'बेलन्सच्या फटाकडी'ची सातारा जिल्ह्यातून पहिली छायाचित्रीत नोंद; किरकसालमध्ये दर्शन

    26-Feb-2025
Total Views |
Baillon
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सातारा जिल्ह्यात प्रथमच स्थलांतरित आणि दुर्मिळ बेलन्सच्या फटाकडी (Baillon's Crake) या पक्ष्याची छायाचित्रित नोंद झाली आहे (Baillon's Crake in satara). जिल्ह्यातील माण तालुक्यातील किरकसाल गावात या पक्ष्याचे दर्शन घडले आहे (Baillon's Crake in satara). किरकसाल जैवविविधता समितीमधील तरुणांना पक्षीनिरीक्षणादरम्यान या पक्ष्याचे दर्शन घडले. (Baillon's Crake in satara)
 
 
माण तालुक्यातील किरकसाल हे गाव लोकसहभागातून जैवविविधता संवर्धनासाठी ओळखले जाते. किरकसाल जैवविविधता समितीच्या माध्यमातून गावातील तरुण एकत्रित येऊन गावातील जैवविविधता नोंदणीचे काम करत आहेत. या नोंदणीदरम्यान पक्षीनिरीक्षक विशाल काटकर आणि डेके मेरी यांना गावातील नळीच्या तलावामध्ये बेलन्सच्या फटाकडीचे दर्शन घडले. बेलन्सची फटाकडी हा अत्यंत लहान आणि लाजाळू स्वभावाचा पक्षी आहे. तो सहसा पाणथळीतील दाट वनस्पतींमध्ये लपून राहतो, त्यामुळे त्याचे निरीक्षण करणे कठीण असते. हा पक्षी १६ ते १७ सेमी लांब असून, तो मोठ्या लिटल क्रेक या पक्ष्यासारखा दिसतो. त्याची चोच लहान, सरळ आणि पिवळसर किंवा हिरवट रंगाची असते. प्रौढ पक्ष्यांचे वरचे शरीर तपकिरी रंगाचे असते, त्यावर काही पांढऱ्या खुणा असतात. चेहरा आणि खालचा भाग निळसर-करडा असतो, तर मागच्या पार्श्वभागावर काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांची रचना असते. त्याचे पाय हिरवट रंगाचे आणि बोटे लांब असतात. लहानशा शेपटीच्या खालील बाजूसही पट्टे असतात.
 
 
माणदेशातील पक्षी अभ्यासक चिन्मय सावंत यांच्या मते, ही नोंद सातारा जिल्ह्यातील आणि विशेषतः माणदेशातील दुष्काळी भागातील पक्षीविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते. महाराष्ट्रात यापूर्वी काही ठिकाणी या पक्ष्याच्या उपस्थितीच्या नोंदी आहेत, मात्र सातारा जिल्ह्यात ई-बर्ड संकेतस्थळावर छायाचित्रांसह अशी नोंद यापूर्वी झालेली नव्हती. किरकसाल संवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून किरकसाल व माण तालुक्यात जैवविविधेवर अभ्यास होत आहे. त्यात चिन्मय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नयन उपाध्ये, दीक्षा ढमढेरे, प्रथमेश काटकर , अभिजीत माने , विशाल काटकर , प्रथमेश राजपकर अणि डेके मेरी यांची टीम काम करत आहे.
 
स्थलांतराविषयी...
हा पक्षी मुख्यतः युरोपच्या पूर्व भागात तसेच पालेआर्क्टिक प्रदेशातील सॉली गवताच्या दलदलीत (sedge beds) प्रजनन करतो. १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत तो ग्रेट ब्रिटनमध्ये प्रजनन करत होता. मात्र, पश्चिम युरोपमध्ये जलसाठ्यांच्या नष्ट होण्यामुळे त्याची संख्या घटली. तथापि, गेल्या काही वर्षांत उत्तर-पश्चिम युरोपमध्ये त्याची पुन्हा वाढ होत असून जर्मनी आणि नेदरलँड्समध्ये पुनर्वसन झाले आहे. ब्रिटनमध्येही त्याच्या प्रजननाची शक्यता वर्तवली जात आहे. २०१२ मध्ये आयर्लंडमध्ये या पक्ष्याची नोंद झाली होती, जी तिथे १८५०च्या दशकानंतर प्रथमच झाली होती. हा स्थलांतरित पक्षी असून, हिवाळ्यात तो पूर्व आफ्रिका आणि दक्षिण आशिया येथे स्थलांतर करतो. तो चिखल किंवा उथळ पाण्यात चोचीच्या मदतीने अन्न शोधतो तसेच काही वेळा डोळ्यांनी पाहूनही अन्न उचलतो. त्याचा आहार मुख्यतः कीटक आणि जलीय प्राण्यांवर आधारित असतो.