सिंधुदुर्ग : बाळासाहेबांनंतर शिवसेना भवनाचे महत्व शिल्लक राहीलेले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनालाही टाळे ठोकायला हवे, असा खोचक टोला मंत्री नितेश राणे यांनी लगावला आहे. रविवार, १६ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्गात उबाठा गटातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, "भारतीय जनता पक्षाच्या परिवारात मोठ्या प्रमाणात ताकदीचे लोक प्रवेश करत आहेत. येणाऱ्या काळात भाजप हा कोकणातच नाही तर महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष राहील. कोकणात आम्ही सगळे शत प्रतिशत भाजपच्या दिशेने जात आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे आहे. त्यामुळे पहिले प्राधान्य भाजपलाच असेल. सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी ते थेट चिपळूणपर्यंत असंख्य लोकांचे फोन येत असून टप्प्याटप्प्याने त्यांचे पक्षप्रवेश होताना दिसतील."
"ज्या माणसाला स्वत:चा भाऊ आणि घर सांभाळता आले नाही तो पक्ष कसा सांभाळणार? हे उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येत आहे. उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राची जेवढी अधोगती झाली तेवढी कधीच झाली नव्हती. त्यामुळे उबाठा गटातील सगळेजण आपले भविष्य शोधत हळूहळू बाहेर पडत आहेत. जो स्वत:चे भविष्य घडवू शकला नाही तो दुसऱ्यांचे काय घडवणार? असे सर्वांना वाटत असल्याने आता सगळ्याच बाजूंनी भाजप आणि महायुतीत प्रवेश होताना दिसतील," असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी कितीही बैठका बोलवल्या तरी आता खूप उशीर झाला आहे. ट्रेन पुढे निघाली असून स्टेशनवर कुणीही उभे नाही. त्यामुळे जेवढ्या बैठका बोलवायच्या आहेत तेवढ्या बोलवाव्या. त्यांनी शिवसेना भवनालाही टाळे ठोकायला हवे. बाळासाहेबांनंतर शिवसेना भवनाचे महत्व शिल्लक राहीलेले नाही," असा टोलाही त्यांनी लगावला.