दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य, ५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाख रुपयांचा लाभ

    08-Dec-2025
Total Views |

मुंबई : दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेतर्गत ५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाख रुपयांचे अर्थसाह्य सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते शुक्रवारी वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित खंजिराचे बोल या चित्रपटाच्या पोस्टरचेही अनावरण करण्यात आले. तसेच गणेशोत्सव रिल्स स्पर्धेच्या विजेतांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्रनाट्यमंदिरात हा सोहळा संपन्न झाला.

या वेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार मुख्य लेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू रावराणे, चित्रपट सृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ , पुरस्कार विजेते उपस्थित होते.

या चित्रपटांना मिळाले अर्थसहाय्य

या ५० चित्रपटांत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित ४, राज्य पुरस्काराने गौरवलेले ३, 'अ' दर्जा प्राप्त १० चित्रपट, 'ब' दर्जा प्राप्त २३ आणि 'क' दर्जा प्राप्त १० चित्रपटांचा समावेश आहे.

पाणी, सुमी, गोष्ट एका पैठणीची, नाळ - भाग २, गोदावरी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, भेरा, अलीबाबा आणि चाळीशीतले चोर, सत्यशोधक, पावनखिंड, विषय हार्ड, लग्नकल्लोळ, भिकारी, लाईफ लाईन, नवरदेव बीएससी अॅग्री, रघुवीर, मदार, नेबर्स, बिटर स्वीट कडुगोड, आता वेळ झाली, मोऱ्या, डाक, रांगडा, शिवरायाचा छावा, उन्मत, छापा काटा, कासरा, छत्रपती संभाजी, श्री देवी प्रसन्न, ओवा, पाणीपुरी जित्राब, मिरांडा हाऊस, गिन्नाड, ऊन सावली, सोंग्या, अंकुश, सर्कीट, गडकरी, राख, महाराजा, धोंड्या, कधी आंबट कधी गोड, बनी, फकाट, सुर लागू दे, गोप्या, भागीरथी मिसिंग, डिअर लव्ह, जन्मऋण.