तपोवनातील ‘वृक्ष’पुराण...

    09-Dec-2025
Total Views |
Tapovan Trees
 
प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे तपोवन, हीच खरी तपोवनाची ओळख. हीच ओळख जपण्यासाठी नाशिककरही कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून नाशिक महापालिका साधुग्रामसाठी तपोवनातील वृक्ष तोडणार असल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये झळकली आणि एकच गदारोळ सुरू झाला. तपोवनातील झाडे तोडू देणार नाही, यासाठी झुंडीच्या झुंडी तपोवनात जायला सुरुवात झाली. गेल्या १५ ते २० दिवसांपासून सुरू झालेला हा सिलसिला अजूनही सुरूच आहे. हे कमीच की काय, म्हणून परवा रविवारचा सुटीचा दिवस पाहून जवळपास विविध प्रकारची १६ आंदोलनेही करण्यात आली. काहींनी तर तपोवनाचे पर्यटन करत सहल काढली आणि वनभोजनाचाही आनंदही उपभोगला. अनेक सिनेकलाकारही येथे येऊन आपला विरोध दर्शवत, मार्गस्थ झाले. त्यातच सत्ताधारी पक्षातले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकार्‍यांनीही या वृक्षतोडीला विरोध दर्शवत, आंदोलन केले.
 
मात्र, हे करत असताना शहरात इतरही कामे अनधिकृतरीत्या होत आहेत, त्याकडे मात्र सगळ्यांनीच साळसूदपणे डोळेझाक केलेली दिसते. ही अनध़िकृत कामे आणि त्याकडे केलेली डोळेझाक यावरही त्यांनी आज उत्तर देण्याची गरज आहे. सुजाण नाशिककरांनीही वृक्षतोडीच्या आडून सिंहस्थ कुंभमेळ्याला तर विरोध होत नाही ना, या अंगानेही एकदा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, शहरातील काही तथाकथित पत्रकार आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी कुंभमेळा, साधू, संत आले-गेले-मेले तरी आपल्याला फरक पडत नसल्याचे माध्यमांना सांगितले. अशाच प्रकारचा सूर नाशिकमध्येदेखील काही कम्युनिस्ट विचारसरणीच्या लोकांकडूनही लावला जात आहे. यामुळे विचारी माणूसही भरकण्याची भीती आहे. परिणामी, सध्या सुरू असलेला विरोध नेमका कशाला आहे, याचा एकद विचार करण्याची गरज आहे, अन्यथा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जगभरातून भाविक येतील, तेव्हा त्यांच्यासमोर तमाशा व्हायला नको. त्यामुळेच तपोवनात सध्या सुरू असलेले पर्यटन आणि विरोध नेमक्या कोणत्या विचारसरणीचे लोक करत आहेत, याचाही एकदा विचार व्हावा.
‘सोनिया’ भक्तीचा घाट
आंदोलने, गाणी, सहली, पर्यटन आणि वनभोजनाने सध्या तपोवनाचा परिसर दणाणून गेल्याचे दिसून येत आहे. दररोज हजारो लोक आपली वाट वाकडी करत, येथे उपस्थिती लावत आहेत. त्यामुळे येथील झाडांना अचानकच, आपण सेलिब्रिटी झाल्याचा ‘फील’ नक्कीच येत असेल. कारण, येथे येणारा प्रत्येकजण झाडाला मिठी मारल्याशिवाय काही माघारी फिरत नाही. यातले अनेकजण मनापासून येत असले, तरी वाहत्या गंगेत हात धुवून घेणार्‍यांचीही संख्या निश्चितच कमी नाही. त्यामुळे सत्तेचा मेवा खाणारेही आपल्या मित्रपक्षाला अडचणीत आणत असल्याचे, यानिमित्ताने अधोरेखित झाले. तर, विरोधी पक्षातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उबाठा गटानेही महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवत, नाशिककरांना उकसावण्याचा प्रयत्न करून पाहिला. इतर छोटे-मोठे पक्ष आणि तथाकथित पर्यावरणप्रेमीतर तपोवनात ठाणच मांडून बसले आहेत. या सगळ्यात आपणही मागे नाही, हे दाखविण्यासाठी धडपडणार्‍या काँग्रेसने सोनिया गांधी यांचा वाढदिवसच तपोवनात साजरा करण्याचा घाट घातला आहे.
 
मंगळवार, दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत, वनभोजन आणि बैठ्या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सर्व आजी-माजी खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, सर्व नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष, काँग्रेस सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, अल्पसंख्याक विभाग, अनुसूचित जाती-जमाती विभाग, ओबीसी विभाग, असंघटित कामगार, सोशल मीडिया विभाग, भटके-विमुक्त विभाग, विज्ञान विभाग, पर्यावरण विभाग व सर्व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्यासाठीचे फर्मान काढण्यात आले आहे. पण, शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच काँग्रेस पक्ष पूर्णपणे क्षीण झाला आहे. त्यामुळेच गत विधानसभेला शहरातील तीनपैकी एका विधानसभा मतदारसंघावर दावा करूनही, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला ठेंगा दाखवत, हट्टाने दोन जागा लढवल्या. तर, शरद पवार गटानेही साथ दिली नाही. आता पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम तपोवनात आयोजित करण्यात आला आहे खरा; पण याला गर्दी जमेल का? हाच मोठा प्रश्न आहे.
 
- विराम गांगुर्डे