यावर्षी महाशिवरात्र स्वा. सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी साजरी होत आहे. महाशिवरात्री हा शिव आणि शक्ती यांच्या संगमाचा क्षण! शिव म्हणजे उपशम आणि शक्ती म्हणजे व्युत्थान! अशा या दोन अनादी तत्त्वांचा विवेक जे आयुष्यभर वैयक्तिक आणि राष्ट्रीय जीवनात करीत राहिले आणि आपले कार्य झाल्यावर, त्या परब्रह्माशी ऐक्य पावून जे कृतार्थ झाले, ते तीर्थरूप, शिवस्वरूप म्हणजे विनायक दामोदर सावरकर!
आपल्या संस्कृतीला पूर्णत्व देणारी अशी काही तत्त्वे उपजतच लाभली आहेत. सगळ्यांना आपलेसे करून घेण्याची वृत्ती, वेळेप्रसंगी कठोरता पत्करूनही दुसर्याचे हित करण्याचा मनाचा निग्रह! या दैवी संपदा ज्या महापुरुषांनी आपल्या संस्कृतीला देत तिला चारित्र्यसंपन्न केले, वेळोवेळी ज्यांनी अतिशय प्रतिकूलतेत जगून काळावर जणू धृतीचा अभिषेक केला, त्यातले अग्रगण्य चरित्र ते म्हणजे सावरकरांचे! म्हणूनच की काय, शंकरांनी असे अलौकिक व्यक्तिमत्त्व घडवून, पुढच्या सहस्र वर्षांसाठी आम्हा हिंदूंसाठी आणि पर्यायाने जगासाठी सावरकररूपी पाठ्यपुस्तकाची सोय केल्याचे दिसते.
उत्क्रांती मार्गातले एक महत्तम तत्त्व म्हणजे ‘शिवो भूत्वा शिवं यजेत्’ हे! उपासना कुठलीही असो, ती करण्यासाठी त्या गोष्टीचे उप आसन आपण बनले पाहिजे, असे सावरकरांचे मत. त्याचा आधार हा पाहा! महाभारतात युद्धांती ज्यावेळी भयंकर ब्रह्मास्त्रांचा प्रयोग झाला, त्यावेळी श्री व्यास आणि नारद यांनी मध्ये येऊन, अर्जुन आणि अश्वत्थामा यांना आपापली ब्रह्मास्त्रे मागे घेण्याची आज्ञा केली. त्यावेळी फक्त अर्जुन ते मागे घेऊ शकला. याचे कारण, अर्जुनाने उपासना ही तत्त्वरूप शिवाची केली होती आणि अश्वत्थामा हा शंकराला व्यक्ती मानून पूजत असे! (महाभारत सौप्तिक पर्व) व्यक्तिपूजा आणि तत्त्वपूजा यामध्ये, तत्त्वपूजा श्रेष्ठ सांगणारी ही दिव्य कथा. अर्जुन शंकराला तत्त्वरूप जाणत होता. त्याने ब्रह्मतत्त्व खर्या अर्थाने जाणले होते. त्याचे उप आसनच झाला होता. खरोखरच तत्त्वरूप उपासक, चाणक्य म्हणतो त्याप्रमाणे समदर्शी बनतो आणि सर्वत्र त्या शंकराचे रूपच त्यांना दिसू लागते. सावरकर असेच समदर्शी होते.
फक्त समदर्शी असणे म्हणजे स्वतःस फसवून घेणे नव्हे, तर बुद्धीने, हुशारीने भौतिक आणि अध्यात्म यांचा मेळ साधणे. क्वचितप्रसंगी शत्रूला ठार करण्याची वेळ आली, तर तसे करणे आणि प्रसंगी सत्यासाठी मरण्यास तयार होणे, आत्माहुती देणे. जसे हे शंकराचे उदाहरण बघा. समुद्रमंथनातून निघालेले हलाहल, किती सहज त्यांनी प्राशन केले आणि अमृत मात्र लोकांना दिले. आपल्या उपास्याच्या पावलावर पाऊल टाकत सावरकरांनी कारावास पत्करला, सशस्त्र क्रांती केली, सतत आयुष्यभर मृत्यूशी झुंज दिली; पण इतरांच्या आयुष्यात मात्र नंदनवनच फुलवले. हीच शंकरांची खरी उपासना. म्हणून सावरकर म्हणत की, कमरेवर हात ठेवून उभा असलेला विठोबा हा पूर्वचरित्रात कृष्ण आहे, तर आता त्याचे हे रूप पुजू नका, नरसिंहांला आता पाचारण करा. त्याचे गुण अंगीकारा. कारण, काळाचे म्हणजेच शंकराचे विधान ते आहे.
शंकराचे चरित्र गहन आहे. जो स्वत: परब्रह्म आहे, त्याच्या वाट्याला तरी किती भोग? प्रथम सतीशी विवाहाच्या वेळी, वैराग्याचा अर्थ प्रतिपादित करण्यासाठी स्वतः शंकरांना किती कष्ट घ्यावे लागले? वैराग्य म्हणजे काय? सावरकर आपल्या ‘सप्तर्षी’ नावाच्या कवितेत सहज बोलून जातात की, वैराग्य म्हणजे अनुगुणांचा विकास. याचा थोडासा ऊहापोह करूया. अनुगुण म्हणजे, गुणांच्या मागोमाग जाते ते. गुणांच्या मागोमाग काय जाते, तर मन! थोडक्यात, इच्छांचा विकास म्हणजे वैराग्य! वैराग्य म्हणजे वीट येणे नव्हे. वैराग्य म्हणजे, स्वतः आप्तकाम होऊन समष्टीसाठी झटणे. वैराग्य शब्दांमधील मूळ रूप ‘विगतः रागः यस्य सः’ यातील, ‘विगत’ या शब्दाची फोड तात्यारावांनी किती सहज केली आहे. महाभारतात भीमानेही धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यामध्ये कामच सगळ्यात श्रेष्ठ असे प्रतिपादन केले होते. कारण, मोक्षाची सुद्धा प्रथम इच्छा असावी लागते. परिणामी, वैराग्य म्हणजे तेजस्वितेची, पूर्णत्वाची इच्छा होय. इच्छा अनादी आहेत, हे पतंजलीसुद्धा ‘कैवल्य पादा’त आपल्याला सांगतात. जशा या दिव्य इच्छांच्या बळावरच सावरकरांनी अमित पराक्रम केला तसेच, वैयक्तिक जीवनात ते तितकेच निर्लेप, निरभिमानी, अभिलाष शून्य होते. स्वतःसाठी त्यांनी कधी कुठला परिग्रह केला नाही. खरे वैराग्य हे नव्हे तर कुठले. शंकरांनी नाही का देव, असुर सर्वांना श्रीमंतीत ठेवले. पण, स्वतः त्यांना मात्र एक व्याघ्रांबर पुरत असे.
न हि स्वात्मारामं विषयमृगतृष्णा भ्रमयति..
(शिव महिम्न ८)
शंकर परब्रह्मच असल्याने, त्यांच्या ठिकाणी भेद नाही. त्यांना देव, असुर, गंधर्व, मनुष्य, प्राणी सगळे सारखेच. ते कर्माशय पाहून, फळ द्यायचे काम करतात. शंकराचा हा गुण आपल्याला जीवनाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन प्रदान करतो. तात्याराव सावरकरांनी, सगळीकडे खरोखरच अशी समानता बघितली. जिथे आपल्याला पाहणारे कुणी नाही, जिथली प्रसिद्धी ही केवळ नियतीची चेष्टाच, अशा अंदमानातसुद्धा त्यांनी तेथील मुस्लीम वर्गाला साक्षर केले. इंग्रजांनाही त्यांचे आश्वासन होते की, जर उद्या इंग्लंडवर कुणी आक्रमण करेल आणि त्यांचे स्वातंत्र्य हिरावेल, तर हा विनायक त्यांच्यासाठी उभा राहील. रत्नागिरीला स्वदेशीच्या प्रसारासाठी ते आपली प्रसिद्धी बाजूला ठेऊन, हातगाडी घेऊन फिरत असत. मानवता हे त्यांचे ध्येय होते. सगळ्यांचा एक ईश्वर ही त्यांची धारणा होती. ‘एक देश’ हे त्यांचे उद्दिष्ट होते. शिवतांडव स्तोत्रात रावण ज्याप्रमाणे ‘सुहृद विपक्ष पक्षयो: तृणारविंद्र चक्षुषो:’ म्हणत, शंकरांच्या सम प्रवृत्तीचे वर्णन करतो. हुबेहूब तीच वृत्ती सावरकरांमध्ये दिसते. पण, म्हणून सम वृत्तीचा विपर्यास कधी त्यांनी केला नाही. समवृत्ती! समवृत्ती! करीत शत्रूला हिंदी, चिनी भाई भाई म्हणत, मिठ्या मारायला ते कधीही गेले नाहीत. वैयक्तिक आणि राष्ट्रीय कर्मांचा विवेक त्यांनी सदोदित जागृत ठेवला. कुणाचेही लांगूलचालन त्यांनी कधीही केले नाही, तेजस्विताही कधी सोडली नाही. हाच काय तो त्यांचा दोष. पण, जे दोष त्रिभुवनाचे संकट दूर करतात, ते दोषसुद्धा दोष ठरत नाहीत. अग्निला तेजस्वितेचा दोष लागत नाही.
विकारोऽपी श्लाघ्यो भुवनभयभंगव्यसनिना!
(शिव महिम्न १४)
सावरकर स्वतः योगाभ्यासी होते. त्यांना कुंडलिनी जागृतीचा अनुभव, अंदमानात आला होता. आपल्या ‘सप्तर्षी’ काव्यात त्यांनी तो विशदही केला आहे. ही कुंडलिनी शक्ती तीच स्वातंत्र्य माता, अशी त्यांची धारणा झालेली होती. त्यासाठी, तन-मन-धन सारे काही त्यांनी अर्पण केले होते. ती शक्ती ती प्रवृत्ती , योग्य मार्गाकडे मनुष्यास नेत असते, स्फूर्ती देत असते. जगण्यासाठी जशी स्फूर्ती आवश्यक, तसेच वेळ आली म्हणजे वासनांचा उपशम ही तितकाच महत्त्वाचा, असे योगशास्त्र सांगते. वाचकहो, हा चित्तवृत्तींचा उपशम, निरोध म्हणजेच शिव तत्त्व आहे. जे सावरकर या शक्तीला स्मरून क्रांतीचा मार्ग पत्करते झाले, तेच स्वातंत्र्योत्तर काळात त्या उग्र वृत्तीचा उपशम करून, समाजकार्य अंगीकारते झाले असे आपल्याला दिसतात. तेही त्यांचे रूप मोठे वेधक आहे. अध्यात्माचा अभ्यास हा काळानुरूप करावा लागतो आणि इतिहासाचा अभ्यास त्यासाठी आवश्यक असतो. काळानुसार कर्तव्ये आणि ब्रह्मकर्म यांची ओळख बदलत असते, हे सावरकरांनी ओळखले होते. म्हणूनच स्वतंत्र भारताला बलवान सैन्य हवे, हे ओळखून त्या संबंधी काम त्यांनी सुरू केले.
एकीकडे भारतभर त्यांची भाषणे होत असताना, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड सातत्याने होत राहिली. रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत असताना, त्यांनी तिथली अस्पृश्यता कायमची नाहीशी केली आणि वैयक्तिक जीवनात? आपल्या अंगरक्षकास आपल्यामुळे त्रास सोसावा लागतो, म्हणून त्यांनी सकाळच्या वेळेत त्यास अख्खी भगवद्गीता अर्थसहित शिकवली होती. हा अंगरक्षकही पुढे निवृत्त झाल्यावर चार-चार तास ध्यान करीत असे, इतका अध्यात्मात प्रगत झाला होता. सगळ्यांचा विचार ते असे करीत असत. जसा इतिहासाचा अभ्यास त्यांचा परिपक्व होता, तशीच भविष्यावरही त्यांची दृष्टी स्थिर असे. भारताचे अहिंसेपायी संभावित नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी, ‘संन्यस्त खड्ग’ हे संगीत नाटक लिहून, त्यात धोक्याची सूचना देऊन ठेवली होती. केनोपनिषदात इंद्राला जसा भगवान शंकराचा साक्षात्कार देवीकडून घडवून देता आला, तसे त्यांनीही स्वातंत्र्यदेवीला पाचारण करून, शंकराला जाणून घेतले. (केनोपनिषद ४.१)
कलियुगात मनाची तेजस्विता कुणी जोपासलेली दिसली की, निस्तेज जनांना कसेसेच होते. मग त्यांच्यातले दोष शोधायचे आणि आपल्या मनाच्या अधोगमी आकर्षणाच्या वृत्तीचे चोचले पुरवत आयुष्य काढायचे, हे आमचे पालुपद आता तरी आपण निग्रहाने बदलायला हवे. निवृत्तीमार्गी असलेले श्री शंकर जसे त्रिपुरासूर भस्म करण्यासाठी, सार्या विश्वाचा परिग्रह करते झाले. तीच निष्काम तरीही प्रवृत्तीमार्गी अंतःस्थिती तद्वत् अबाधित ठेऊन, तुम्ही आणि आम्ही आज भारताला व हिंदू संस्कृतीला तिचे पूर्व अपूर्व असे तेज परत मिळवून देण्यास कटिबद्ध व्हायला हवे. महापुरुषांचे आयुष्य, प्रवृत्ती आणि निवृत्तीची आंदोलने पचवतच पैलतीरी पोहोचत असते. ही त्यातली समानता तात्यारावांनी ओळखली होती. म्हणून ते लिहितात,
हा उन्नती अवनतीस समुद्र जातो.
भास्वान रवीही उदयास्त अखंड घेतो.
उत्कर्ष नि अपकर्ष समान ठेले.
विश्वांत आजवरी शाश्वत काय झाले!
दि. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी विनायक दामोदर सावरकर २६ दिवस प्रायोपवेशन करून, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ज्ञानार्जन करीत, प्रसन्न आणि कृतार्थ मनाने कृतकृत्य होऊन, आपणहून मृत्यूच्या हाती हात देत स्वर्गी गेले. हा जन्मच मुळी मुक्तीचा होता. त्यामुळे कर्तव्ये म्हणून, आता काही उरली नाहीत. उरली असावी, तर ती फक्त हिंदू हिताची दिव्य वासना. स्वातंत्र्यवीरांच्या या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांची मुलगी त्यांना भेटण्यास ज्यावेळी आली, तेव्हा त्यांनी आवर्जून तिच्याकडील फुलांच्या बागेची चौकशी केल्याची आठवणही, त्यांच्या कुटुंबीयांसाठी अतिशय हृदयाजवळची आहे. ज्या मनुष्याने मानवी जीवनातला इतका विलक्षण अंधार अनुभवला आहे, तो मनुष्य मृत्यूच्या दारी असतानाही, त्याचा असलेला आयुष्याबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन एक निराळेच बळ आपणास देऊन जातो. असे म्हणतात, कुंडलिनी जागृत झालेला योगी, एखाद्या लहान बालकाप्रमाणे निरागस दिसतो. सावरकरही म्हातारपणी तसेच अनेकांना भासत असावे. अशी निरागसता पूर्ण ज्ञानातूनच उद्भवत असते, श्री शंकरांसारखी. शंकरांना भोळा सांब म्हणतात ते त्यामुळेच! त्यामध्ये अजाणतेपणा नाही, तर पूर्णत्व आहे. आज महाशिवरात्रीच्या दिवसातच जणू स्वातंत्र्यवीरांचे आशीर्वाद लाभले आहेत. या लेखानेच त्यांना वंदन करतो. हा लेख वाचकांच्या तपोवृद्धीचे कारण बनो, ही अपेक्षा येथे व्यक्त करतो आणि थांबतो. ओम् नमः शिवाय.
आदित्य शेंडे
९४०५९२३७४२