साकीनाका येथील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई!
27-Feb-2025
Total Views | 57
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एल विभाग हद्दीत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी धडक कारवाई करण्यात आली. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एल विभाग हद्दीततील निष्कासित करण्यात आलेल्या बांधकामांमध्ये अंतर्गत भिंत, अनधिकृत मजले, अनधिकृत बांधकाम यांचा समावेश आहे. यासोबतच हॉटेल्स, विश्रामगृह (डॉर्मेटरी) आणि औद्योगिक परिसरातील बांधकामांवरही ही कारवाई करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत, वाढीव बांधकामांवर सातत्याने निष्कासन कार्यवाही सुरू असून यापुढेदेखील ही कारवाई निरंतरपणे सुरू राहणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
कोणत्या इमारतींवर कारवाई?
एल विभागात साकीनाका येथील सफेद पूल येथील औद्योगिक परिसरात अनधिकृतपणे उभारलेले हॉटेलसाठीचे वाढीव बांधकाम आणि अंतर्गत भिंतीचे पाडकाम करण्यात आले. तसेच साकीनाका येथील ९० फूट मार्गावरील दोन विश्रामगृहांचे (डॉर्मेटरी) मजले, साकीनाका (असल्फा मेट्रो स्थानक) येथील १८ खोल्या असलेली इमारत आणि ४० खोल्या असलेली अनधिकृत हॉटेल इमारत आदींवर निष्कासन कारवाई करण्यात आली आहे.