आम्ही कधीच फोडाफोडीचं राजकारण केलं नाही; विकसित भारताच्या संकल्पावर लोकांचा विश्वास
मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया
17-Feb-2025
Total Views |
नागपूर : आम्ही कधीच फोडाफोडीचे राजकारण केले नाही. विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी अनेक लोक आमच्याकडे प्रवेश करतात, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. खासदार संजय देशमुख यांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आम्ही कधीही फोडाफोडीचे राजकारण केले नाही. भाजपमध्ये ही पद्धत नाही. देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्यावर आम्ही महाराष्ट्राला पुढे नेत आहोत. मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला असून या संकल्पाला साथ देण्यासाठी अनेक लोक आमच्याकडे पक्षप्रवेश करतात. आम्ही कधीही कुणाला आमच्या पक्षात या, असे म्हणत नाही. मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या कामावर विश्वास ठेवून लोक आमच्याकडे येत आहेत आणि आम्ही त्यांचे स्वागत करतो."
"शिवभोजन, लाडकी बहिण, शेतकऱ्यांची वीजमाफी यासह राज्यातील कुठलीच योजना बंद होणार नाही. परंतू, योजनेच्या व्याख्येत न बसणाऱ्या काही लोकांनी योजनेचा गैरफायदा घेतला आहे. त्यांची तपासणी सुरु आहे. सरकारकडे कुठल्याही योजनेसाठी पैशाची कमतरता नाही. त्या त्या योजनेचा पैसा सरकारकडे आहे. त्यामुळे आमचे सरकार कोणतीही योजना बंद करणार नाही, हे निश्चित आहे," असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अंतिम शिक्षा व्हावी, यासाठी सरकारचे काम सुरु आहे. संतोष देशमुख यांची हत्या ही अत्यंत गंभीर घटना आहे. त्यामुळे या घटनेचे राजकारण होऊ नये, ही अपेक्षा आहे. तसेच या घटनेत सर्वांनी सरकारच्या चौकशीला साथ द्यायला हवी," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.