मुंबई : शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळील स्टारलिंग सिनेमॅक्समध्ये छावा या चित्रपटाची विशेष स्क्रिनिंग आयोजित केली. या विशेष स्क्रिनिंगसाठी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला. थिएटरमधील चारही स्क्रिनिंग रूम हाऊसफुल्ल होत्या. संपूर्ण चित्रपटगृहात “छत्रपती शिवाजी महाराज की जय!”, “छत्रपती संभाजी महाराज की जय!”, “हर हर महादेव!” अशा जयघोषांचा निनाद घुमत होता, आणि शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
या विशेष स्क्रिनिंगमुळे छावा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याबद्दल आणि विशेषतः लहान मुलांपर्यंत इतिहास पोहोचल्याने प्रेक्षकांनी आयोजक किरण लोढा यांचे आभार मानले. एका प्रेक्षकाने भावना व्यक्त करताना सांगितले, “छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचा इतिहास कुणालाच माहिती नाही, कारण तो शिकवलाच गेला नाही. मात्र, या चित्रपटामुळे तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचला, विशेषतः लहानग्यांपर्यंत. त्यामुळे आम्ही या चित्रपटाच्या दिग्दर्शकांचे आणि ही विशेष स्क्रिनिंग आयोजित करणारे किरण लोढा यांचे मनःपूर्वक आभार मानतो.”
या स्क्रिनिंगदरम्यान कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई तरुण भारतशी संवाद साधला. छावा चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी माझा मनःपूर्वक मुजरा! महाराष्ट्रातील आणि विधिमंडळातील सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा! हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता, आणि आज 350 वर्षांनंतरही हा आनंदाचा क्षण आहे. त्यांच्या सुपुत्रांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी, ‘प्राण गेले तरी चालतील पण धर्म सोडणार नाही’ हे सिद्ध करून दाखवले. हा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडला गेला आहे. त्यामुळेच आम्ही शिवजयंतीच्या निमित्ताने छावा चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आणि तो आज यशस्वी ठरला.”