स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिनेता रणदीप हुडा आदरांजली देत म्हणाला,"सावरकरांनी विचारधारेशी तडजोड केली..."
26-Feb-2025
Total Views |
मुंबई : आज, २५ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिनेते आणि दिग्दर्शक रणदीप हुडाने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. रणदीपने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत सावरकरांच्या विचारधारेचे स्मरण केले आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
रणदीप हुडाने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्याने वीर सावरकरांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन, सहलेखन आणि सहनिर्मिती देखील त्याने केली होती. हा चित्रपट सावरकरांच्या जीवनप्रवासावर आधारित असून, त्यांच्या संघर्षमय वाटचालीला नव्याने प्रकाशझोत टाकणारा ठरला.
पुण्यतिथीच्या निमित्ताने रणदीप हुडाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "आज आपण वीर सावरकरांना स्मरण करतो, ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचे पुस्तक ‘The History of the First War of Indian Independence' हे १८५७ च्या उठावाला स्वातंत्र्य संग्राम म्हणून ओळख देणारे महत्त्वाचे लेखन ठरले. त्यांच्या विचारांनी अनेक क्रांतिकारकांना प्रेरित केले."
पुढे तो म्हणाला, "सावरकरांना ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली, तरीही त्यांनी आपल्या विचारधारेशी तडजोड केली नाही. त्यांना अनेकदा दुर्लक्षित आणि चुकीच्या अर्थाने समजले गेले, मात्र त्यांनी आत्मनिर्भरता, राष्ट्रभक्ती आणि सशक्त भारताचा पाया घालण्याचे कार्य केले. आज भारत जागतिक पातळीवर उंची गाठत आहे, त्यामागे सावरकरांच्या विचारांची प्रेरणा आहे."
रणदीपच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. चित्रपटातील त्यांच्या दमदार अभिनयाची विशेष चर्चा झाली. हा चित्रपट वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या चरित्रपटांपैकी एक ठरला.
वीर सावरकरांचे विचार आणि त्यांचा त्याग आजही अनेकांना प्रेरणा देतो. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनेक ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.