सुदर्शन घुलेला १४ फेब्रुवारीपर्यंत पुन्हा पोलीस कोठडी
12-Feb-2025
Total Views |
बीड : (Santosh Deshmukh) मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याला दि. १२ फेब्रुवारीला केज न्यायलयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाला पूरक खंडणी प्रकरणाचा गुन्हा आहे. याच खंडणी प्रकरणात सुदर्शन घुले याला केज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याच्यावर अवादा पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात प्रत्यक्ष सहभागी असल्याचा गुन्हा दाखल आहे.
सुदर्शन खुले याला सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर यांनी केज न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायाधीश एस. व्ही. पावसकर यांच्या न्यायालयात हजर केले होते. यावेळी सीआयडीने सुदर्शन घुलेच्या ५ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. परंतु, न्यायमूर्ती पावसकर यांनी सुदर्शन घुलेला १४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोन दिवसांत सीआयडीकडून सुदर्शन घुले याची पुन्हा कसून चौकशी केली जाईल. पोलिसांकडून सुदर्शन घुले याच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार आहेत.
दरम्यान, चार दिवसांपूर्वीच सुदर्शन घुले याच्या मोबाईल मधील डाटा रिकव्हर करण्यात आला होता. तशी माहिती मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. सुदर्शन घुलेच्या मोबाइलमधील डेटा रिकव्हर झाला असून तो पूर्ण हस्तगत करण्यात आला आहे. त्याचबरोबर विष्णू चाटेच्या मोबाइलमधील डेटा रिकव्हर केला असून दोघांच्या मोबाईल्समधील काही गोष्टी या तपासात अडथळा येऊ नये म्हणून तपास पूर्ण होईपर्यंत गोपनीय ठेवल्या आहेत, असेही धनंजय देशमुखांनी सांगितले आहे.