मुंबई, दि.२२ : प्रतिनिधी म्हाडा मुंबई इमारत व दुरुस्ती पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकरप्राप्त, पुनर्रचित इमारती व समूह पुनर्विकास प्रकल्पांचा ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी नुकतीच प्रत्यक्ष भेट देऊन ‘मॅरथॉन’ पाहणी दौरा केला. या पार्श्वभूमीवर उपाध्यक्षांनी शुक्रवार, दि.२० रोजी दादर व प्रभादेवी विभागातील उपकरप्राप्त इमारती, पी. एम. जी. पी. इमारती व पुनर्रचित इमारती यांच्या ३३ (९) अंतर्गत नव्याने प्रस्तावित समूह पुनर्विकासासंदर्भात बैठक घेतली.
‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दादर व प्रभादेवी विभागातील उपकरप्राप्त इमारती, पी. एम. जी. पी. इमारती व पुनर्रचित इमारती यांच्या ३३ (९) अंतर्गत नव्याने प्रस्तावित समूह पुनर्विकासासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीमध्ये उपाध्यक्षांनी अधिकारी, भाडेकरू/रहिवासी व वास्तुविशारद यांच्याशी पुनर्विकासावर सखोल चर्चा केली व समूह पुनर्विकासाबाबत कृती आराखडा तयार करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. या बैठकीत माहीम विधानसभेचे आमदार सदा सरवणकर, म्हाडा इमारत दुरुस्ती आणि पुनर्र्चना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, यांसह भाडेकरू/रहिवासी व वास्तुविशारद उपस्थित होते.
दरम्यान, ३० जानेवारी २०२५ रोजीउपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दादर व प्रभादेवी विभागातील उपकरप्राप्त इमारती, पी. एम. जी. पी. इमारती व पुनर्रचित इमारतीतील नागरिकांसोबत पुनर्विकासा संदर्भात बैठक घेतली होती. यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले होते की, घराचे स्वप्न उराशी बाळगलेल्या, मात्र घराच्या समस्येमुळे मुंबईच्या बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत परत आणून शासन सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून त्यांच्या प्रशस्त घराचे स्वप्न पूर्ण करणार आहे.