स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच काँग्रेसच्या नेतृत्वाच्या मनातील देशप्रेमाची उदात्त भावना विरून गेली. देशाच्या फाळणीमुळे चिडलेल्या हिंदू मतदारांपासून स्वत:ला सुरक्षित राखण्यासाठी, काँग्रेस नेतृत्वाने मुस्लीम समाजाला आपली मतपेढी बनविली. त्यासाठी त्याचे प्रच्छन्न लांगूलचालन सुरू झाले. त्याचाच परिणाम ‘वन्दे मातरम्’सारख्या जाज्ज्वल्य राष्ट्रीयगीताची आणि स्वा. सावरकर यांच्यासारख्या नेत्यांची उपेक्षा करण्यात झाला.
लोकसभेत सुरू असलेल्या ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रगीतावरील चर्चेत काय बोलायचे, यावरून काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे. या गीतावर टीका तर करता येत नाही; पण त्याचे थेट समर्थनही करता येत नाही, अशी त्यांची ‘सांगताही येत नाही, सहनही होत नाही,’ अशी अवस्था. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेचा प्रारंभ केला आणि आपल्या भाषणात ‘वन्दे मातरम्’ची महती अत्यंत करारीपणे सांगितली. स्वातंत्र्यलढ्यात हे गीत सर्वच स्वातंत्र्यसैनिकांचे, विशेषत: क्रांतिकारकांचे ‘राष्ट्रगीत’ कसे बनले होते, ते त्यांनी अनेक उदाहरणांवरून स्पष्ट केले. या गीतामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले असे सांगताना त्यांनी सांगितले की, या गीताच्या जयघोषात स्वातंत्र्यलढ्याचे भावनिक नेतृत्व होते. संपूर्ण देशातून तेव्हा ‘वन्दे मातरम्’चा उद्घोष होत होता. आज पुन्हा यापासून प्रेरणा घेत पुढे वाटचाल करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
इंग्रज जेव्हा त्यांच्या राणीची स्तुती भारतीयांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करीत होते, तेव्हा त्यास प्रतिरोध करण्यासाठी बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी हे गीत लिहिले. त्यात शतकानुशतके देशाच्या नसानसांत वाहणार्या भारतीय संस्कृतीचा आणि मातृभूमीच्या महत्तेचा पुनरुच्चार होता. साहजिकच, ब्रिटिश राजवट त्यामुळे चांगलीच पिसाळली. हे गीत गाणार्या लहान मुलांनाही देशद्रोही ठरवून, तुरुंगात टाकले जात होते. १९०५ मध्ये बंगालची फाळणी केल्यावर तर, या गीताला राष्ट्रगीताचाच दर्जा प्राप्त झाला.
तत्कालीन बहुसंख्य भारतीयांचा या गीताला पाठिंबा असला (आणि त्यात काही मुस्लीम नेते व क्रांतिकारकही होते), तरी कट्टर धर्मांध ‘मुस्लीम लीग’ने या गीतास विरोध केला. मोहम्मद अली जिना यांनी दि. १५ ऑटोबर १९३७ रोजी एक पत्र लिहून हा विरोध जाहीर केला. त्यामुळे नेहरू यांना आपले स्थान डळमळीत होताना दिसले.
परिणामी, त्यांनी याला प्रत्युत्तर देण्याऐवजी, या गीताचीच चिरफाड करण्यास प्रारंभ केला. जिन्ना यांच्या पत्रानंतर पाचच दिवसांनी (२० ऑटोबर १९३७) त्यांनी, सुभाषचंद्र बोस यांना एक पत्र लिहून या गीतातील उल्लेखांमुळे मुस्लिमांमध्ये रोष उत्पन्न होत असल्याचे नमूद केले होते. दि.२६ ऑटोबर रोजी कोलकत्यातील अधिवेशनात या गीताची समीक्षा करण्याचा ठराव काँग्रेसने संमत केला. त्यानुसार, या गीताची केवळ पहिली दोन कडवीच अधिकृत ठरविण्यात आली. हा सर्व इतिहासच मोदी यांनी सविस्तर समजावून सांगितला. जवाहरलाल नेहरू आणि नंतरच्या काँग्रेस नेत्यांनी केवळ मुस्लीम मतपेढीच्या लांगूलचालनासाठी या ओजस्वी गीताची कशी उपेक्षा केली, त्याचेही वर्णन करीत मोदी यांनी काँग्रेसच्या दिवाळखोर भूमिकेचे वाभाढे काढले. आपण हिंदू असल्याबद्दल नेहरू यांच्या मनात आधीच अपराधीपणाची भावना होती आणि ते मनाने इंग्रजाळलेले होते, हे त्यांनीच कबूल केले आहे. स्वाभाविकच, त्यांना ‘वन्दे मातरम्’बद्दल आत्मीयता वाटणे शयच नव्हते.
या चर्चेत सहभागी झालेल्या काँग्रेस नेत्यांची अवस्था, ‘नाक दाबून बुक्क्यांचा मार’ खाणार्या व्यक्तीसारखी झाल्याचे दिसत होते. या नेत्यांना या गीतावर टीका तर करता येत नव्हती; पण त्याचे उघड समर्थन करणेही जमत नव्हते. म्हणूनच काँग्रेस नेत्यांची भाषणे स्वातंत्र्यलढ्यात रा. स्व. संघाचा सहभाग कसा नव्हता, यांसारख्या संदर्भहीन आणि तद्दन तथ्यहीन मुद्द्यांकडे वाहवत जात होती. तसेच, सध्याच्या काही समस्यांचा उल्लेख करून सरकारवर टीका केली जात होती; पण या समस्यांचा ‘वन्दे मातरम्’शी काहीही संबंध नाही.
वास्तविक, ‘वन्दे मातरम्’ या गीतावर लोकसभेत चर्चा होते आणि हे गीत कसे राष्ट्रभावनेने ओथंबलेले आहे, भारतीयांच्या मातृभूमीबद्दल असलेल्या भावनेचे ते प्रतीक कसे आहे, हे समजावून सांगावे लागावे हीच शोकांतिका आहे. ‘वन्दे भारत’ ही घोषणा स्वातंत्र्यसैनिकांच्या आत्म्याचा आवाज होती. त्यात सर्व धर्माच्या स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश होता. भगतसिंग असो की, मदनलाल धिंगरा ‘वधस्तंभा’वरील त्यांचे अंतिम शब्द हे ‘वन्दे मातरम्’ हेच होते, यावरूनच या गीताचा महिमा लक्षात येतो. सुधीर फडके यांनी गायलेले ‘वेदमंत्राहुनि आम्हा वंद्य वन्दे मातरम्’ हे गदिमांचे गीत तर प्रसिद्धच आहे. आज मुस्लीम समाजाला खूश करण्यासाठी काँग्रेसचे नेते त्या गीताची उपेक्षा करीत आहेत आणि वर त्याचे समर्थनही करीत आहेत, ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आणि तितकीच संतापजनकही आहे.
वास्तविक, मुस्लीम समाजाने हा प्रतिष्ठेचा प्रश्न करण्याची गरज नव्हती आणि नाही. ‘वन्दे मातरम्’ या शब्दांच्या शब्दश: अर्थाऐवजी, त्यामागील भावना त्यांनी लक्षात घेतली पाहिजे; पण दिवसेंदिवस हा समाज कट्टरतेकडे झुकत चालला आहे. त्यामुळे आपल्या धार्मिक गोष्टींचे अवडंबर करण्याकडेच त्याचा कल झुकत आहे. त्याला काँग्रेस आणि समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस वगैरे अन्य कथित सेयुलर पक्ष जबाबदार आहेत. या पक्षांचे उद्दिष्ट हे कसेही करून सत्ता हस्तगत करणे हेच आहे. त्यासाठी त्यांना एक ठोस मतपेढी हवी आहे. इतकी वर्षे हिंदूंमध्ये जात, भाषा, प्रदेश आणि पंथ यावरून फूट पाडून सत्ता संपादन करणे सोपे होते; पण आता हिंदूंमध्ये जागृती होत असून, या पक्षांचे फाटाफुटीचे राजकारण त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. मुख्य म्हणजे हिंदू समाज ‘हिंदू’ म्हणून एक होत आहे.
यामुळेच मुस्लीम समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. आपल्या एकगठ्ठा मतदानाचा हवा तसा परिणाम होत नसल्याचे आणि हिंदूंच्या एकजुटीमुळे निवडणुकीत भाजपचा विजय होत असल्याचे मुस्लिमांच्या लक्षात आल्याने, या समाजात अस्वस्थता पसरली आहे. परिणामी, हा समाज दिवसेंदिवस कट्टरतेकडे झुकत चालला आहे. हिंदू मतदारांनी पाठ फिरविल्यामुळे, काँग्रेस व तत्सम सेयुलर पक्षांमध्ये मुस्लीम मते आपल्याकडे खेचण्याची चढाओढ तीव्र होत चालली आहे. नेहरूंनंतर आजतागायत काँग्रेस नेतृत्वाने लांगूलचालनाचाच वारसा पुढे चालविला आहे. सोनिया गांधी यांच्या कारकिर्दीत तर हिंदुद्वेष अधिकच वाढला. संसदेतील या चर्चेमुळे काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी सप्रमाण सिद्ध होत असून, देशातील मुस्लिमांमध्ये ‘अलगतावाद’ कसा वाढत आहे, तेही स्पष्ट होत आहे. आजच्या पिढीला हे आयतेच ज्ञान मिळत आहे, हीसुद्धा चांगलीच गोष्ट आहे.