ठाणे : ( Green Fuel ) उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या आदेशानुसार बेकरी व तंदूर पदार्थ बनविणाऱ्या हॉटेलचालकांनी इंधनासाठी कोळसा व लाकडाचा वापर न करता पर्यावरणपूरक असलेल्या एलपीजी, पीएनजी किंवा विजेचा वापर करणे बंधनकारक असून याबाबत मार्गदर्शन करण्याच्या अनुषंगाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेस मा.अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या कार्यशाळेस बेकरी व हॉटेल असोसिऐशनचे प्रतिनिधी, FSSI प्रतिनिधी, महानगर गॅस वितरणचे प्रतिनिधी मुकेश पनोत्रा (AVP Marketing), LPG चे प्रतिनधी सचिन जाधव (Head of Information Technology Kelvin energy solution) आणि मुकुल अहुजा (Regional Officer HPCL) उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेतर्फे मुख्य अग्निशमन अधिकारी, परवाना विभाग, पर्यावरण विभाग यांचे अधिकारी उपस्थित होते.
या कार्यशाळेत पर्यावरण विभागातर्फे नमुद करण्यात आले की, प्राथमिक सर्वेक्षणामध्ये ठामपा क्षेत्रात एकूण ४७ बेकरी असून, त्यापैकी ३० बेकऱ्या इलेक्ट्रिक इंधनावरती सुरू आहेत. सदर कार्यशाळेमध्ये बेकरी असोसिऐशन व हॉटेल असोसिऐशन यांनी त्यांचे अर्ज गॅस जोडणीसाठी बऱ्याच काळापासून प्रलंबित असल्याचे मत व्यक्त केले, तसेच नवीन इंधनावर स्थलांतरीत करताना बेकरी निष्कासन करण्यासाठी जास्त खर्च जास्त वेळ लागल्याचे नमूद केले. त्यावर महानगर गॅस वितरण यांनी प्रलंबित बेकरी व हॉटेल यांची GPS माहिती असलेला तक्ता देण्याची विनंती केली.
त्याबाबत पुढील १५ दिवसांत लवकरच सर्वेक्षण करून सुसाध्यता तपासण्यात येईल, असे सांगितले. तसेच प्रदूषण नियंत्रणाच्या कारणास्तव बेकरी व हॉटेल धारकांना काही प्रमाणात खर्चात सवलत हि देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी PNG शक्य नाही, त्या ठिकाणी LPG इंधनाचा वापर करावा, तसेच वापरल्या जाणाऱ्या गॅस Volume वर काही सवलत देता येईल का, याबाबत विचारण करण्यात येईल, असे HPCL च्या अधिका-याने नमूद केले. शितिजा पेडणेकर, युतिका दलाल आणि विलास गिते World Resource Institude (WRI) आणि Asar Social Impact Advisor (ASAR) या सामाजिक संस्थांनी कार्यशाळा ही घेतली.