दक्षिण कोरियन अभिनेत्री किम से-रॉन यांचे निधन!

    17-Feb-2025
Total Views |



kim sae raoun

सोल: दक्षिण कोरियन अभिनेत्री किम से-रॉन हीचे निधन झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय किम से-रॉन हीचा मृतदेह सोल शहरातील सियोंगसु-डोंग भागातील तिच्या राहत्या घरी आढळून आला. १६ फेब्रुवारी रोजी, रविवारी दुपारी कीमच्या ओळखीची व्यक्ती तिच्या घरी पोहोचली असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद बाब आढळलेली नाही, मात्र मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

सन २००० मध्ये सोल येथे जन्मलेल्या किम से-रॉन हिने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. २००९ साली प्रदर्शित झालेल्या अ ब्रँड न्यू लाईफ या चित्रपटामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली आणि हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकला. त्यानंतर २०१० मध्ये दक्षिण कोरियाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट द मॅन फ्रॉम नोव्हेअर आणि २०१२ चा द नेबर यामधील भूमिकांमुळे तीला मोठ्या प्रमाणावर ओळख मिळाली. २०१४ च्या अ गर्ल अॅट माय डोअर हा चित्रपट आणि २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या मिरर ऑफ द विच या टीव्ही मालिकेतील भूमिकांसाठी तिचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले.

मात्र, २०२२ मध्ये मद्यधुंद स्थितीत वाहन चालविल्याच्या प्रकरणामुळे किम से-रॉन हीने मनोरंजन क्षेत्रापासून काही काळ विश्रांती घेतली होती. या प्रकरणात तिला २०२३ मध्ये २ कोटी कोरियन वॉन (सुमारे ११,००० पौंड) दंड ठोठावण्यात आला होता.

किम ची शेवटची भूमिका २०२३ मध्ये नेटफ्लिक्सवरील ब्लडहाऊंड्स या कोरियन नाटकात होती. मात्र, मद्यप्राशनाच्या प्रकरणामुळे तिच्या भूमिकेतील बहुतांश भाग संपादित करण्यात आला होता, असे व्हरायटीने अहवालात नमूद केले आहे.