धर्मांतरणाचे आमिष नाकारल्याने छत्रपती संभाजी महाराजांची दुर्दैवी हत्या औरंगजेबाने केली, हाच खरा इतिहास आहे. ‘छावा’ सिनेमाच्या निमित्ताने औरंगजेबाच्या विरोधात निर्माण झालेला रोष, कसलाही आकार धारण करू नये, म्हणून सध्या बाटग्यांची धावपळ सुरू आहे.
‘छावा’ या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला मराठी, हिंदी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी लेझीम वाजवावे की वाजवू नये, अशा वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी योग्य ते बदल केले व हा भव्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. मराठीतले गाजलेले कादंबरीकार शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर हा चित्रपट बेतला आहे. ‘छावा’ सिनेमाचे तंत्र, विकी कौशल या अभिनेत्याचा अभिनय, संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी त्याने केलेली शारीरिक, मानसिक तयारी, त्यासाठी स्वत:मध्ये करावे लागलेले परिवर्तन, या सगळ्यामुळे हा सिनेमा उत्कृष्ट झाला आहे. शिवछत्रपतींसारखी व्यक्ती हजारो वर्षांतून एकदाच जन्माला येते व त्यांच्यानंतर अजून हजार वर्षे तरी असे कुणी जन्म घेईल, अशी आशा बाळगता येत नाही. शिवछत्रपतींचा धर्माभिमान हाच शिवचरित्राचा व शिवरायांच्या पराक्रमाचा, दुर्दम्य इच्छाशक्तीचा मूळ गाभा आहे. खरे तर छत्रपतींसारखे चरित्रही कॅलिडीस्कोपसारखे आहे. आपण ज्या दृष्टीने पाहतो, त्या दृष्टीने त्यातले उत्तम आपल्याला दिसत राहते. मात्र, या उत्तमाला नजर लागते, ती मतांच्या भिकेसाठी स्वाभिमानाशी तडजोड करणार्या राजकारण्यांची! ‘छावा’ सिनेमाच्या यशानंतर मतांसाठी बाटलेल्यांची जी पोपटपंची सुरू आहे, हे त्याचेच प्रतीक. खोटे बोला पण रेटून बोला, हाच या मंडळींचा जुना डाव. इतिहासातल्या जागा शोधून तो असा काही पेश करायचा की, तो सोयीचा झाला पाहिजे. प्रत्येक घटनाक्रमाला जातीचा रंग लावायचा व एका जातीला दुसर्या जातीच्या विरोधात उभे करून स्वत:च्या मतांची बेगमी करायची. शिवछत्रपतींच्या इतिहासाविषयी अशीच बनवाबनवी केली गेली. उदात्त हेतू धारण केलेल्या महापुरुषाला सोबती मिळतात, ते त्याने स्वीकारलेल्या ध्येयामुळे.
धर्माधिष्ठित स्वराज्याचे जे स्वप्न शिवछत्रपतींनी पाहिले व त्यासाठी ज्या प्रकारची पराक्रमाची पराकाष्ठा केली, ती पाहून अठरापगड जातीचे लोक कोणतीही अपेक्षा न ठेवता महाराजांना जोडले गेले. ज्या पातशाह्या, माणसे यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर लढले, ते बहुसंख्य लोक आपल्या इस्लामी धर्मवेडेपणाला राज्यकारभाराचे रूप देऊन, आपल्या सत्ता लोकांवर लादणारे आक्रमकच होते. यात इथले होते, परकीय होते आणि न जाणे कोण कोण होते. छत्रपतींच्या पराक्रमाचा संपूर्ण इतिहास असल्या लोकांना धडा शिकवण्याचाच आहे. हा संपूर्ण संघर्षच हिंदूपदपातशाहीच्या पुनरुज्जीवनाचा खरा इतिहास आहे. महाराष्ट्राची राजकन्या ज्येष्ठापल्ली हिचे अलाउद्दीन खिलजीने देवगिरी हल्ल्यावेळी केलेले अपहरण आणि उपमर्द व महाराष्ट्राच्या राजपुत्राचा आलमगीर औरंगजेबाने धर्मांतराची अट ठेवून केलेली हत्या, ही या इतिहासाची दुर्दैवी बाजू. दोन्ही बाजूला महाराष्ट्राच्या इतिहासाचा हा लोलक झुलतो, त्यावेळी एका बाजूला हिंदू राजा म्हणून छत्रपती होण्याचा शिवाजी महाराजांचा संकल्प व दुसर्या बाजूला, ज्येष्ठापल्ली ते छत्रपती संभाजी महाराज अशा दुर्दैवावतारांची यादी दिसते. परंतु, इतके होऊनही मराठे औरंगजेबाला शरण गेले नाही. त्याला मरणही महाराष्ट्राच्या मातीतच स्वीकारावे लागले, याचे कारण छत्रपतींनी दिलेले देव, देश आणि धर्म यांचे अधिष्ठान!
कुठल्या तरी इटुकल्या पिटुकल्या देशांत झालेल्या क्रांत्या आपल्या इतिहासात शिकवण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षाचा इतिहास शिकवला गेला असता, तर आज काही वेगळे चित्र दिसले असते. मात्र, तसे घडू दिले गेले नाही. छत्रपतींच्या धर्माभिमानी असण्यापेक्षा त्यांच्या जीवनातील निवडक प्रसंगच सांगितले गेले. याचे सरळ कारण म्हणजे, छत्रपतींच्या पश्चात मराठ्यांनी दिलेला लढा हा पूर्णपणे इस्लामी राज्यकर्त्यांच्या विरोधातील आहे. आता हा इतिहास खरंच शिकवला, तर हिंदू धर्माच्या विरोधात कारवायांना धडा शिकवणारी एक पिढीच्या पिढी तयार होईल, या भीतीने तो शिकवला गेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर जेव्हा जेव्हा भव्य कलाकृती साकारल्या जातात आणि जनमानसात त्याचा प्रभाव दिसायला लागतो, तेव्हा तेव्हा या मतांच्या लाचारीवर जगणार्यांची कोल्हेकुई सुरू होते. छत्रपती शिवाजी महाराज असो, वा छत्रपती संभाजी महाराज असो, यांच्यासंदर्भात लगेचच मनुवादी, मनुवाद्यांची कारस्थाने, कृष्णाजी भास्कर, अनाजी पंत यांच्यासारख्या कोळशांची उगाळणी केली जाते. छत्रपतींच्या सैन्यातील मुस्लीम हे तर सदासर्वदा वाजणारे टुमणे. खरे तर नेताजी पालकरांना स्वधर्मात पुन्हा आणण्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोघांनीही प्रत्यक्ष स्वत: लिहिलेल्या पत्रांत जाज्वल्य धर्माभिमानाची व हिंदू म्हणून राज्यकर्ता होण्याची केलेली आवाहने किती तरी ठिकाणी सापडतात. तशी पत्रेही उपलब्ध आहेत. मात्र, सोयीचे तुणतुणे वाजवत बसले की, सोयीचे राजकारण करता येते. जितेंद्र आव्हाड वगैरे मंडळी या जाज्वल्य इतिहासाचे टोक कसे बोथट करता येईल, यासाठी प्रयत्न करीत असतात.
‘छावा’ चित्रपटावर त्यांनी केलेले ट्विट हे असेच संतापजनक आहे. अकबर संभाजी महाराजांना भेटायला आला होता, तो त्याच्या राजकीय हितासाठी, मित्र म्हणून नव्हे. तसे असते तर संभाजी महाराजांना औरंगजेबाने मरणयातना देताना तसे होऊ नये, यासाठी अकबराने कोणतेही प्रयत्न केल्याचे पुरावे सापडत नाही. जी पात्रे हे ढोंगी लोक सतत ताबुताप्रमाणे नाचवत असतात, त्यांचे छत्रपतींच्या घराण्याच्या पराक्रमाशी काहीही देणेघेणे नाही. दुहीचे बीज इथे पाषणावरही उगवते, हे वाक्य तर खास औरंगजेबी शैलीतले. आपण कुणाला महापुरुष मानावे, व स्वत:ला कुठल्या इतिहासाचे पाईक समजावे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न, अन्यथा स्वत:च्याच पक्षात दुही माजवून, तो फोडून वेगळ्या झालेल्या शरद पवारांसोबत आव्हाड कधीही राहिले नसते. आव्हाडांनी त्यांच्या निष्ठा कुणाला वाहाव्या, हा देखील सर्वस्वी त्यांचा प्रश्न. मात्र, मनुवाद्यांचा बागुलबुवा उभा करून छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम करू नये. मतांसाठी औरंगजेबाच्या प्रेमात खुळावलेले लोक मराठी मुलुखात कमी नाहीत. ‘माझ्या कबरीवर फुले घालायला येऊ नका,’ असे औरंगजेबाने त्याच्या मृत्युपत्रात सांगितले होते. मात्र, आपल्याकडे तिथे फुले वाहण्याच्या स्पर्धेत पहिले येण्याचा प्रयत्न करणारेही अनेक आहेत. कुणीही बुणगे उठतात आणि हिंदूंच्या या देदिप्यमान साम्राज्याच्या स्थापनेविषयीच संभ्रम पसरवितात, हे ठीक नाही. असे करणारे हे मूठभर राजकारणीच असावेत व हा त्यांच्या राजकारणाचा शेवटचा टप्पाच असावा.
‘छावा’ सिनेमात चटका लावून जाणारा प्रसंग हा धर्मांतरणाची औरंगजेबाची मागणी धुडकावून मृत्यूला सामोरे जाणार्या संभाजी महाराजांचा! हाच या सिनेमाचा परमोच्च बिंदू आहे. संतापाने काही प्रेक्षकांनी चित्रपटाचा पडदा फाडल्याचेही समोर आले आहे. हा राग या बाटग्यांच्या मतपेढ्या फोडून टाकेल, अशी भीती या मंडळींना वाटते. त्यातून मनुवादी, कृष्णाजी भास्कर वगैरे इतिहासाचे विकृतीकरण केले जाते. या सगळ्याच मंडळींची विधाने वाचली की, तर आपण ही दुष्कृत्ये केली की नाही, अशा बुचकळ्यात खुद्द औरंगजेबच पडू शकतो. या बुणग्यांमध्ये काही सुधारणा होणे अपेक्षित नाहीच. जनमानसाने मात्र शिवशंभूंचा हिंदुत्वाचा वारसा असाच पुढे न्यावा, सत्य ओळखावे व आपले हिंदुत्व साजिरे करावे!