07-Feb-2025
Total Views |
नागपूर : दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्याने निकालाच्या दिवशी काय बोलावे यासाठी नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर आणि ईव्हीएमवर आपल्या पराभवाचे खापर फोडले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत यावर प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "विधानसभा निवडणूकीतील मतदानाबाबत निवडणूक आयोगाने सविस्तर उत्तर दिले आहे. किती मतदार वाढले, ते कसे आणि कुठे वाढले हे सगळे त्यांनी सांगितले आहे. आता ८ तारखेला दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत राहुल गांधींच्या पक्षाचे नामोनिशान संपणार असून त्यांचा प्रचंड मोठा पराभव होणार आहे. त्यामुळे या पराभवाचे कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. निकालाच्या दिवशी काय बोलायचे आणि नवीन नरेटिव्ह कसा तयार करायचा, याचा ते प्रयत्न करत आहेत. परंतू, जोपर्यंत राहुल गांधी आत्मचिंतन करणार नाही आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील तोपर्यंत त्यांना जनतेचे समर्थन कधीच मिळणार नाही," असे ते म्हणाले.