“...तर आरोपी वाशीच्या जंगलातून बाहेर गेले नसते”; नवीन सीसीटीव्ही फुटेजवर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
11-Feb-2025
Total Views |
बीड : (Santosh Deshmukh) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपी ज्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून पळून जात होते, त्या गाडीचा पोलिस पाठलाग करत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. यावर धनंजय देशमुख यांनी ‘जंगल परिसरात पोलिस रेकी करत असते, तर आरोपी वाशीच्या जंगलातून बाहेर गेले नसते’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले धनंजय देशमुख?
सगळे आरोपी वाशीच्या हद्दीमध्ये गाडी सोडून पळाले. आरोपींना पकडण्यासाठी पोलिस त्यांच्यामागावर होते, त्या पोलिसांना कमीतकमी हे माहिती असायला हवं होतं की, कुठलं जंगल आहे, त्या जंगलातून बाहेर पडण्याचे कोणते मार्ग आहेत. त्या रस्त्यावर पोलिस यंत्रणा असती, प्रत्येक जागेवर एका पोलिसाला जरी रेकी करायला ठेवले असते. तर आरोपी वाशीच्या जंगलातून बाहेर गेले नसते,पण दुर्देव आहे, पोलिसांच्या समोर आरोपी पळून गेलेत, असेही ते म्हणाले
काय आहे नवीन सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय?
जप्त करण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज ९ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७. १० चे आहे. याच दिवशी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास संतोष देशमुख यांची अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सगळे आरोपी धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथून पळून गेले होते. त्यावेळी वाशी येथील पारा चौकातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. सदर स्कॉर्पिओ गाडीत एकूण ६ आरोपी होते. केज पोलिस त्यांचा पाठलाग करत होते. त्यांनी वाशी चौकात नाकाबंदीही केली होती. मात्र पोलिस पाठलाग करत असल्याची माहिती मिळताच आरोपी गाडी सोडून पळून गेले होते.