"छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा नव्या पिढीसाठी दिशादर्शक"; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन
जय छत्रपती शिवाजी महाराज, जय भारत पदयात्रेचे दिमाखदार आयोजन
19-Feb-2025
Total Views |
नागपूर : (Chandrasekhar Bawankule) "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांच्या कार्याची महती लहान थोरांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा ही नव्या पिढीसाठी दिशादर्शक आहे. ही प्रेरणा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ‘जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रा’ हा उत्तम आणि महत्वाकांक्षी उपक्रम आहे", असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती नागपूर जिल्हा प्रशासन आणि नागपूर महानगरपालिकेच्यावतीने दिमाखात साजरी करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त निर्देशांच्या अनुषंगाने राजे रघुजी भोसले स्मारक सक्करदरा ते गांधी गेट महाल पर्यंत ‘जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली. राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पदयात्रेमध्ये विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार प्रवीण दटके, आमदार आशिष देशमुख, श्रीमंत राजे मुधोजी भोसले, माजी आमदार विकास कुंभारे, विभागीय आयुक्त माधवी खोडे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आदिवासी विभाग अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलिस उपायुक्त महेक स्वामी, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
सक्करदरा येथे राजे रघुजी भोसले यांच्या पुतळ्याला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते माल्यार्पण करुन पदयात्रेला सुरुवात झाली. तर महाल येथील गांधी गेट स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांनी अभिवादन केले व पदयात्रेची सांगता झाली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेला संबोधित केले. छत्रपती शिवाजी महाराजांची महती देशभर पोहोचावी आणि विकसित भारताची संकल्पना अधिक मजबूत व्हावी यासाठी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी ‘जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रा’ उपक्रमाची रचना केली. आज देशभर हा कार्यक्रम साजरा होत असल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज हे उत्कृष्ट शासक, प्रशासक होते. सदैव जनतेच्या हिताचाच विचार मनात बाळगून कार्य करणाऱ्या जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा अंगीकृत करुन महाराष्ट्र आणखी प्रगतीपथावर जाईल, असा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. जनतेने उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांनी जनतेचेही आभार मानले.
कार्यक्रमात मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी स्वत: रेखाटलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटस्वरुपात दिले. कार्यक्रमाचे संचालन मनपा जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी व हंबीरराव मोहिते यांनी केले. क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.