मुंबईकरांची चिंता वाढली! मुंबईत जीबीएसचा पहिला मृत्यू

    12-Feb-2025
Total Views |

gbs death
 
मुंबई : (Mumbai GBS Outbreak) राज्यात 'गुईलेन बॅरे सिंड्रोम' म्हणजेच जीबीएसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईतही जीबीएसचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. अशातच आता मुंबईमधील एका जीबीएसग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
जीबीएस आजाराने त्रस्त असलेला एका ५३ वर्षीय रुग्णाचा सोमवारी दि. १० फेब्रुवारी रोजी रात्री मृत्यू झाला. हा रुग्ण वडाळ्यातील रहिवाशी असून व्ही.एन.देसाई रुग्णालयात वॉर्डबॉयचे काम करीत होता. अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना २३ जानेवारी रोजी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या तपासणीत त्यांना जीबीएसची लागण झाल्याचे निदान समोर आले होते. त्यानंतर त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
 
पुण्यात जीबीएसच्या उद्रेकामुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून तब्बल २२ जण व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आरोग्य विभागाकडूनही पाणी उकळून पिण्याचं आवाहन केले जात आहे.आता जीबीएसमुळे राज्यात ८ जणांचा जीबीएस आजाराने मृत्यू झाला आहे.