तिरुपतीच्या 'मंदिर महाकुंभात' गोविंददेव गिरिजी महाराजांचे मोठे विधान
18-Feb-2025
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (ITCX Tirupati) "मंदिरे केवळ प्रार्थनास्थळ नसून ते परमेश्वराचे निवासस्थान आहे. त्याला आपण देवालय म्हणतो. प्रार्थना आपण कुठुनही करू शकतो. परंतु देवाची पूजा मंदिरात जाऊनच करावी लागते. त्यामुळे मंदिरे ही सनातन संस्कृतीची आधारशिळा आहेत. मंदिराचे रक्षण करणे आपले आद्य कर्तव्य आहे.", असे प्रतिपादन श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष महंत गोविंददेव गिरिजी महाराज यांनी केले.
जगातील सर्वात मोठे मंदिर प्रशासन आणि व्यवस्थापन यासाठी समर्पित असलेला ‘आंतरराष्ट्रीय मंदिर परिषद व प्रदर्शन (आयटीसीएक्स) २०२५’ हा तीन दिवसीय (१७ ते १९ फेब्रुवारी) कार्यक्रम तिरुपतीच्या आशा कन्वेन्शन्स येथे संपन्न होत आहे. २०२३ साली वाराणसी येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या मंदिर संमेलनाच्या यशस्वी आयोजनानंतर यंदा हे दुसरे पर्व तिरुपती येथे संपन्न होत आहे.
उपस्थितांना संबोधत गोविंददेव गिरिजी महाराज पुढे म्हणाले, "मंदिरामुळे निर्माण होणाऱ्या उर्जेमुळे आजवर समाज जगत आलाय. मंदिरांनी निर्माण केलेल्या सनातन उर्जेचे दर्शन महाकुंभात सर्वांनाच घेता आले. सनातन ऊर्जा निर्मितीचे पॉवर हाऊस म्हणून मंदिरांकडे पाहिलं जातं. देशाची कला, संगीत, आयुर्वेद, क्रीडा, नाट्य, काव्य, नृत्य या सर्वाचे पोषक मंदिरे आहेत."
महाकुंभाचे विषेश आकर्षण असलेल्या नागासाधूंचा उल्लेख करत ते म्हणाले, "हे राष्ट्र श्रद्धेच्या आधारे चालत असलं तरी धर्माला आपण प्राण समजतो. मंदिरे भारतीय संस्कृतीचे प्राणतत्व आहेत. या मंदिरांचे व धर्माचे रक्षण व्हावे याकरीता आद्य शंकराचार्यांनी नागा साधूंच्या आखाड्याची योजना आखली. समाजासाठी युद्ध करणारे साधू म्हणून या नागा साधूंकडे आज प्रकर्शाने पाहिलं जातं." तीर्थस्थळांचा विकास तेथील संस्कृतीचे फायस्टार कल्चर न करता, मंदिरांचे पावित्र्य टीकवून ठेवत झाला पाहिजे, असे आवाहन गोविंददेव गिरीजी महाराजांनी यावेळी केले. तसेच मंदिरांवरील सरकारचे नियंत्रण हा मुद्दा अधोरेखित करत व 'हिंदू मनी फॉर हिंदू कॉज' चा नारा देत ते म्हणाले, मंदिरावर भक्तांचे नियंत्रण असावे मात्र मंदिराचे व्यवस्थापन नीट चालले आहे की नाही यावर सरकारचे नियंत्रण असणे आवश्यक आहे.
मंदिरे ही केवळ आध्यात्मिक केंद्रे नाहीत तर ती समाजाच्या विकासासाठी उत्पन्नाचे प्रमुख स्रोत देखील आहेत. देशाच्या विकासात मंदिर पर्यटनाची विशेष भूमिका आहे. आपली संस्कृती आणि वारसा जपण्यात मंदिरे महत्त्वाची भूमिका बजावतात., असे मत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केले.
"तिरुपतीच्या पावन धरतीवर होणारी मंदिर परिषद हा एक धार्मिक पावन कार्यक्रम आहे. प्रयागराजमध्ये श्रध्देचा महाकुंभ होतोय तर तिरुपतीत भक्तीचा महाकुंभ होत आहे. आपल्या पूर्वजांचे कार्य या परिषदेतून निष्चितच पुढे नेले जाईल.", असा विश्वास राज्याचे महाराष्ट्र राज्य माहिती आणि तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केला. 'आयटीसीएक्स'चे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना सांगितले की, मंदिर परिषदेत एकूण १७ देशाचे प्रतिनिधी आले असून १५८१ लोकांचे पंजीकरण झाले आहे. १११ हून अधिक मान्यवर वक्ते, १५ कार्यशाळा व ज्ञानसत्रे आणि ६० हून अधिक स्टॉल्स प्रदर्शनामध्ये असणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. टेम्पल कनेक्ट ही जगभरातील हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख मंदिरांची माहिती दस्तऐवजीकरण, डिजिटायझेशन आणि प्रसार करण्यासाठी एक चळवळ असल्याचे त्यांनी प्रास्ताविकादरम्यान सांगितले. कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर भाजप विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर, 'आयटीसीएक्स'चे संस्थापक गिरीश कुलकर्णी, अंत्योदयच्या सर्वेसर्वा नीता प्रसाद लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी या कार्यक्रमात व्हिडिओरुपी पाठवलेल्या संदेशात म्हटले की, मंदिरे ही सांस्कृतिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, आर्थिक, सामाजिक केंद्र होती. मंदिराप्रती अपार श्रद्धा आजही आहे. आज साऱ्या विश्वाला दिशा दाखवण्याची वेळ सनातन धर्माजवळ आली आहे. त्यानिमित्ताने काही संदेश जगाला द्यायचे आहेत, काही उपाय जगाला सांगायचे आहेत. त्यासाठी सनातन धर्मियांना तयार करण्यासाठी सर्व मंदिर व्यवस्थांना पूर्वीप्रमाणे संघटित व्हावे लागेल. याचा विचार यंदाच्या परिषदेत होईल आणि विश्वाला भारत देश यशस्वी करेल हा विश्वास आहे.
मंदिरे केवळ आस्थेचे प्रतिक नसून समाजजीवचा अभिन्न अंग
ज्या राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी मंदिरांचे पुनरुज्जीवित करत समाजात त्याप्रती आस्था जीवंत ठेवण्याचे कार्य केले, त्या अहिल्यादेवींच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्ष निमित्ताने ही परिषद होते आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. प्रयागराजमध्ये होत असलेल्या महाकुंभात ५० कोटीहून अधिक लोकांनी स्नान केले. "हम सब एक है, सब सनातन के सेवक है" या वाक्याची प्रचिती त्याठिकाणी दिसून आली. सनातन ही अशी जीवनपद्धती ज्याचा कधीच कोणी नाश करू शकले नाही. विविधता असूनही भारतीय एका मालेत गुफला आहे, याचे कारण सर्व सनातनी आहेत. मंदिरापासून समाजाला प्रेरणा मिळते. मंदिरे केवळ आस्थेचे प्रतिक नाही तर समाजजीवचा अभिन्न अंग आहेत.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
देव, धर्म शाबूत राहिले तर देश शाबूत राहिल
देव, धर्म, शाबूत राहिले तर देश शाबूत राहिल. आपल्या पूर्वजांनी, राजे महाराजांनी याच गोष्टीचे पालन केले म्हणून आज देश शाबूत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात हिंदू साम्राज्य स्थापन करण्याचा विचार केला. मुघलांनी, इंद्रजांनी, पोर्तुगीजांनी यांनी मंदिरे उध्वस्त केली परंतु शिवाजी महाराजांनी मंदिरे टीकवण्याचे कार्य केले. आज देशात भाषा, वेश, संस्कृती वेगवेगळी असली तरी मंदिर संस्कृती मात्र एक आहे. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय मंदिर परिषदेतून साऱ्या जगाला मार्गदर्शन मिळेल, हा विश्वास आहे.
- प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा
मंदिरे समरसतेचे केंद्र बनवण्याच्या दृष्टीने विचार
श्रद्धा, सक्षम मंदिरांचे दायित्व, मंदिरांची सामाजिक भूमिका, तंत्रज्ञानाची उपयोगिता हे चार बिंदू मंदिर परिषदेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मंदिरांप्रती असलेली श्रद्धा वाढवण्यासाठी व्यक्ती आणि परिवाराचा विकास अधिक सक्षम होणे आवश्यक आहे. त्याअर्थी श्रद्धा, भक्ती, पुण्य सक्षल करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही मंदिरे अशी आहेत, जे व्यवस्थापकीय दृष्ट्या दुर्बल आहेत, अशा छोट्या दुर्लक्षित मंदिरांसाठी व्यवस्था कशी करता येईल याबाबत विचार करणे सक्षम मंदिरांची जबाबदारी आहे. अशा मंदिरांनी जात, पात विसरून सर्व समाजाला मंदिरात मुक्त प्रवेश कसा मिळेल याबाबत जनजागृती केली पाहिजे. विशेषतः आजच्या काळात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून मंदिरे समरसतेचे केंद्र कशी होतील याचाही विचार करणे तितकेच आवश्यक आहे.
- मुकुंदजी, सह सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ