भारताची टनेलिंग राजधानी घडवणाऱ्या नेतृत्वाचा गौरव

डॉ.संजय मुखर्जी यांचा राष्ट्रीय पातळीवर विशेष सन्मान

Total Views |
 
Dr. Sanjay Mukherjee
 
मुंबई : ( Dr. Sanjay Mukherjee ) कधीच न थांबणारे, झपाट्याने बदलणारे आणि सतत पुढे धावणारे शहर अशी मुंबईची ओळख आहे. जिथे समुद्राची लाट आणि मानवी ऊर्जेची लाट दररोज एकमेकांना भेटतात. या शहराच्या पृष्ठभागावर सतत धावणारा वाहतुकीचा प्रवाह दिसतो, पण आज मुंबईच्या विकासकथेचा खरा अध्याय भूमिगत लिहिला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात या व्यापक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी एमएमआरडीएचे अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी महानगर आहेत.
 
हे पाहता भारताच्या पायाभूत सुविधा विकासात मुंबईला नवे रूप देणाऱ्या काही अत्यंत गुंतागुंतीच्या, अभूतपूर्व आणि अभियांत्रिकीदृष्ट्या आव्हानात्मक भूमिगत प्रकल्पांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व केल्याबद्दल टनलिंग असोसिएशन ऑफ इंडियातर्फे एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांना "राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि टनेलिंग क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान" हा प्रतिष्ठित विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या वतीने हा सन्मान संयुक्त महानगर आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी स्वीकारला.
 
मुंबईच्या शहरी भूभागाखाली सुरू असलेली अभूतपूर्व क्रांती
 
डॉ. मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगर प्रदेश आज एक अद्वितीय परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात आहे. एक अशी प्रक्रिया, ज्यात शहराच्या पायाभूत सुविधांना भविष्यातील मागण्या पेलण्याची नव्या पद्धतीने क्षमता दिली जात आहे. समुद्रात खोल ट्रेंचेस, बेसाल्ट खडकांचे स्तंभ, तांत्रिक जटिलता आणि शहरी घनता यांचा सामना करत एमएमआरडीएने अभियांत्रिकी शक्यतांच्या सीमा ओलांडणारे प्रकल्प यशस्वीपणे पुढे नेले आहेत.
 
महानगरीय कनेक्टिव्हिटीचे धैर्यशील मार्ग
 
उच्च परिणामकारक जलवाहिन्या, प्रस्तावित भूमिगत मेट्रो मार्ग आणि देशातील सर्वात लांब व महत्त्वाकांक्षी शहरी रस्ता बोगदे अशा विविध प्रकल्पांचे नेतृत्व किंवा मार्गदर्शन करताना, ‘टनल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. मुखर्जी यांनी भारतातील अनेक महत्त्वपूर्ण भूमिगत प्रकल्प साकारण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. या प्रकल्पांमध्ये ऑरेंज गेट–मरीनड्राईव्ह अर्बन रोड टनेल, ठाणे–बोरिवली ट्विन टनेल, ऐरोली–कटाई नाका टनेल, गोरेगाव मुलुंड लिंक रोड टनेल, मुंबई कोस्टल रोड टनेल, मेट्रो लाईन 7A आणि आगामी भूमिगत मेट्रो मार्ग, अमर महल–वडाळा–परळ जलवाहिनी, गुंदवली–भांडुप जलवाहिनी, सूर्या व तुंगारेश्वर जलवाहिनी प्रणाली तसेच एमएमआरमधील इतर प्रमुख जलपुरवठा आणि सांडपाणी टनेल प्रकल्पांचा समावेश आहे.
 
“बोगदे हे फक्त पायाभूत सुविधा नसतात तर ते भविष्यातल्या शहराच्या श्वास वाहिन्या असतात. प्रत्येक रस्त्याखाली मला नवी दृष्टी दिसते, ती वाहतुकीची, जलव्यवस्थेची, टिकावाची आणि अधिक सक्षम मुंबईची.”
 
- डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे, महानगर आयुक्त
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.