लहान मुलांना गोष्टी आवडतातच. या आवडीमध्ये काळाच्या ओघात काहीही बदल झालेला नाही. बदल झाला असेलच तर तो गोष्टी सांगण्याच्या माध्यमांमध्ये. बालनाट्य हा त्यातीलच एक माध्यम. यातून विविध गोष्टींचे प्रत्यक्ष सादरीकरण करून, लहान मुलांना ते सादर करता येते. या बालनाट्य निर्मितेचेही विविध टप्पे आहेत. यातील संहिता या महत्वाच्या टप्प्याचा घेतलेला आढावा....
त्रिकोण प्रेमाचा, चौकोन कुटुंबाचा, याबद्दल तुम्ही ऐकले असेल. पण, तुम्ही षटकोनबद्दल ऐकले आहे का? षटकोन बालनाट्याचा. नुकताच एक दिवसीय बालनाट्य महोत्सव संपवून, हा लेख लिहायला घेते आहे. या महोत्सवात सहा एकांकिका सादर झाल्या. 5 ते 15 वयोगटातली 75 मुले यात सहभागी झाली होती. सकाळी 10 वाजता सुरू झालेला महोत्सव, दुपारी 3 वाजता संपन्न झाला, तो आगामी बालनाट्य शिबिरांच्या घोषणेने. जल्लोष आणि आनंदाचे वातावरण, त्याला सगळे संपल्याची दुःखकळा. असे प्रथमच झाले असावे जिथे लेखिका, दिग्दर्शिका आणि निर्माती एकच व्यक्ती असेल. माझ्याकरिता हा आनंदाचा क्षण होताच. कारण, हाती घेतलेले बालकांचे महाकुंभ उत्तम पार पडले. पण, हे माझ्या एकटीचे काम नव्हते आणि नाट्य कलाकृती म्हटली की, हे कोणा एकाचे काम कधीच नसते. नाट्यकला ही सांघिक कला आहे आणि ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ याच धोरणावर चालते. मी तर म्हणेन, बालनाट्याला षटकोनी बाजू असतात. बालनाट्याची निर्मिती सहा महत्त्वपूर्ण घटकांवर अवलंबून असते. हे घटक समान कोन षटकोनाच्या आकारात व्यवस्थित बसवले की, एका सुंदर कलाकृतीची निर्मिती होते. बालनाट्य म्हटले की, सुरुवात होते ती षटकोनातल्या पहिल्या कोनापासून. तो कोन म्हणजे संहिता. आज आपण संहितेविषयी बोलू.
संहिता
नाट्य म्हणजे निव्वळ मनोरंजन नसून, ते विचार पोहोचवण्याचे माध्यम आहे. म्हणूनच संहिता ठरवते नाटकाची पोत, विषयाची खोली, त्याचा बाल मनावर होणारा परिणाम आणि त्यातून मिळणारा अमर्यादित आनंद! संहिता निवडताना किंवा नाटक लिहिताना, मी लहान मुलांच्या भावविश्वात शिरून त्यांच्याशी संवाद साधून लिहिते. ते लिहीत असताना, त्यांच्यातलीच एक होऊन, त्यांचेच शब्द घेऊन, हळुवारपणे विचारांची पेरणी करत, चांगल्या वाईटाचे भान ठेवून त्यांना समजेल, रुचेल अशा भाषेत मांडणी करते. जेणेकरून त्यांना बोलायला सहज व समजायला सोप्या पण, तरीही आकर्षक अशा काही अलंकारिक शब्दांचा वापर करून लिहिते. बालनाट्य एकांकिका असो, वा दोन अंकी नाटक, ते फक्त वाचले की त्याचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. त्याचे सादरीकरण जोवर होत नाही, तोवर त्याचे फुलात रूपांतर होणार नाही. एखाद्या कळीचा गंध घेऊन, तिच्यात किती पाकळ्या आहेत, हे समजत नाही, तसेच, बालनाटकाचे आहे. नाट्यकला ही सादर करण्याची कला आहे आणि ती सादर झाली नाही, तर कशालाच काही अर्थ उरत नाही. म्हणूनच बालनाट्य हे बोलके असावे. आजच्या जेन-झी, जेन-अल्फा मुलांना आपलेसे वाटणारे असावे. ते सतत बदलते असावे. ते संस्कारक्षम असावे. पण, मनोरंजक जास्त असावे. संस्कार करण्याचा हट्ट नसावा, तसेच नाटकाची संहिता ही अवघड आणि जड शब्दांनी भरलेली नसावी. कारण, नाटक म्हणजे भाषेचा तास नसतो. 100 टक्के फॉर्म्युला म्हणजे, दुर्जनांचा नाश आणि सज्जनांचा विजय या साध्या सोप्या संहितेला घेऊन तुम्ही नाटक लिहिले आणि ते सादर केले, तर ते मुलांना आवडतेच. तुम्ही लिहू शकता की नाही, हे तुम्ही लहान असतानाच कळते, असे मला वाटते. मोठे होऊन तुम्ही कुठल्या प्रकारचे लेखन करता ते नंतर ठरते. लहान मुलांना जर निबंध लेखनात चांगले गुण मिळत असतील, तर ते लिहू शकतात. लिहिताना त्यांना आनंद मिळत असेल, तर त्यात तुम्ही, सातत्य आणण्याची गरज आहे. आतापर्यंत 12 एकांकिका मी लिहू शकले आहे. चार पुस्तकांमध्ये असलेल्या या एकांकिका मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतही उपलब्ध आहेत. तीन सोडल्यास, प्रत्येक नाटकाचे सादरीकरण झाले आहे. त्याशिवाय लेखन पूर्णत्वाला येत नाही, असे मला वाटते.
सगळ्याच एकांकिकांच्या संहिता, मला माझ्या मुलीशी गप्पा मारताना सुचल्या. मुलांचे जग सुंदर तर असतेच, पण समस्या, घटना, प्रसंग याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोनही फार वेगळा असतो. त्यांच्या बोलण्यातून हे अनेकदा तुम्हाला हे जाणवले असेल. वेळ मिळाला, तर एखाद्या सोसायटीच्या ‘चिल्ड्रन्स प्ले एरिया’मध्ये जाऊन बसा. दगड होऊन बसू शकलात तर उत्तम. कारण, लक्षात ठेवा इथे तुम्ही नकोसे पण असू शकता. भावनाशून्य राहा, उगाचच सल्ले द्यायला तर अजिबात जाऊ नका आणि हो, मला काहीच समजत नाही आहे असे भाव जर चेहर्यावर आणता आले, तर तुमची विचारपूस ते आपणहून करतील. पण, सावध राहा कारण ते तुम्हाला परग्रहातला माणूस नाही, तर एक एकाकी कोळी ज्याचे मावशीत रूपांतर होऊन, तो आपल्याला बघायला आला आहे असेही समजू शकतात.
मी 13 वर्षांची होते, तेव्हापासून माझे वडील संजय पेंडसे यांना साहाय्यक म्हणून बालनाट्य बसवताना, मदत करत आले आहेत. मुलांचे भावविश्व मोठ्यांपेक्षा वेगळे असते आणि त्यांची कल्पनाशक्ती विश्वरूपी असते. काहीच्या काही शक्यता ते मांडतात आणि त्यात ते रमतातही. तुम्हाला पटत नाही आणि पालकांना आवडतही नाही. कधीकधी वरणाला फोडणी द्यायची असते, ऑफिसला जायला उशीर होत असतो, म्हणून ते तुम्हाला सांगत नाहीत. पण, मला मात्र मुलांमध्ये राहायला प्रचंड आवडते. मी रमते, मुलांनाही मी आवडते. कारण, मी त्यांच्यातलीच एक होते. काही महिन्यांपूर्वी मी, एका बालनाट्य स्पर्धेत परीक्षक म्हणून गेले होते. तिथे आम्हा परीक्षकांमध्ये ‘बालनाट्य कसे असावे’ हा विषय सुरू होता. बोलता बोलता आमच्यातला एक म्हणाला, “मला तर बाई कंटाळा आला आहे, त्या पर्या आणि राक्षस पाहून. किती तेच तेच.” इथे माझे मत वेगळे होते. आपल्याला कंटाळा आला असेल, येऊ शकतो. पण, मुलांना नाही ना आला अजून. हं परी आणि राक्षसाचा नाटकात अतिरेक टाळावा. त्यांना प्राणी, पक्षी, राक्षस, परी अजूनही त्यांची माणसे वाटतात. ते आजही त्यांच्याशी बोलतात, त्यांच्या खेळात त्यांना सामील करतात. हे मात्र निश्चित आहे की, जे पूर्वी आठ वर्षांच्या मुलाला आवडायचे, ते आता सहा वर्षांच्या मुलाला आवडते. मुलं हल्ली लवकर मॅच्युअर व्हायला लागली आहेत. निरागस भाव हरपत चालला आहे. पण, घाबरून जायचे कारण नाही. भीतीची घंटा असेल, पण आपण वेळेत पावले उचलू. जोपर्यंत परी, राक्षस आहेत, तोपर्यंत बालपण टिकून आहे. ज्या दिवशी ते गायब होतील, त्या दिवशी समजावे, या जगातली माणुसकी हरपत चालली आहे. आज लेख संहितेवर होता. पुढच्या लेखात आपण थोडे पालकांविषयी बोलू. कारण, नाटकासाठी संहिता हवी आणि त्यानंतर हवे बाल कलाकार. पण, त्यांच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर एक पडाव पार करावा लागतो आणि तो म्हणजे आजकालचे पालक!
रानी राधिका देशपांडे