नवी दिल्ली येथील ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पहिल्याच दिवशी नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. ‘सरहद पुणे’ आणि ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य संमेलनाची शुक्रवारी सकाळी ग्रंथदिंडीने करण्यात सुरुवात आली. ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त जुन्या संसद भवनापासून ग्रंथदिंडी काढण्यात आली. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला.
यावेळी संमेलनाचे मुख्य आयोजक ‘सरहद संस्थे’चे अध्यक्ष संजय नहार, ‘नॅशनल बुक ट्रस्ट’चे चेअरमन मिलिंद मराठे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे, राज्याचे सांस्कृतिक सचिव विकास खारगे, साहित्यिक कवी शरद गोरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर या ग्रंथदिंडीची शोभा वाढवणारा अभिजात मराठीचा चित्ररथसुद्धा साकारण्यात आला. या चित्ररथात महाराष्ट्रातील प्रसिद्ध कादंबर्यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर शिवकालीन मुद्रेची प्रतिकृतीसुद्धा त्यावर झळकत होती. या दिंडीत साहित्यिक, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाली होते. मराठमोळी पारंपरिक वेशभूषा केलेले अनेक युवक-युवती यावेळी उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात अत्यंत दिमाखदार असा हा सोहळा पार पडला.