बंगालमध्ये गीतापाठानिमित्ताने उसळला भगवा जनसागर!

    09-Dec-2025   
Total Views |
West Bengal
 
पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहरामध्ये भगव्या ध्वजाखाली जनसागर उसळल्याचे चित्र नुकतेच पाहायला मिळाले, याला निमित्त झाले ते गीतापठनाच्या कार्यक्रमाचे! एकीकडे ममता बॅनर्जी यांचे सरकार मुस्लीम लांगूलचालानाची परिसीमा गाठत असताना, गीतापठनामुळे हिंदूची दृढता अधोरेखित झाली आहे.
 
प. बंगालमधील ममता बॅनर्जी यांची राजवट हिंदू समाजाच्या विरुद्ध भूमिका घेत असताना, त्या राज्याची राजधानी कोलकातामध्ये ‘सनातन संस्कृती संसद’ यांच्या वतीने आयोजित ‘गीतापाठ’ कार्यक्रमात ६.५ लाख हिंदू सहभागी झाले होते. राजधानी कोलकाता शहरात आयोजित हा कार्यक्रम, बंगालमधील सर्वात मोठ्या आध्यात्मिक मेळाव्यापैकी एक मानला जात आहे. या कार्यक्रमास राज्यपाल, ज्येष्ठ संत-महंत, महत्त्वाचे राजकीय नेते उपस्थित होते. कोलकाता येथील प्रसिद्ध ब्रिगेड परेड मैदानावर हा कार्यक्रम योजण्यात आला होता. या ‘गीतापाठ’ कार्यक्रमात प. बंगालच्या विविध भागातील हिंदूंप्रमाणेच, आसपासच्या राज्यातील हिंदू समाजही सहभागी झाला होता. ‘पंच लाखो कोन्थे गीतापाठ’ असे या कार्यक्रमाचे नाव होते.
 
या कार्यक्रमास पाच लाख हिंदू येतील अशी अपेक्षा होती; पण त्यापेक्षा कितीतरी जास्त, म्हणजे ६.५ लाख हिंदू या कार्यक्रमास आले. या कार्यक्रमासाठी तीन भव्य व्यासपीठे उभारण्यात आली होती. तसेच, योग्य सुरक्षाव्यवस्थाही ठेवण्यात आली होती. प. बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून, सर्वांना मार्गदर्शन केले. ‘भगवद्गीता’ हे ‘परमेश्वराचे गीत’ असल्याचा उल्लेख करून ‘गीते’ला आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्व असल्याचे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले. "समाज आणि आपल्या देशाप्रती आपली जी कर्तव्ये आहेत, त्याची प्रेरणा ‘गीते’पासून आपणास मिळते,” असे राज्यपाल म्हणाले. या कार्यक्रमास ‘बागेश्वरधाम’चे प्रमुखही उपस्थित होते. त्यांनी आपल्या ‘एस’ समाजमाध्यमावरील खात्यावर, आपण ‘गीतापाठ’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोलकाता येथे आलो असल्याचे म्हटले. तसेच, "आम्हास ‘गजवा-ए-हिंद’ नको आहे, आम्हाला ‘भगवा-ए-हिंद’ पाहिजे,” असे ‘एस’वर म्हटले आहे. केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार, बंगाल प्रदेश भाजप अध्यक्ष समीक भट्टाचार्य, माजी खासदार लोकेट चटर्जी, आमदार अग्निमित्र पॉल आदि उपस्थित होते.
 
ब्रिगेड परेड मैदानावर प्रामुख्याने राजकीय पक्षांच्या सभा होत असतात; पण या ‘गीतापाठ’च्या निमित्ताने या मैदानावर ‘भगवा’ जनसागर उसळला होता. ‘सनातन संस्कृती संसद’ या संघटनेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. आयोजकांनी सांगितले की, बंगालची सखोल आध्यात्मिक परंपरेवर प्रकाश टाकण्यासाठी आणि सलोखा वृद्धिंगत करण्याच्या हेतूनेच, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास साध्वी ऋतंभरा उपस्थित होत्या. तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायून कबीर यांचा बंगालमध्ये ‘बाबरी’सदृश मशिदीची पायाभरणी करण्याचा जो कार्यक्रम योजला होता, त्याबद्दल साध्वी ऋतंभरा यांना विचारले असता, "या देशात बाबर किंवा बाबरी असे काही नाही. एखादा विटांचे बांधकाम बांधू शकेल; पण कोणीही आपल्या हृदयात बाबरास स्थान देऊ शकणार नाही. हा देश रामाशी संबंधित आहे. तो सदैव रामाचाच राहणार आहे. केवळ या देशात भगवाच फडकत राहील आणि हेच चिरकालिक सत्य आहे, ” असे त्या म्हणाल्या.
 
काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील उडुपी येथे आयोजित कार्यक्रमात, एक लाख भाविकांनी ‘गीते’च्या १५व्या अध्यायाचे पठण केले होते. त्या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. कर्नाटकात आयोजित ‘गीतोत्सवा’ची आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या उपस्थितीत सांगता झाली. आता प. बंगालमध्ये आयोजित ‘गीतापाठ’ कार्यक्रमास ६.५ लाख भाविक उपस्थित होते.
 
ईशान्य भारत तोडण्याचे कारस्थान!
 
बांगलादेशचा माजी लष्करी अधिकारी जमातशी संबंधित नेता कर्नल अब्दुल हक याने ईशान्य भारत भारतापासून तोडण्यासाठी, बांगलादेशमधील युवकांनी लष्करी प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले आहे. ईशान्य भारत ताब्यात घेऊन, त्या भागाचे सात स्वतंत्र देश बनविल्याशिवाय बांगलादेश सुरक्षित राहणार नाही. ईशान्य भारताचे स्वतंत्र देशांमध्ये रूपांतर करण्यासाठी भारतविरोधी बांगलादेशी तेथे सध्या ठाण मांडून आहेत, असेही या माजी लष्करी अधिकार्‍याने म्हटले आहे. हा माजी लष्करी अधिकारी ‘बीएनपी’चा ज्येष्ठ नेताही आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना कर्नल अब्दुल हक याने, "ईशान्य भारत ताब्यात घेण्यासाठी भारतविरोधी शक्तींचे राष्ट्रीय ऐय निर्माण करण्याची आवश्यकता आहे,” असे म्हटले आहे. भारताविरुद्ध बांगलादेशच्या एका माजी लष्करी अधिकार्‍याने अत्यंत स्फोटक भाषा वापरून, बांगलादेश कोणत्या दिशेने जाऊ इच्छित असल्याचेच दाखवून दिले आहे. हा माजी लष्करी अधिकारी म्हणतो, "ईशान्य भारताचे स्वतंत्र देश निर्माण करण्यासाठी आपले लोक तेथे ठाण मांडून आहेत; पण आतापर्यंत आपण त्यांना मदत करू शकलो नाही. हे आता काही गुपित राहिलेले नाही. मी जाहीरपणे हे सांगत आहे,” असे सांगण्यासही या नेत्याने मागे-पुढे पाहिले नाही.
 
भारत बांगलादेशवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. हे लक्षात घेऊनच आपण ईशान्य भारतात नवीन देश निर्माण केले पाहिजेत. त्यासाठी येथील तरुणांनी लष्करी प्रशिक्षण घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे, असेही हक याने म्हटले आहे. केवळ बांगलादेशचे लष्कर आपला देश वाचवू शकणार नाही, हे लक्षात घेऊन आपल्या युवकांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. आपल्या देशाच्या अस्तित्वासाठी असे करणे आवश्यक आहे. आपल्याला नवीन शेजार निर्माण करण्याची गरज आहे, असेही हक याने म्हटले आहे. बांगलादेशमधील काही जहाल राजकीय नेते आणि माजी लष्करी अधिकारी भारत तोडण्याची भाषा कशी बोलत आहेत, त्याची कल्पना यावरून येईल.
‘महिलांना मशिदीत प्रवेश दिला जावा!’
 
मुस्लीम महिलांना मशिदींमध्ये प्रवेश दिला जात नाही; पण ही प्रथा मोडीत काढावी, अशी मागणी एका १६ वर्षे वयाच्या मुस्लीम मुलीने केली आहे. ‘इंडियन युनियन मुस्लीम लीग’चा नेता पनक्कड मुनावारली शिहाब थंगल याची ही मुलगी असल्याने, तिच्या मागणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या मुलीने मागणी केली म्हणून मुस्लीम लगेच त्यास अनुमती देणार नाहीतच उलट, तिच्यावर कारवाई करण्यासही मागे-पुढे पाहणार नाहीत. दि. ६ डिसेंबर रोजी त्या मुलीने ही मागणी केली. या मुलीचे नाव फातिमा नर्गिस असे आहे. या मागणीवरून मुस्लीम समाजात उलटसुलट चर्चा सुरू झाली असून, जहाल मुस्लिमांनी समाजमाध्यमांवर अत्यंत तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘मल्याळम मनोरमा’ या दैनिकाने आयोजित कार्यक्रमात बोलताना फातिमा नर्गिस हिने महिलांना मशिदीत प्रवेश करण्यावर जे निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यास कोणताही धार्मिक आधार नाही असे म्हटले आहे.
 
‘हज यात्रे’मध्ये मुस्लीम महिला सहभागी होत असतात. तेथे त्या सर्व धार्मिक विधी पार पाडतात. असे असताना स्थानिक मशिदींमध्ये मुस्लीम महिलांना प्रवेश का नाकारला जातो? असा प्रश्न त्या मुलीने उपस्थित केला आहे. महिलांना मशिदींमध्ये प्रवेश नाकारण्याची प्रथा काही लोकांनी निर्माण केली आहे, ती बदलायला हवी. ती बदलली जाईल. ती एक क्रांती ठरेल, असेही त्या मुलीने सांगितले. त्या मुलीच्या वडिलांनी मात्र आपण मुलीच्या मताशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले. मुलीने जी मागणी केली आहे, ती मुस्लीम समाजाच्या लोकभावनेशी सुसंगत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या मुलीच्या वक्तव्याने जो वाद निर्माण झाला, त्यावर पांघरूण घालण्यासाठी तिचे वडील थंगल यांनी जाहीर खुलासा केला. केरळमधील ‘सुन्नी’ समुदायाच्या विचारांशी फातिमाचे विचार जुळत नसल्याचे त्यांनी म्हटले. प्रसिद्ध मुस्लीम विद्वानांनी जे प्रस्ताव संमत केले त्याच्याशीही तिचे विचार जुळत नाहीत, असेही या ‘मुस्लीम लीग’च्या नेत्याने म्हटले आहे. केरळमधील जहाल मुस्लीम फातिमाला उजळ माथ्याने फिरू देतील का? हा आता यापुढील प्रश्न आहे.
 
 

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.