
ठाणे : (Ulhasnagar) उल्हासनगर येथे राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकराच्या आणि कुटुंबियांच्या सांगण्यावरुन आपल्या एक महिन्याच्या बाळाला कळव्यातील एका कुटुंबाला कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय केवळ १० हजार रुपयात दत्तक दिले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लिव्ह इन रिलेशनशिप (Live in Relationship) मध्ये राहत असलेल्या प्रियकराच्या सांगण्यावरून बालिकेला दत्तक दिले असल्याची माहिती संबंधित तरुणीने दिली आहे. यावेळी तिने संपूर्ण प्रकार सांगत बालिकेला पुन्हा देण्याची मागणी केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
जानेवारी महिन्याच्या अखेरीस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या १८१ या हेल्पलाईनद्वारे उल्हासनगर येथे राहणाऱ्या संबंधित बालिकेच्या आईनेच म्हणजेच २१ वर्षीय तरुणीनेच कौटुंबिक वादाबाबत तक्रार केली होती. ही माहिती मिळताच उल्हासनगर येथील सखी केंद्र १ यांच्याकडून त्वरित तरुणीला संपर्क साधण्यात आला व तिला उल्हासनगर येथील महिला व बाल विकास विभागाच्या सखी केंद्राच्या' कार्यालयात बोलावून घेण्यात आलेतरुणी ही अविवाहिता असून ती लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एका पुरुषासोबत राहत होती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यामध्ये वाद होत असल्याने ती तरुणी तिच्या आईसोबत उल्हासनगर येथे राहत होती. ती गरोदर असताना त्या पुरुषाने होणाऱ्या बाळाचे पालकत्व स्वीकारण्यास परवानगी दिली होती, परंतु बाळाचा जन्म झाल्यानंतर मात्र आपली आर्थिक परिस्थिती खराब असून आपण त्या बाळाला सांभाळू शकत नसल्याने ते बाळ एखाद्या गरजू कुटुंबाला देण्याचे दोन्ही पालकांनी ठरवले. यानंतर दोघांनी कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया न राबविता बाळाला कळव्यातील एका कुटुंबाला दत्तक दिले.
सखी केंद्राला बाळाच्या खरेदी विक्री झाल्याबद्दल लक्षात येताच महिला बाल विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाला झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर बालसंरक्षण विभागाकडून कारवाई करत कळव्यातील संबंधित कुटुंबियांकडून बालिकेला ताब्यात घेण्यात आलं. बाळाची परिस्थिती ठीक नाही हे लक्षात येताच बाल कल्याण समिती ठाणे यांच्या आदेशानुसार बाळाला उपचाराकरिता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आले. दवाखान्यातून बाळाला सोडल्यानंतर बाल कल्याण समिती समोर हजर करून त्याला जननी आशिष दत्तक संस्था डोंबिवली येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ठाणे बाल कल्याण समिती यांनी दिलेल्या आदेशानुसार बाळाचे खरे पालक तसेच बेकायदेशीर दत्तक पालक यांच्यावर विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात संबंधित प्रकरणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.