माँ के हाथ का खाना...

    09-Dec-2025
Total Views |
 
Food
 
‘माँ के हाथ का खाना’ ही आता जाहिरातीपुरती टॅगलाईन ठरतेय की काय, अशी स्थिती. कारण, घरच्या जेवणाची जागा हा ‘फास्ट फूड’ आणि रेस्टॉरंटमधल्या ‘डिलिशियस डीशेस’ने घेतली. पण, शेवटी म्हणतात ना, घरचं जेवण ते घरचंच जेवण. त्यादृष्टीने एकूणच कौटुंबिक पातळीवर काय करता येईल, त्याचा ऊहापोह करणारा हा लेख...
माझ्या आईचे बेसन लाडू काय मस्त होतात”, "माझी आई चकल्या बनवण्यात एक्सपर्टच आहे,” "चिकन खावं तर माझ्या आईच्या हातचं! बोटं चाटत राहाल,” आमच्या पिढीत अशा चर्चा कधी ना कधी होतच असायच्या. आजीच्या हातच्या पुरणपोळ्या, आत्याच्या हातच्या करंज्या, मामीकडच्या कोथिंबीर वड्या अशी प्रत्येकाची काही ना काही खासीयत असायची. मला तर माझ्या मैत्रिणीच्या आईने केलेला रवा केक आणि दुसरी एक मैत्रीण डब्यात आणायची ती पीठ पेरलेली सिमला मिरचीची भाजी यांची चव अजून आठवते.
 
पण, आता मुलांना विचारून बघा. त्यांना असं काही सांगता येईल का? कोणत्या ब्रॅण्डचा पिझ्झा नाहीतर कुठल्या रेस्टॉरंट (हॉटेल नाही म्हणायचं!) मधली थाय करी चांगली असते, ते त्यांना पटकन सांगता येईल. पण, स्वतःच्या आईच्या किंवा आजीच्या हातचा कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो, या प्रश्नावर ते नक्की विचारात पडतील. आत्या, मामी, मावशी, काकीकडचे तर विचारूच नका. कारण, हल्ली सहजच कोणी कोणाच्या घरी जात नाही. काहीतरी कारणाने ठरवून वगैरे गेलं, तरी बरेचदा जेवायला बाहेर जाणं किंवा बाहेरून ऑर्डर केलेलेच पदार्थ खाणं, हेच घडतं. एकमेकांना डबे पाठवणं तर आता ‘आऊटडेटेड’ झालंय!
 
अन्नामध्ये जशी पोषणमूल्ये असतात, तसे त्यामध्ये भावही असतात. सात्विक-राजस-तामस भाव. ताजं गरम अन्न सात्विक, चटपटीत मसालेदार अन्न राजस, तर शिळं अन्न हे तामसी असतं. खाल्लेल्या अन्नामुळे जसं शरीराचं पोषण होतं, तसंच मनाचंही होत असतं. जसे अन्नाचे भाव असतात, तसेच बनवणार्‍याच्या भावना, त्याच्या हातचा गुण त्या पदार्थात उतरत असतात. घरातील व्यक्ती (स्त्री/पुरुष) जेव्हा आपल्या माणसांसाठी एखादा पदार्थ बनवते, तेव्हा खाणार्‍यांबद्दल तिच्या मनात प्रेम आणि आत्मीयता असते.त्यामुळे अशा अन्नामुळे साहाजिकच शरीराचे आणि मनाचेही पोषण होत असते.
 
मला हे मान्य आहे की, आज घरातील स्त्री सतत घरात नसते. ती कामा-व्यवसायानिमित्त घराबाहेर पडते. थकून जाते. तिला दोन्ही वेळेस स्वयंपाक करणं शय नसतं. खूपजणींना मदतनीस बाईच्या साहाय्याने स्वयंपाक करून घ्यावा लागतो. पण, स्वयंपाक ही फक्त घरच्या स्त्रीचीच मक्तेदारी न मानता, घरातील मुलांनी आणि पुरुषांनीही यात लक्ष घातले, तर गृहलक्ष्मीची ओढाताण कमी होईल. एकवेळेचा स्वयंपाक जरी घरातील सर्वांनी मिळून केला, तर त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम सर्वांच्या आरोग्यावर होईल.
 
आजकाल जर पुरुषांनी स्वयंपाकघरात हातभार लावला, तर काहीतरी वेगळं आणि ‘ग्रेट’ केल्यासारखं वाटतं. पण, पूर्वी सगळ्याच पुरुषांना स्वयंपाक करता येत असे. मासिक धर्मामुळे बायका बाहेर बसत; त्यावेळी घरातील पुरुषच स्वयंपाक करत असत. माझ्या आजोबांना, वडिलांना, काकांना सगळ्यांना चांगला स्वयंपाक येत होता. आज बायकांनी बाहेर बसायची पद्धत बंद झाली, तरी त्या करिअरसाठी किंवा आवश्यक अर्थार्जनासाठी बाहेर पडतात. त्यामुळे घरातील सर्वांनी मिळून स्वयंपाक करणे, ही काळाची गरज आहे. तसेच शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेरगावी राहावं लागलं, तरी स्वतःपुरतं रांधून खाता आलं पाहिजे. चोचले कमी करा. व्हरायटीची गरज नाही. डाळ, भात, भाजी, चपाती, पोहे, उपमा यांसारखे पदार्थ तयार करता येणं हे गरजेचे आहे, अन्यथा कमावलेला पैसा आजारांवरच खर्च होणार आहे.
 
मदतनीसांच्या साहाय्याने का होईना, पण घरात बनलेलेच अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत.सतत बाहेरून ऑर्डर करून, मागवून खाण्याने शरीराचं आणि मनाचंही कुपोषण होतं. विकतचे पदार्थ कशापासून बनवले आहेत, कधी बनवले आहेत, हे माहीत नसते. झीशीर्शीींरींर्ळींशी वापरून ते खराब दिसू नयेत, एवढंच केलेलं असतं. पण, त्यांचा मूळचा ताजेपणा लोपलेला असतो. त्यात तमोगुण निर्माण होतो. ते खाऊन तेवढ्यापुरती भूक भागली आणि जिभेला आनंद मिळाला, तरी नवनिर्माणाची क्रिया घडत नाही. ते फक्त शरीरात साठून राहतात.
 
आज-काल वाढदिवसाला घरी बोलावून हातात फूड पॅकेट्स देऊन बोळवण केली जाते. सोनूच्या घरी शेवपुरी होती. मन्याच्या वाढदिवसाला इडल्या होत्या आणि जितूच्या आईने त्याच्या वाढदिवसाला काय भारी कटलेट बनवले होते. असं काही घडत नाही. टोलेजंग इमारतींच्या वस्त्यांमध्ये तर सतत वाढदिवस, घाणेरडे रंग वापरलेले केक्स आणि पॅक्ड फूडचा सतत मारा चालूच. कुठेतरी थांबवा हे सारं! लहानपणापासून मुलांना या आणि असल्याच पदार्थांची चटक आणि सवय लागल्यावर कशाला आठवेल त्यांना ‘माँ के हाथ का खाना?’
 
घरातल्या डाळ-भाताला ‘गरिबाचं खाणं’ म्हणून हिणवून बाहेरचे पिझ्झा-बर्गर खाणारे कर्मदरिद्री मला माहीत आहेत आणि या पदार्थांमुळे लहानपणापासून मुलांमध्ये लठ्ठपणाच्या समस्या, निर्माण होतात, लहान वयात वाढलेला रक्तदाब, मधुमेह, हार्मोन्सचे असंतुलन आणि पुढे त्यातून उद्भवणारं वंध्यत्व अशी ही अनारोग्याची साखळी वाढतच जाते.
घरात आपण जेव्हा जेवण बनवतो, तेव्हा घरातील सर्वांच्या आवडीनिवडीसोबत आरोग्याचाही विचार केलेला असतो. एकमेकांसोबत वाटून खाण्यामुळे एकमेकांचा विचार करण्याची सवय लागते. ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ या मंत्राप्रमाणे केवळ पोट भरण्यासाठी आणि जिह्वातुष्टीसाठी अन्नसेवन करू नये, तर शरीराच्या स्वास्थ्याचा विचार करूनच खावं आणि घरी किंवा घरचं जेवणानेच ते शय आहे.
 
आपल्याकडे जेवढं पिकतं, त्यातील निम्मं तर वायाच जातं. ताटात घेऊन फेकून देणं, गरज नसताना खाणं, उरलं म्हणून टाकून देणं यांसारख्या कारणांमुळे अन्नाची भरमसाठ नासाडी होत असते आणि दुसरीकडे उपासमारीने लोक मरत असतात. तसेच अति फोफावलेल्या फूड इंडस्ट्री, रेस्टॉरंट्स आणि खाऊगल्ल्यांमुळे पर्यावरणाचंही नुकसान होत आहे, ते वेगळंच!
स्वतःच्या आरोग्याचा विचार जर खरोखरच तुम्ही करत असाल, तर आजपासून बाहेरचं खाणं थांबवा आणि घरी जेवण्याची, घरचा डबा नेण्याची सवय लावा. मला खात्री आहे, तुमच्यासोबत डबा खाणारे पार्टनर्स नक्की वाढतील आणि तुम्ही लंड टाईमची वेगळीच मजा चाखाल. कितीतरी आजारही असेच दूर होतील की नाही पाहा!
- वैद्या चंदाराणी बिराजदार
(लेखिका एम. डी. आयुर्वेद आहेत.) (आरोग्य भारती, कोकण प्रांताद्वारे प्रकाशित)