किन्नर आखाड्यावर पुन्हा हल्ला; महामंडलेश्वर कल्याणीनंद गिरि गंभीर जखमी

    14-Feb-2025
Total Views |

Kalyaninand Giri

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Attack on Kinnar Akhara ) 
किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर कल्याणीनंद गिरि उपाख्य ​​छोटी माँ यांच्यावर गुरुवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी रात्री महाकुंभ परिसरात प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. आशीर्वाद घेण्याच्या बहाण्याने काही अज्ञातांनी त्यांची गाडी थांबवली आणि त्याचक्षणी त्यांनी चाकू हल्ला केला. यादरम्यान बचावासाठी आलेले शिष्यही जखमी झाले. यापूर्वी आखाड्यातील महामंडलेश्वर हिमांगी सखी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. सध्या कल्याणीनंद गिरि यांच्यासह जखमी शिष्यांना महाकुंभ नगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हे वाचलंत का? : शरद पवार गटाच्या मते भिडे गुरुजींचे धारकरी 'हिंदू आतंकवादी'

महाकुंभ नगरच्या सेक्टर १६ मधील किन्नर आखाड्यातून रात्री महामंडलेश्वर कल्याणानंद गिरी आपल्या किन्नर आखाड्यातून बाहेर पडल्या. त्या आपल्या गाडीतून सादियापूरला घरी जात असताना संगम लोअर रोडवर आशीर्वाद घेण्याच्या बहाण्याने काही लोकांनी त्यांची गाडी थांबवली. गाडी थांबल्यानंतर काही अज्ञातांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. बचावासाठी आलेल्या त्याच्या तीन शिष्यांवरही हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर काही दागिनेही लुटल्याची माहिती आहे.

कट असल्याचा संशय
महामंडलेश्वर कल्याणीनंद गिरी यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला, त्यावरून त्यांच्यावर हल्ला करण्याचा कट हल्लेखोरांनी आधीच आखला असावा, असा अंदाज आहे. यापूर्वी किन्नर आखाड्याच्या जगदगुरु हिमांगी सखी यांच्यावरही असाच जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात हिमांगी सखी गंभीर जखमी झाल्या. सदर हल्ला ममता कुलकर्णीच्या प्रकरणाशी जोडला जात असल्याने आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यावर आरोप होत आहेत.