मुंबई : शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, यामुळे संजय राऊतांनी थयथयाट करण्यास सुरुवात केली आहे. शरद पवारांनी शिंदेंचा सन्मान केल्याने आम्हाला वेदना झाल्या असल्याचे ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, "गेल्या काही काळात महाराष्ट्राचे राजकारण फार विचित्र दिशेने चालले आहे. कोण कोणाला टोप्या घातलंय आणि कोण कोणाच्या टोप्या उडवतंय, कोण कोणाला गुगली टाकतंय आणि कोण स्वत:च हिट विकेट होताहेत, हे पुन्हा एकदा समजून घ्यावे लागेल. ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी यायला नको होते, ही आमची भावना आहे. आम्ही कोणत्या तोंडाने महाराष्ट्राच्या लोकांसमोर जाणार? राजकारणात कुणी कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो हे सगळे ठीक आहे. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली आणि ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणे म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला आणि अस्मितेला धक्का लावणे आहे. महाराष्ट्राच्या जनतेला हे पटलेले नाही."
"शरद पवार जेष्ठ नेते आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडली त्यांना आपण सन्मानित केल्यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला वेदना झाल्या असतील. आम्हाला तुमचे दिल्लीचे राजकारण काय आहे ते माहित नाही. पण आम्हालासुद्धा थोडे राजकारण कळते. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचे आणि अजित पवारांचे गुफ्तगू होत असेल, तरीही आम्ही भान राखून आमचे पाऊल टाकत असतो. पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे. गेल्या ३० वर्षात ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने नेण्याचे काम शिवसेनेने केले आहे. एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या राजकारणात फार उशीरा आले. पवार साहेबांना माहिती हवी असल्यास आमचे कार्यकर्ते राजन विचारे त्यांना माहिती देण्यासाठी जातील," अशा शब्दात संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.