छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन, दिवस १५: विकी कौशलच्या चित्रपटाने जगभरात कमावले 'इतके' कोटी!

    28-Feb-2025
Total Views |




chavva box office collection day 15


मुंबई : विकी कौशलचा छावा बॉक्स ऑफिसवर धडाक्यात कमाई करत असून १५ दिवस उलटूनही त्याच्या गतीत कोणतीही घट दिसून येत नाही. या ऐतिहासिक महाकाव्याने संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीत जोरदार प्रभाव पाडला असून, तगडी कमाई करत आपल्या यशाची मोहोर उमटवली आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, संभाजी महाराज यांच्या थरारक प्रवासावर आधारित आहे, जिथे ते शक्तिशाली मुघल सम्राट औरंगजेब यांच्या विरोधात उभे राहतात. दमदार अभिनय, नेत्रदीपक दृश्ये आणि प्रभावी कथानक यामुळे छावा प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. या चित्रपटात विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर रश्मिका मंदान्ना यांनी त्यांच्या पत्नी येसूबाई भोसले यांची भूमिका साकारली आहे. तसेच अक्षय खन्ना औरंगजेब यांच्या भूमिकेत खलनायक म्हणून झळकतात. सहायक भूमिकांमध्ये डायना पेंटी, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा दिसत आहेत.

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन – दिवस १५
छावा च्या दुसऱ्या शुक्रवारी (दिवस १५) देखील हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. या वृत्ताच्या लिखाणाच्या वेळी चित्रपटाने सुमारे ३.०४ कोटी कमावले आहेत. याने आपल्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ३१ कोटी, तर दुसऱ्या दिवशी ३७ कोटी ची दमदार कमाई केली.

तिसऱ्या दिवशी हा चित्रपट ४८.५ कोटी च्या कमाईसह आतापर्यंतच्या सर्वाधिक एका दिवसाच्या कमाईपर्यंत पोहोचला. प्रथम आठवड्यात एकूण २१९.२५ कोटी ची भरघोस कमाई करत छावा ने प्रेक्षकांना आकर्षित केले. आतापर्यंत हा चित्रपट ४०२.५४ कोटी च्या घरात पोहोचला आहे आणि त्याची कमाई अद्यापही वेगाने सुरू आहे. दोन आठवड्यांतच छावा चा जगभरातील एकूण गल्ला ५६६.०२ कोटी वर पोहोचला आहे.