मुंबई : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंची पोलखोल केल्याने उबाठा गटाचा जळफळाट होताना दिसत आहे. उबाठा गटात दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्या की, एक पद मिळायचं, असा खुलासा नीलम गोऱ्हे यांनी केला होता.
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी उबाठा गटाची पोलखोल केली. त्या म्हणाल्या की, "कार्यकर्त्याला कमी समजण्याचे कारण नाही. २०१२ पासूनच्या शिवाजी पार्क येथे होणाऱ्या प्रत्येक सभेला ठाण्याहून लोक यायचे आणि त्यांचेच लोक सगळी तयारी करत होते. नेत्यांना संपर्कच नको असेल तर तिथे आपण किती चिकटून राहावे? दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्या की, एक पद मिळत होते."
"बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचे सगळीकडे लक्ष होते. त्यानंतर हळूहळू अवनती होत गेली. पण २०१९ ला बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला यासाठी आम्हाला धन्यता वाटली होती. परंतू, त्यावेळी आमदारांनाही भेटी मिळणार नाहीत, दिवसातून दोन तीनदा आरटीपीसीआर केला तरीही भेट मिळणार नाही, हे आम्हाला माहिती नव्हते. याचा विचार केल्यानंतर एक प्रश्न तयार होतो. स्थित्यंतरे होतात पण ती केवळ मुदपाक खान्याच्या विश्लेषणातून होतात, असे मला वाटत नाही," असेही त्या म्हणाल्या.
नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर उबाठा गटाकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. तसेच नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात विविध ठिकाणी आंदोलनेही करण्यात आली.