मुंबई : भारताला वस्त्रोउद्योगाचा समृध्द इतिहास लाभला आहे. आपला हा संस्कृतिक ठेवा हीच आपली ओळख आहे, म्हणून आजच्या तारखेला भारतीय फॅशन ग्लोबल व्हायला हवी असे प्रतिपादन विख्यात फॅशन डिझायनर नचिकेत बर्वे यांनी केले. मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकमान्य सेवा संघ, पारले संचालित श्री. व. फाटक ग्रंथसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमाचे तिसरे पुष्प रविवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी पार पडले. यावेळी माध्यम क्षेत्रातील अभ्यासक, लेखक संजीव लाटकर यांनी पारल्याचे सुपूत्र असलेल्या नचिकेत बर्वे यांच्याशी संवाद साधला. फॅशन डिझायानिंगच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी छाप निर्माण करणाऱ्या नचिकेत बर्वे यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह बॉलिवुड मधील अनेक कलाकारांचे कॉस्च्युम डिझाईन केले आहेत. या कार्यक्रमात त्यांनी आपला जीवनप्रवास तसेच फॅशन डिझायनिंग या क्षेत्राचे व्याकरण लोकांसमोर उलगडले. फॅशन म्हणजे केवळ वेगवेगळे कपडे घालने नसून, तो आपल्या भोवतालाशी केलेला संवाद आहे असे मत नचिकेत यांनी व्यक्त केले. चित्रपटासाठी कपडे तयार करत असताना, कशा प्रकारे संशोधन करावे लागते या बद्दलचे अनुभव त्यांनी सांगितले. संवादक संजीव लाटकर यांनी फॅशन आणि स्टाईल यांची व्याप्ती व त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो या बद्दल नचिकेत यांच्याशी संवाद साधला. आपल्या कामात नाविन्य टिकवून ठेवायचे असल्यास अवतीभोवती असलेल्या गोष्टींबद्दल कुतुहल असणे गरजेचे आहे हा यशाचा मंत्र सुद्धा नचिकेत यांनी दिला.
पुणेरी पगड्यांचे संशोधन!
आपल्या विद्यार्थीदशेतील संशोधनाची आठवण सांगताना नचिकेत म्हणाले की " पुणेरी पगड्यांचा इतिहास नेमका काय या विषयावर मी संशोधन केले. १२० मीटरच्या मलामल कापडापासून एक पगडी तयार केली जायची. आपले कारागीर अत्यंत बारकाईने ही पगडी तयार करायचे.केळकर वास्तुसंग्रहालयातील लोकमान्य टिळकांनी घातलेल्या पगडीला स्पर्श करणयचा अनुभव मी घेतला. हा इतिहासातील मोलाचा दस्तावेज आहे. आपण या गोष्टींचं जतन केलं पाहिजे. तसेच या वारश्याचे पुनर्जीवन करायला हवे" असे मत नचिकेत यांनी मांडले.