होळीनिमित्त कोकण वासीयांसाठी विशेष रेल्वे गाड्या

कोकणात शिमगा आणि गणेशोत्सव या दोन्ही सणांना विशेष महत्त्व

    22-Feb-2025
Total Views |


kokan

मुंबई, दि.२२: प्रतिनिधी 
मुंबईस्थित चाकरमानी होळीनिमित्त कोकणातील मुळगावी जाण्याच्या तयारीत असतात. कोकणात शिमगा आणि गणेशोत्सव या दोन्ही सणांना विशेष महत्त्व आहे. कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे.होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.
सीएसएमटी – मडगाव, एलटीटी – मडगाव अशा रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११५१ सीएसएमटी – मडगाव विशेष रेल्वेगाडी सीएसएमटीवरून ६ मार्च, १३ मार्च रोजी मध्यरात्री १२.२० वाजता सोडण्यात येणार आहे. ही रेल्वेगाडी अनुक्रमे ७, १४ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता मडगाव येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५२ मडगाव – सीएसएमटी विशेष रेल्वेगाडी मडगाव येथून ६ मार्च, १३ मार्च रोजी दुपारी २.१५ वाजता सोडण्यात येणार असून ही रेल्वेगाडी त्याच दिवशी मध्यरात्री ३.४५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी या रेल्वे स्थानकांवर थांबा असेल. गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव १३ मार्च, २० मार्च रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी अनुक्रमे १४ मार्च आणि २१ मार्च रोजी दुपारी १२.४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११३० मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी १४ मार्च, २१ मार्च रोजी मडगाव येथून दुपारी १.४० वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी २२ मार्च रोजी पहाटे ४.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी स्थानकांवर थांबा असेल. या रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण २४ फेब्रुवारी रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू होईल, अशी माहिती कोकण रेल्वेद्वारे दिली.