मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही! भास्कर जाधवांनी व्यक्त केली खंत
15-Feb-2025
Total Views | 51
मुंबई : मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, अशी खंत उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली. एकीकडे कोकणात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु असताना आता भास्कर जाधवही पक्षात नाराज आहेत का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
भास्कर जाधव म्हणाले की, "माझी राजकारणातील सुरुवात होती त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर तेव्हाच्या शिबीरांमध्ये भाषणे करायची संधी मला मिळायची. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे मनोहर जोशींना अनेकदा सांगायचे की, या पोराला महाराष्ट्रात फिरवा. या पोराला महाराष्ट्रात फिरवले तर ग्रामीण भागातील तळागाळातील माणून आपल्या पक्षाशी जोडला जाईल. शिवसेनाप्रमुखांचे आणि त्यानंतर शरद पवारांचे आशीर्वाद मला लाभले."
"महाराष्ट्रात मला मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्रात मी लोकांशी बोलतो, त्यांच्याशी संवाद साधतो, यात कुठलाही नाटकीपणा किंवा लबाडी नसते. खोटे बोललेले मला आवडत नाही. महाराष्ट्रातील लोकांना हे भावते. पण माझे दुर्दैव प्रत्येकवेळी मला आडवे आले आहे. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही. याची अनेक कारणे आहेत. अनेक अडचणी येतात. पण आजही महाराष्ट्रात मला मानणारा एक वर्ग तयार झाला आहे, याचे मला अप्रुप आणि समाधान आहे," असे ते म्हणाले.