जबाबदारी म्हणजे नियंत्रण करणे नव्हे, तर अपेक्षित परिणामांची जाणीवपूर्वक जडणघडण. नियंत्रण हे भीतीतून येते. उदाहरणार्थ, गोष्टी हाताबाहेर जातील, लोक आपल्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाहीत, परिणाम आपल्या बाजूने लागणार नाहीत या भीतीतून. जेव्हा आपण नियंत्रण ठेवण्याच्या नादात असतो, तेव्हा आपण हटवादी बनतो, अस्वस्थ होतो आणि शेवटी निराश होतो. पण, खरी जबाबदारी याहून खोल पातळीवर काम करते.
जबाबदारी... आपण बहुतेक वेळा हा शब्द अवजड ओझ्यासारखा घेतो. कर्तव्य, बंधन किंवा अपेक्षांशी बांधलेला पाहतो. पण, खरंच जबाबदारी केवळ कामांची यादी पूर्ण करण्यापुरती मर्यादित असावी का की ती आपल्या आयुष्यातील आव्हानांशी आपण कसा संवाद साधतो, यावर अधिक अवलंबून असावी?
'Responsibility comes from responding with ability' हे वाय आपल्या जगण्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलून टाकतं. आपण बहुतेक वेळा जबाबदारीकडे कर्तव्य, ताण, अपेक्षा आणि दबाव म्हणून पाहतो. खरी जबाबदारी ओझं नाही, ती म्हणजे जाणीवपूर्वक प्रतिसाद देण्याची आपली क्षमता आणि हाच सजग प्रतिसाद तणाव कमी करण्याची सर्वांत प्रभावी गुरुकिल्ली ठरू शकतो. हा विचार आपल्याला नेतृत्व, नैतिकता आणि वैयक्तिक विकास यांकडे पाहण्याची एक अधिक जिवंत, व्यापक आणि सकारात्मक दृष्टी देतो.
आपल्या आयुष्यात दररोज असंख्य प्रसंग घडतात. काही छोटे, काही अस्वस्थ करणारे, काही आनंद देणारे, तर काही धक्के देणारे. तणाव तेव्हाच वाढतो, जेव्हा आपण या सगळ्या प्रसंगांना नकळतपणे, सवयीने, भीतीने किंवा भावनिक आवेगाने प्रतिक्रिया देतो. कुणी दुखावलं की लगेच राग, काही बिघडलं की घाईघाईने घबराट, अपयश आलं की लगेच स्वतःलाच दोष देणे, या सगळ्या प्रतिक्रिया आपल्या मनात तणावाचा साठा वाढवतात.
परंतु, जाणीवपूर्वक प्रतिसाद दिला की चित्र बदलतं. प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यात सूक्ष्म, पण अत्यंत महत्त्वाचा फरक आहे. प्रतिक्रिया म्हणजे नकळत घडणारा भावनिक उद्रेक. प्रतिसाद म्हणजे थोडा थांबून, विचार करून केलेली शांत कृती. जिथे प्रतिसाद असतो, तिथे निवड असते. आणि जिथे निवड असते, तिथे माणूस तणावाचा गुलाम राहात नाही. म्हणजेच जबाबदारीला ओझं म्हणून पाहण्याऐवजी, आयुष्य आपल्या ताटात जे काही टाकेल, त्याला सामोरं जाण्याची आपली क्षमता म्हणून आपण तिला पाहू शकतो.
आपल्याला आतून खचवणार्या अनेक गोष्टी प्रत्यक्ष परिस्थितीमुळे नाहीत, तर आपण त्या परिस्थितीकडे कसं पाहतो, कसा प्रतिसाद देतो, यामुळे असतात. एकाच समस्येला दोन लोक वेगवेगळ्या पद्धतीने सामोरे जातात, एक पूर्णपणे कोसळतो, दुसरा त्यातून शिकतो. फरक केवळ जागरूक प्रतिसादाचा असतो. जबाबदारी म्हणजे गरज असताना, योग्य वेळी, कोणतीही दिरंगाई किंवा सबबी न देता, आपल्याला जे करायचं आहे, ते करण्याची आपली तयारी आणि क्षमता. यासाठी परिपक्वता लागते, ती म्हणजे अनेक कामांच्या आणि शयतांचा गर्दीतून योग्य निवड करण्याची आणि आपल्या कर्तव्यांना प्राधान्य देण्याची समज लागते. कृती केवळ विचारातून निर्माण होत नाही; ती जबाबदारी स्वीकारण्याच्या तयार मानसिकतेतून उगम पावते.
राग, भीती, दुःख, चिंता या सार्या भावना मानवीच आहेत. पण, त्यांचे गुलाम होणं आवश्यक नाही. तणाव तेव्हाच वाढतो, जेव्हा भावना आपल्या बुद्धीचा व तर्कशास्त्राचा ताबा घेतात. पण, जाणीवपूर्वक जगायला शिकलं की, आपण भावनांना वस्तुनिष्ठदृष्ट्या पाहू शकतो, समजू शकतो आणि त्यांच्यावर मात करू शकतो. त्यामुळे तणाव आपल्यावर दडपण न आणता आपण तणावाचं व्यवस्थापन करतो. ही जाणीव एका दिवसात तयार होत नाही. ती रोजच्या छोट्या निर्णयांतून घडते. हे छोटे निर्णयच मनाला स्थैर्य देतात आणि तणावाला आपोआप कमी करतात.
यश, पैसा, पद, प्रसिद्धी यांतूनच आयुष्य संतुष्ट होत नाही. आपण रागात कसं बोलतो, अपयशातून कसा उभं राहतो, दुःखात कसं सावरतो आणि थकव्यातही कसं पुढे जातो, या अनुभवातूनच आपल्या आयुष्याची खरी ओळख घडत जाते आणि हेच क्षण तुमच्या मनावरचा तणाव वाढवूही शकतात किंवा तुम्हाला अधिक शांत, स्थिर आणि तणावाला प्रतिसाद देण्यास सक्षमही बनवू शकतात.
म्हणूनच, जबाबदारी म्हणजे सगळं नियंत्रणात ठेवणं नव्हे, तर आपल्या आयुष्यात सजगपणे सहभागी होणं. प्रत्येक क्षणाकडे पूर्ण जाणीवेनं पाहणं. कारण, कोणता क्षण आयुष्याला कलाटणी देईल, हे आपण कधीच ओळखू शकत नाही. म्हणूनच प्रत्येक क्षण महत्त्वाचा मानल्यास जास्त सुरक्षित वाटू शकते.
जबाबदारी म्हणजे नियंत्रण करणे नव्हे, तर अपेक्षित परिणामाची जाणीवपूर्वक जडणघडण. नियंत्रण हे भीतीतून येते. उदाहरणार्थ, गोष्टी हाताबाहेर जातील, लोक आपल्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाहीत, परिणाम आपल्या बाजूने लागणार नाहीत या भीतीतून. जेव्हा आपण नियंत्रण ठेवण्याच्या नादात असतो, तेव्हा आपण हटवादी बनतो, अस्वस्थ होतो आणि शेवटी निराश होतो. पण, खरी जबाबदारी याहून खोल पातळीवर काम करते. ती असा प्रश्न विचारत नाही की, मी हे कसं नियंत्रित करू? तिचे आव्हान असते की, या क्षणातून सर्वात चांगला, शहाणपणाचा आणि उत्पादक परिणाम कसा घडवू शकतो?
जेव्हा तुमचं लक्ष नियंत्रणावरून अपेक्षित परिणामाकडे वळतं, तेव्हा तुमची ऊर्जा दिशा बदलते. तुम्ही लोकांना आणि परिस्थितीला नियंत्रित करणं थांबवता आणि स्वतःची स्पष्टता समजून घ्यायला लागता. तुम्ही परिणाम जबरदस्तीने घडवण्याऐवजी तुमच्या प्रतिसादाचं शुद्धीकरण करू लागता. तुम्हाला हे उमगतं की परिस्थिती, लोक किंवा वेळ तुमच्या हातात नसू शकतात. तथापि, तुमच्या प्रतिसादाची गुणवत्ता मात्र नेहमीच तुमच्या हातात असते आणि हीच गुणवत्ता शेवटी तुमच्या आयुष्याची गुणवत्ता ठरवते.
जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक प्रतिसाद द्यायला शिकता, तेव्हा तणाव हळूहळू पकड सोडतो. मन हलकं होतं. निर्णय स्पष्ट होतात. भावना संतुलित होतात. आणि आयुष्य केवळ जगण्यासाठी नव्हे, तर जाणीवपूर्वक घडवण्यासाठी तुमच्या हातात येतं. म्हणून खरी जबाबदारी म्हणजे परिस्थितीवर पकड घट्ट करण्याचा प्रयत्न नव्हे, तर आपल्या उद्देश, जागरूकता आणि कृतीला अर्थपूर्ण परिणामाच्या दिशेने पुन्हा पुन्हा, क्षणोक्षणी घेऊन जाणे!
डॉ. शुभांगी पारकर