लव्ह जिहाद रोखण्यासाठी गठित समिती महिला आणि संस्कृती रक्षणाचे काम करेल

मंत्री मंगलप्रभात लोढा : आमदार रईस शेख लव्ह जिहादचे समर्थक?

    15-Feb-2025
Total Views |

Lodha 
 
मुंबई : लव्ह जिहाद रोखण्यासाठी गठित करण्यात आलेली समिती महिला आणि संस्कृती रक्षणाचे काम करेल, अशी प्रतिक्रिया मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
लव्ह जिहाद आणि बळजबरीने होणारे धर्मांतरण याबाबत अभ्यास करण्यासाठी राज्यात पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "मुंबईसह राज्यात आंतरधर्मीय विवाहाच्या माध्यमातून उघडकीस येणाऱ्या लव्ह जिहादच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलत आहे. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीचे गठन करण्यात आले असून ही समिती इतर राज्यांनी लव्ह जिहाद विरोधी तसेच फसवणूक करून केलेल्या धर्मांतर विरोधात केलेल्या कायद्याचा अभ्यास करून राज्यातील कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारला शिफारस करणार आहे. लव्ह जिहाद ही एक मोठी समस्या असून अशी प्रकरणे रोखण्यासाठी काम करणारी समिती महिला आणि संस्कृती रक्षणासाठी काम करेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
हे वाचलंत का? -  उबाठा गटातील तीन नेत्यांची हकालपट्टी! कोकणातील गळती कायम
 
ते पुढे म्हणाले की, "आमदार रईस शेख लव्ह जिहाद प्रकरणाचे समर्थक आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो, लव्ह जिहाद विरोधात आवाज उठवल्यामुळे त्यांनी तक्रार दाखल केली होती. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे लव्ह जिहादचे समर्थन केले होते. परंतू, आता या अभ्यास समितीच्या माध्यमातून लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्यासाठी काम केले जाईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
यावेळी त्यांनी मागील काही दिवसांत मुंबईसह परिसरातझालेल्या लव्ह जिहादच्या दुर्दैवी घटनांची माहिती दिली. "आफताब अमीन नामक व्यक्तीने श्रद्धा वालकरची तुकडे करून हत्या केली. इक्बाल शेखने रूपाली चंदनशिवे या तरुणीची हत्या केली. पूनम क्षीरसागर या तरुणीला निजाम खानने मारले. उरणच्या यशश्री शिंदेला दाऊद शेखने मारले. मालाडच्या सोनम शुक्लाचा शहाजीब अन्सारीने दुर्दैवी अंत केला. या लव्ह जिहाद प्रकरणात कोणी हत्या केल्या? कोणत्या भावनेने केल्या? हे समोर दिसत असतानासुद्धा लव्ह जिहादसारखे काहीच घडत नाही, असे तुम्ही कसे म्हणू शकता? असा सवाल मंत्री लोढा यांनी आमदार रईस शेख यांना केला.