ताडोबातून दुसरी वाघीण सह्याद्रीत; 'छोट्या तारा'च्या मुलीचे स्थानांतरण

    09-Dec-2025
Total Views |
tadoba to sahyadri


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र स्थानांतरण प्रकल्पाअंतर्गत तोडाबामधून मंगळवार दि. ९ डिसेंबर रोजी 'T7S2' या वाघिणीला स्थानांतरित करण्यात आले (tadoba to sahyadri). ताबोडातील प्रसिद्ध वाघीण छोटी तारा या वाघिणीची ती मुलगी असून तिचे वय साधरण दोन वर्षांचे आहे (tadoba to sahyadri). आॅपरेशन ताराअंतर्गत या वाघिणीला स्थानांतरित करण्यात आल्याने तिला 'तारा' या नावाने ओळखले जाईल. (tadoba to sahyadri)
 
 
ताडोबातील पांढरपौनी भागात ८ डिसेंबर रोजी 'T7S2' या वाघिणीला पकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची टीम सह्याद्रीच्या दिशेने रवाना झाली. मंगळवार दि. ९ डिसेंबर रोजी रात्री उशिरा या वाघिणीला चांदोली राष्ट्रीय उद्यानात तयार करण्यात आलेल्या विल्गनवासाच्या पिंजऱ्यात सोडण्यात आले. व्याघ्र स्थानांतरण प्रकल्पाअंतर्गत पुढच्या पाच वर्षांमध्ये एकूण आठ वाघ हे पेंच आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणले जाणार आहेत. यामध्ये तीन मादी आणि पाच वाघांचा समावेश आहे. त्यामधील दोन माद्यांना आणण्यात आले आहे. यापूर्वी ताडोबातून सह्याद्रीत आणलेल्या चंदा या वाघिणीची ओळख यापुढेही चंदा या नावानेच राहणार आहे. मात्र, आता 'T7S2' या वाघिणीला तारा या नावाने पुकारले जाईल. 'T7S2' म्हणजेच ताराची वंशावळ फार समृद्ध आहे. कारण, ती ताडोबात सात वेळा पिल्लांना जन्मास घालणाऱ्या छोट्या ताराची मुलगी आहे.
 
 
२००५-०६ पासून येडाअण्णा हा प्रबळ नर वाघ मोहर्लीपासून ताडोबाच्या मध्य भागापर्यंत प्रचंड मोठ्या भागावर अनेक वर्षे राज्य करत होता. येडाअण्णा आणि तारा यांना २००९ मध्ये चार पिल्लं झाली. त्या पिल्लांना सर्किट, ओखान, छोटी तारा आणि इमली अशी नावे देण्यात आली. त्यातील सर्किट अतिशय द्वाड होता. त्यामुळे पुढे ती सगळी ‘सर्किट गँग’ म्हणून ओळखली जाऊ लागली. या गॅंगमधील छोटी तारा ताडोबाच्या जामनी भागात स्थिरावली. गेल्या १२ वर्षांत म्हणजेच २०१३ ते २०२५ या काळात या छोट्या ताराने गब्बर, नामदेव, टायसन, मटकासूर, रुद्र, युवराज, मोगली अशा प्रबळ नर वाघांचे वंश वृद्धिंगत करताना सातवेळा पिल्लांना जन्माला घातले. आता सह्याद्रीत आलेली T7S2 म्हणजेच तारा ही नवीन वाघिण छोट्या ताराला मोगली या वाघापासून झालेली मुलगी आहे. तिला एक बहीण देखील आहे.
सद्यपरिस्थितीत सह्याद्रीत तीन नर वाघ असून त्यापैकी दोन हे चांदोली राष्ट्रीय उद्यानात आहेत. त्यामुळे उद्यानात दोन वाघिणींची आवश्यकता असल्याने 'एसटीआर टी४' (चंदा) बरोबरीनेच आता ताडोबामधून 'T7S2' या वाघिणीचे स्थानांतरण करण्यात आले आहे. याठिकाणी तिचा सांकेतिक क्रमांक 'एसटीआर टी५' असा असेल. सध्या 'एसटीआर टी१' (सेनापती) आणि 'एसटीआर टी२' (सुभेदार) हे दोन्ही नर 'एसटीआर टी४' (चंदा) पासून प्रत्येकी ९ आणि २५ किलोमीटरच्या परिसरात आहे. - तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प