एकता कपूरविरोधात तक्रार; वेब सिरिजमधल्या 'त्या' दृश्याने लष्करी अधिकाऱ्यांचा अपमान!
17-Feb-2025
Total Views |
मुंबई : वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयाने चित्रपट आणि टेलिव्हिजन निर्माती एकता कपूर हिच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्हेगारी तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ अंतर्गत चौकशी अहवाल ९ मेपर्यंत सादर करण्यास सांगितले आहे.
ही तक्रार यूट्यूबर विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊ यांनी दाखल केली आहे. तक्रारीत एकता कपूर यांच्यासोबतच त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट बालाजी तसेच त्यांचे पालक शोभा आणि जितेंद्र कपूर यांच्याही नावाचा उल्लेख आहे.
अॅडव्होकेट अली काशिफ खान देशमुख यांच्या माध्यमातून दाखल झालेल्या तक्रारीनुसार, अल्ट बालाजीवरील एका वेब सिरीजमध्ये लष्करी अधिकाऱ्याला एका "अवैध लैंगिक कृत्यात" दाखवण्यात आले आहे. विकास पाठक यांनी मे २०२० मध्ये हे दृश्य पाहिले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
"या आरोपींनी अत्यंत हलक्या आणि लाजिरवाण्या प्रकारे भारतीय सैन्याच्या सन्मानाशी खेळ केला आहे. लष्कराच्या गणवेशावर राष्ट्रीय चिन्ह असताना, त्याच वेळी आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आले आहे," असे तक्रारीत म्हटले आहे.