मराठी चित्रपटसृष्टीचा विस्तार आणि भाषासंवर्धनातील जबाबदारी

    27-Feb-2025
Total Views |
 
Responsible for expansion of Marathi film industry and language conservation
 
(Marathi film industry) मराठीचा भविष्यवेध घेताना, मराठी चित्रपटसृष्टीचा विचार करणे हे क्रमप्राप्तच. तेव्हा, प्रेक्षकांची पावले मराठी चित्रपटांकडे वळावी, म्हणून नेमके काय करता येईल? चित्रपटांच्या संवादातून मराठी भाषा कशी जिवंत ठेवता येईल? यांसारख्या मुद्द्यांवर ऊहापोह करणारा अभिनेते, लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण यांचा हा लेख...
 
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत विषयांचे वैविध्य आणि तांत्रिक प्रगती मोठ्या प्रमाणावर दिसून येते. मात्र, मराठी चित्रपटसृष्टीसमोर काही महत्त्वाचे अडथळे आहेत, मुख्यतः अल्प बजेट आणि प्रेक्षकांचा तुलनेने मिळत असलेला कमी प्रतिसाद.मराठी चित्रपट मोठ्या प्रमाणावर निर्मिले जात असले, तरी त्यांची निर्मिती साधारणतः अल्प बजेटमध्ये केली जाते. त्यामुळे उच्च तांत्रिक गुणवत्ता राखूनही निर्मात्यांना मर्यादा भासतात. शिवाय, मोठ्या प्रमाणात प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांना पसंती देत नाहीत. हिंदी चित्रपट आणि इतर भाषांतील चित्रपटांकडे ओढा वाढल्यामुळे, मराठी चित्रपटांच्या संख्येवर आणि व्यवसायावर परिणाम होतो. मराठी चित्रपटसृष्टीत विषयांची मोठी विविधता आहे. कारण, मराठी साहित्य तेवढे समृद्ध आहे.
 
मराठी चित्रपटांना मर्यादित प्रेक्षकसंख्या हे मोठे आव्हान आहे. मला अनेकदा विचारले जाते की, मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे का वळत नाहीत? त्याचे एकमेव कारण म्हणजे, हिंदी चित्रपटांकडे असलेला ओढा! हिंदी सहज समजते, त्यामुळे बहुतांश मराठी प्रेक्षक हिंदी चित्रपटांना अधिक प्राधान्य देतात. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीच्या तुलनेत मराठी आणि हिंदी चित्रपट मागे राहतात. याचे मुख्य कारण म्हणजे, तिथल्या प्रेक्षकांची मातृभाषेबद्दल असलेली निष्ठा. तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांना त्यांच्या प्रेक्षकसंख्येचा मोठा आधार आहे. त्याउलट, मराठी प्रेक्षक हिंदी चित्रपटांना प्राधान्य देतात. जर प्रत्येक मराठी प्रेक्षकाने वर्षाला किमान दोन मराठी चित्रपट चित्रपटगृहात पाहण्याचा संकल्प केला, तर त्यांच्यामध्ये मराठी चित्रपटाची गोडी निर्माण होईल. आजघडीला मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये मर्यादित स्क्रीन उपलब्ध होतात. त्यातही हिंदी किंवा इंग्रजी चित्रपटांना जास्त प्राधान्य दिले जाते. यावर उपाय म्हणून अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी मांडलेली संकल्पना अतिशय उपयोगी ठरू शकते. त्यांनी मध्यंतरी एक कल्पना सुचवली होती की, रिकाम्या पडणार्‍या नाट्यगृहांचा उपयोग चित्रपटगृह म्हणून करावा. संध्याकाळच्या नाटकाशिवाय दिवसभर नाट्यगृहे रिकामी असतात. त्या ठिकाणी मोठ्या स्क्रीन लावून मराठी चित्रपटांचे नियमित प्रदर्शन करता येऊ शकते.
 
पूर्वी ‘विजयानंद थिएटर’मध्ये अशाच पद्धतीने नाटक आणि चित्रपट दोन्ही दाखवले जात होते. जर महानगरपालिकेची नाट्यगृहे मराठी चित्रपटांसाठी अनुदानित दराने उपलब्ध करून दिली, तर चित्रपटसृष्टीला हक्काचे व्यासपीठ मिळू शकते. त्याचबरोबर, या नाट्यगृहांमध्ये मिळणार्‍या उत्पन्नाचा उपयोग त्या ठिकाणांच्या देखभालीसाठी होऊ शकतो.
 
मराठी चित्रपटांना योग्य न्याय मिळावा, यासाठी त्यांचे स्वतंत्र चित्रपटगृह असणे गरजेचे आहे. मराठी चित्रपटांची निर्मिती उत्तम झाली, तरी त्याच्या योग्य वितरणाशिवाय ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे सरकारने एक प्रभावी वितरण व्यवस्था निर्माण करावी, जेणेकरून चित्रपट लहान शहरांपर्यंत सहज पोहोचतील. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर ते समाजाच्या भाषिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे चित्रपटातील संवाद हे वास्तवदर्शी आणि प्रेक्षकांशी जोडणारे असायला हवे. चित्रपटाचा विषय आणि कालखंड यानुसार संवाद आणि भाषा ठरतात. उदाहरणार्थ, जर संत तुकाराम महाराज किंवा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर आधारित चित्रपट असेल, तर त्यांच्या काळातील भाषा आणि बोली अभ्यासून संवाद लिहिले पाहिजे. त्याउलट, जर चित्रपटाची कथा आजच्या तरुण पिढीभोवती फिरणारी असेल, तर संवाद त्यानुसार असायला हवेत, ज्यात काही प्रमाणात इंग्रजीमिश्रित मराठी वापरले जाते. मात्र, कुठलाही संवाद अतिशय सहज आणि नैसर्गिक वाटला पाहिजे.
 
 मी स्वतः कायमच सांगत असतो की, चित्रपटातील संवाद शक्य तितक्या प्रमाणात मराठीत असावे. मात्र, ते कृत्रिम किंवा जडजंबाल भाषेत नसावे. संवाद असे असावे की, ते सहज बोलता आणि समजता यायला हवेत. मराठी भाषा तरुण पिढीपर्यंत पोहोचवायची असेल, तर ती त्यांना समजण्यास सोपी आणि कानाला श्रवणीय वाटली पाहिजे.
 
मराठी चित्रपटसृष्टीला यशस्वी बनवण्यासाठी तीन प्रमुख घटक महत्त्वाचे आहेत निर्माते, प्रेक्षक आणि सरकार. जर या तिन्ही घटकांनी एकत्र येऊन आपल्या जबाबदार्‍या पार पाडल्या, तर मराठी चित्रपट अधिक व्यापक प्रमाणात लोकप्रिय होऊ शकतो. उत्तम कथानक, तांत्रिक प्रगती, प्रभावी वितरण आणि प्रेक्षकांचा पाठिंबा मिळाल्यास, मराठी चित्रपटसृष्टी अधिक भक्कम होईल आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक दृढपणे उभी राहील, हे माझे प्रामाणिक मत! 
 
- योगेश सोमण