राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आगाशी येथील ज्येष्ठ स्वयंसेवक आणि समाजात आदराने पाहिले जाणारे व्यक्तिमत्त्व कै. विष्णू गोविंद आपटे अर्थात अण्णा आपटे यांचा जन्म ११ मे १९२७ रोजी झाला. दोन बहिणी आणि दोन भाऊ अशा पाच भावंडांमध्ये ते सर्वात ज्येष्ठ होते. वडील लवकर निवर्तल्यामुळे, संपूर्ण १४ कुटुंबियांची जबाबदारी अण्णांनी मोठ्या हिमतीने आणि उत्तमरित्या पार पाडली. त्यांची ही कुटुंबवत्सलता आणि जबाबदारीची जाणीव आयुष्यभर त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत राहिली.
१९४५ ते १९५० या काळात अण्णा आपटे हे आगाशीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांपैकी एक होते. पाच तपाहून अधिक काळ त्यांनी स्वतःला संघ कार्यात झोकून दिले. राजकीय क्षेत्रापासून त्यांनी जाणीवपूर्वक दूर राहून केवळ सामाजिक सलोखा आणि संघटन यावर लक्ष केंद्रित केले.
कै. शरदराव कुलकर्णी, कै. सदाशिव अभ्यंकर, कै. मनोहर ताटके, कै. डॉ. जोगळेकर हे त्यांचे संघमित्र व साथीदार होते. या सर्वांच्या साहाय्याने त्यांनी आगाशी परिसरात अनेक स्वयंसेवक घडवले. कै. महेश आपटे, सुयोग आपटे, चंद्रशेखर अभ्यंकर, विनायक ताटके, माधव म्हात्रे, प्रसाद आपटे अशा अनेक स्वयंसेवकांना घडवण्यात अण्णांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी कधीही धार्मिक भेदभाव न बाळगता समाजातील सर्व थरांतील लोकांना सदैव स्नेहपूर्ण व्यवहार ठेवला. आगाशीत मणियार कुटुंबाशी त्यांचे आत्मीयतेची संबंध होते, इतके की त्यांनी त्यांच्या लग्नातील पाहुण्यांना 'जानोसा' (उत्सवातील पाहुणे) म्हणून आपल्या घरी बोलावले होते.
व्यवसायाने अण्णांनी आपला वडिलोपार्जित नर्सरीचा उद्योग अत्यंत इमान-इतबारे सांभाळला. कै. दत्तात्रेय आणि कै. शरद या त्यांच्या दोन्ही बंधूंची साथ त्यांना सदैव लाभली. यांत्रिकीकरणाच्या प्रभावापूर्वी आपटे बंधू पहाटे उठून जात्यावर साखर दळीत आणि चवदार श्रीखंड वडी तयार करत, जी मुंबई व ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होती.
नोकरीपेक्षा उद्योगात त्यांचे अधिक प्रेम होते. उद्यमशील उद्योजक आणि सचोटीने व्यवहार करणे हे अण्णांकडून शिकावे. ते स्वतः घरी ब्राह्मी तेल तयार करत असत, तसेच कावीळ' या आजारावर औषध देऊन रोग बरा करण्याबद्दल ते प्रसिद्ध होते.
आधुनिक फोन, संगणक या उपकरणापेक्षा लेखणीवर त्यांचा दृढ विश्वास होता. "हे हृदयीचे... ते हृदयी" थेट संवाद लेखणीद्वारे होऊ शकतो, असे त्यांना वाटे. व्यावसायिक आणि नातेवाईक यांच्याबरोबर त्यांचा पत्रव्यवहार नित्य चालत असे. स्वयंसेवकांनी उत्सवाला उपस्थित राहावे म्हणून ते आवर्जून चिठ्ठी पाठवत, ज्याचा आदर ठेवून स्वयंसेवक उत्साहात सहभागी होत असत.
लहानपणापासूनच संघ शाखेचे संस्कार झाल्यामुळे त्यांच्या जीवनाला एक विधायक सामाजिक दृष्टी प्राप्त झाली होती. १९४८ च्या संघ बंदीत त्यांनी खूप मोलाचे कार्य केले. संघबंदीविरोधी पत्रके गावात घरोघर वाटणे, विरारच्या रेल्वे गाड्यांवर रात्री उशिरा चिकटवणे, स्वयंसेवकांचे मनोबल कायम राखणे आणि त्यांचे एकत्रिकरण करणे, अशा सर्व गतिविधींमध्ये अण्णा नेहमीच अग्रेसर असत. संघविरोधी वातावरणाला ते निर्धाराने व निर्भयतेने सामोरे गेले. संघकार्याच्या निमित्ताने आगाशीच्या सर्व पाड्यातून त्यांचा सतत संचार चालू असे.
अण्णांचा आगाशी व परिसरातील विविध समाजोपयोगी कामांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असे. ते आगाशीच्या ब्राह्मण सेवेचे विश्वस्त आणि साने गुरुजी कथामाला, बालमंदिर यांचे पदाधिकारी होते. विवेक साप्ताहिकाच्या ग्राहक विस्तार अभियानात त्यांनी सुरुवातीच्या काळात खूप मदत केली. २००० साली झालेल्या 'भरारी-२०००' अभियानात एक अतिशय यशस्वी 'संकल्प यात्री' म्हणून ११ एप्रिल २००२ रोजी डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला. आयुष्यातील हा सर्वोच्च सन्मान असल्याचे ते जवळच्या व्यक्तींजवळ व्यक्त करत असत.
तरुण पिढीने कृतिशील होऊन संघ संबंध जोपासावेत आणि समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, अशी त्यांची खास दृष्टी होती. वसई जनता सहकारी बँक, संजिवनी रुग्णालय, सफाळे येथील आश्रम बनवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे."कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू हीच विश्रांती" या बाण्याने त्यांनी उतारवयातही प्रकृतीची चिंता न करता काम केले.
१९९८ साली गुणवान ज्येष्ठ पुत्र कै. महेश यांच्या निधनाचा, तसेच २००३ साली शरद आणि २००४ साली दत्ता या बंधूंच्या निधनाचा मोठा धक्का त्यांना सोसावा लागला. तरीही, स्वतःला आणि इतरांना धीर देत त्यांची संघ कार्याची धडपड चालूच होती. हसतमुख चेहरा, मनाला भिडणारे आपुलकीचे बोलणे, निरागस, निस्वार्थी, पारदर्शी व्यवहार यामुळे अण्णांनी प्रत्येकाला आपलेसे केले. त्यामुळे त्यांना अजातशत्रू म्हणणे यथार्थ ठरेल. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र प्रसाद आपटे, सून आणि नातवंडे आजही संघकार्यात सक्रिय आहेत. अण्णा आपटे यांच्या संघर्षातून साकारलेल्या विधायक जीवनाला शतशः नमन. अण्णांचे २१ मार्च २००५ रोजी मेंदूतील रक्तस्रावाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७८ वर्षे होते. त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक