प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःसोबतच समाज-देशाच्या उत्थानाचे स्वप्न पाहणार्या आणि त्यासाठी कार्यरत मिरजच्या राजू शिंदे यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. भव्य मंदिर उभारणी झाली. तो क्षण राजू शिंदे यांच्यासाठी ऐतिहासिक आनंदाचा क्षण होता. कारण, कारसेवेसाठी त्यांनी १९९१ साली मुलायमसिंहांच्या राज्यात तुरुंगवास भोगला होता. पुढे १९९२ साली ते तीन मित्रांसोबत सायकलवरून मिरजेहून अयोध्येला गेले होते. वाटेतील प्रत्येक गावात राम मंदिराबाबत जनमत जाणून घेतले होते.
नांदेडला एका आजीबाईंनी त्यांना विचारले. "बाबांनो, कुठंशी निघालात हे झेंडे घेऊन? राजू शिंदे म्हणाले, "अयोध्येला रामललाकडे चाललो.” त्यांनी ‘मंदिर वही बनायेंगे’चा संकल्पही सांगितला. हे सगळे एकून ती महिला श्रद्धेने म्हणाली, "पोरांनो, माझ्या घरी चला. दोन घास खा. तुमच्यासारखा विचार आपल्या सगळ्याच लोकांनी केला, तर राम मंदिर नक्की बांधले जाणार.” पुढे राजू अयोध्येला गेले. तिथे कारसेवा केली. बाबरी ढाँचा पाडताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
बाबरी ढाँचाविरोधातल्या संघर्षातच शेकडो वर्षे गेली, किती पिढ्या गेल्या. आता राम मंदिराच्या प्रतीक्षेत किती दशकं-शतकं जातील, या विचारांनी राजू आणि त्यांचे सहकारी अक्षरशः रडले होते; पण त्यांना ‘याची देही, याची डोळा’ राम मंदिरनिर्मितीचा-उभारणीचा क्षण पाहता आला. असो. यशस्वी उद्योजक म्हणून राजू शिंदे यांची मिरज-सांगलीमध्ये ख्याती. धर्मकार्याने समाजाचे उत्थान करणारे एक निःस्पृह व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख. गरजू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, गरीब बांधवांच्या हतबलतेचा गैरफायदा घेऊन कोणीही त्यांचे धर्मांतरण, मतांतरण करू नये, यासाठी राजू शिंदे सदैव दक्ष असतात. रामराज्य म्हणजे धर्माचे राज्य, लोककल्याणाचे राज्य. हे राज्य समाजमनात रूजावे, यासाठी ते काम करतात. ‘कोरोना’ काळात तर दिवसरात्र त्यांनी सेवाकार्य केले. सेवाभावी संस्थांच्या आणि प्रशासनाच्या मदतीने सांगलीमधील निराश्रित लोकांची यादी तयार केली. हे लोक रस्त्यावर बागेत पथपदावर राहायचे. हातावरचे पोट होते त्यांचे. ‘कोरोना’ काळात यांना काम मिळणे शक्यच नव्हते. त्यामुळे दररोजच्या अन्नाची ददात होती. या लोकांना सकाळ-संध्याकाळ ताजे अन्न देण्याचे सेवाकार्य राजू शिंदे यांनी समविचारी सहकार्यांच्या मदतीने केले.
राजू शिंदे यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ. राजू शिंदे हे मूळचे मिरजेचे. त्यांचे बाबा मारोतराव हे पशुसंवर्धन खात्यात कामाला होते, तर आई शकुंतला गृहिणी. उभयतांना पाच अपत्ये. त्यांपैकीच एक राजू. मराठा समाजाचे शिंदे कुटुंब तसे पारंपरिक चौकटीत जगणारे. देवधर्म, कुळाचार मानणारे. राजू यांना इंजिनिअर बनायचे होते. सगळे ठीकच होते, पण मारोतराव यांची बदली डहाणूला झाली आणि त्यांच्या आई-बाबांनी त्यांना निक्षून सांगितले की, "तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस. तुला गावापासून दूर जाऊ देणार नाही.” त्यामुळे मारोतरावांनी नोकरीचा राजीनामा दिला. नोकरी नसल्याने घरी पैशांची चणचण सुरू झाली आणि त्याचे दुष्परिणाम राजू यांच्या शिक्षणावर झाले. सहाव्या इयत्तेतले राजू आजी-आजोबांना त्यांच्या कांदे-बटाटे विकण्याच्या व्यवसायात मदत करू लागले. थोडीफार मोलमजुरी करू लागले. दिवस काबाडकष्टाचे होते.
पण, या काळात प्रेरणा देणारे होते, ते म्हणजे संघजीवन. ते खेळण्यासाठी म्हणून रा. स्व. संघाच्या शाखेत जाऊ लागले. समाज आणि देशासंदर्भातले तत्त्वनिष्ठ विचार त्यांच्यात रूजले. आपल्या कोणत्याही कृत्यात समाज आणि देशाच्या भल्यासाठीचे काहीतरी असायलाच हवे, हा निश्चय ठाम झाला. पुढे ते दहावी उत्तीर्ण झाले; पण पैशांअभावी ते इंजिनिअरिंगच्या शिक्षणाला प्रवेश घेऊ शकले नाहीत. त्यांनी खासगी संस्थेतून ‘मॅकेनिकल ड्राफ्समन’चे प्रशिक्षण घेतले. अर्थात, हे शिक्षणही त्यांना सहजासहजी घेता आले नाही. त्यासाठी एक वर्ष त्यांना काबाडकष्ट करावे लागले. मिळालेल्या पैशांतून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर खासगी नोकरी करत असतानाच त्यांनी ‘ऑटोमोबाईल्स कम्पोनंट’ बनवण्याचे आधुनिक तंत्रज्ञान माहिती आत्मसात केली.
या सगळ्या काळात त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. चार बहिणींचे शिक्षण आणि त्यांचे विवाह ही जबाबदारी होतीच. राजू यांनी कष्टाने पैसा जमवला आणि त्यांच्यावर असलेली जबाबदारी पार पाडली. पुढे यथावकाश त्यांचा विवाह ऋतुजा यांच्याशी झाला; पण आर्थिक परिस्थिती यथातथाच होती. त्याची झळ संसाराला बसत होती. इतकी की, राजू यांचे बाळ आजारी असले की, चांगल्या दवाखान्यात नेण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसत. त्यामुळे यांनी ठरवले की, हे दिवस बदलायचे. त्यांना तशी संधीही आली. त्यांनी मित्राच्या सोबतीने ‘ऑटोमोबाईल कम्पोनंट’ बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. दिवस पालटले. आर्थिक सुबत्ता आली; पण राजू दिवस विसरले नाहीत. त्यांनी सामाजिक कार्य सुरूच ठेवले. ते म्हणतात, ’देश हमें देता हैं सब कुछ, हम भी तों कुछ देना सिखे’. त्यामुळेच देशाच्या भल्यासाठी खारीचा वाटा उचलणार आहे. तरुणाई धर्मसंरक्षकतेसोबतच उच्चशिक्षित आणि स्वावलंबी कशी होईल, यासाठी आयुष्यभर काम करणार आहे. राजू शिंदे यांच्या विचारकार्याला शुभेच्छा!