डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला मानवंदना देण्यासाठी दि. ६ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही करोडोंच्या संख्येने समाजबांधवांचा भीमसागर लोटला होता. शासन, प्रशासन आणि सेवाभावी संस्था या बांधवांना चैत्यभूमीवर सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दि. ३ ते ६ डिसेंबरदरम्यान विशेषत्वाने कार्यरत असतात. त्यानिमित्ताने यापैकी काही संस्थांच्या कार्याचा घेतलेला हा संक्षिप्त मागोवा...
‘अधिष्ठान’ सामाजिक संस्था
’अधिष्ठान’ सामाजिक संस्था समाजाच्या उत्थानासाठी कार्यरत असून, २००७ सालापासून ‘अधिष्ठान’ सामाजिक संस्था चैत्यभूमीवर येणार्या बांधवांना विनाशुल्क अल्पोपाहाराचे वितरण करते. यावर्षीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनी दि. ५ आणि ६ डिसेंबर रोजी संस्थेने हजारो बांधवांना अल्पोपाहाराचे वितरण केले. यावर्षी या वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सुरेश हावरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. अनार्य पवार, सरचिटणीस बाबूराव बुद्रुक, चिटणीस नितीन वाघमारे, ‘विवेक विचार मंच’चे जयवंत तांबे, धनंजय वायगणकर, जयश्री ओव्हाळ, स्नेहा भालेराव, योजना ठोकळे, अॅड. संदीप जाधव, ‘जयभीम आर्मी’चे अध्यक्ष नितीनभाऊ उपस्थित होते. यावेळी या सगळ्यांनी उपस्थित समुदायाला प्रबोधनपर मार्गदर्शन केले.
‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’
‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ तथा ‘विद्यार्थी निधी’ संचालित ‘अनिकेत ओव्हाळ स्मृती समिती’ गेल्या पाच वर्षांपासून महापरिनिर्वाण दिनानिमित्त आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर व ‘बूक बँक’च्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना व नागरिकांसाठी मदतकार्य करत आहे. महापरिनिर्माण दिनानिमित्ताने ‘अनिकेत ओव्हाळ स्मृती समिती’ व ‘जिज्ञासा’, ‘मेडिविजन’ तथा ‘विकासार्थ विद्यार्थी’ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर येथे भारताच्या कानाकोपर्यातून येणार्या अनुयायींसाठी दि. ५ व ६ डिसेंबर रोजी भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. संपदा संत (अधिष्ठिता, रा. आ. पोदार वैद्यकीय महाविद्यालय), देवदत्त जोशी (अभाविप, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री), डॉ. कैलास सोनमनकर (अभाविप कोकण प्रांत उपाध्यक्ष), जयश्री ओव्हाळ (उपाध्यक्ष, अनिकेत ओव्हाळ स्मृती समिती), डॉ. मिलिंद निकुंभ, डॉ. रमेश जाधव, नीरज चौधरकर, अमित पटले, डॉ. प्रदीप जोशी, डॉ विजय गिरी, अवधूत देशपांडे, तसेच या शिबिरासाठी रा. आ. पोदार वैद्यकीय महाविद्यालय (आयु), टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालय येथील डॉटर, विद्यार्थी व जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी १५ डॉटर्स, तसेच ७८ विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी १ हजार ४७८ समाजबांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

‘समता परिषद, मुंबई’
चैत्यभूमी, दादर चौपाटी येथे देशविदेशातून लाखो अनुयायी व बौद्ध भिखू प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येतात. ‘समता परिषद, मुंबई’चे अध्यक्ष व माजी मंत्री विजय (भाई) गिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ४१ वर्षे अनुयायांना व बौद्ध भिखूंना पोळी-भाजी, पुलाव भात, चहा-बिस्किटे अशा विविध अन्नसेवा सातत्याने पुरवली जाते. यंदाही ‘समता परिषद, मुंबई’तर्फे महामानव ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या ‘महापरिनिर्वाण दिना’निमित्त सेवा प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते. दि. ४ डिसेंबर सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्याने येथे या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. या सेवा प्रकल्पाचे उद्घाटन मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम, मंत्री आ. अॅड. आशिष शेलार, आ. प्रविण दरेकर, रा. स्व. संघ मुंबई कार्यवाह विलास भागवत, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार, भाजप प्रवक्ते नवनाथ बन, भाजप महामंत्री राजेश शिरवाडकर, दै. ‘सम्राट’चे संपादक कुणाल कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ‘समता परिषद, मुंबई’चे कार्याध्यक्ष अशोक कांबळे, शरद कांबळे, मयूर देवळेकर, योजना ठोकळे, समिता कांबळे, ज्योती श्रेष्ठी, जयश्री खरात, रवींद्र लाखन, विजयभाऊ पवार, गुलाब कांबळे, उदय पडेलकर, संजय अढंगळे, सुभाष कांबळे, संजय साळवे, विनोद कांबळे, सिद्धार्थ सकपाळ, सुभाष धोत्रे, दिनकर पवार , प्राध्यापक पवार आणि ‘समता परिषद, मुंबई’च्या शेकडो महिला या स्टॉलवर समाजबांधवांसाठी अविरत सेवा देत असतात.

‘सधम्म’ सामाजिक संस्था
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच’तर्फे नवी मुंबई शहरात ‘सधम्म’ सामाजिक संस्था गेली दहा वर्षे सामाजिक व विधायक कार्य करत आहे. समाजातील शिक्षण, जागृती आणि समताभिमुख विचारांचा प्रसार करणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश. संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्रिसूत्रीचा, ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या विचारांचा सातत्याने प्रचार व प्रसार केला जात आहे. शिक्षण हा विषय केंद्रस्थानी ठेवून समाजघटकांमध्ये जागृती निर्माण करणे हे विचारमंचाचे मुख्य ध्येय आहे. संस्थेला डॉ. सुरेश हावरे, रा. स्व. संघाचे कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे, तसेच ‘नवी मुंबई बुद्धविहार भिक्षु संघ’ यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वितरित करण्याचा सेवा प्रकल्प राबविला जातो. संस्थेचे अध्यक्ष सुभाष कांबळे, चिटणीस विश्वास सोनवणे, तसेच सहकारी संजय जाधव, सुरेश गायकवाड आणि इतर सर्व सहकार्यांच्या मदतीने संस्था चैत्यभूमीवर महामानवास आदरांजली देण्यासाठी ज्ञानोपयोगी उपक्रम राबवते.
इंडियन कॉन्स्टिट्यूशन फेस्टिव्हल (ICF)
भारतीय संविधानाच्या ७५ वर्षांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने तरुणांमध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव प्रबळ करण्यासाठी ‘इंडियन कॉन्स्टिट्यूशन फेस्टिव्हल’ (ICF) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यावर्षी ‘इंडियन कॉन्स्टिट्यूशन फेस्टिव्हल’ने दि. ५ आणि ६ डिसेंबर रोजी ‘चैत्यभूमी’वर ‘माहिती स्टॉल’ उभारला होता. संविधान अध्ययन, नागरिक मूल्ये, युवक सक्षमीकरण आणि लोकशाही जागरूकता या विषयांवर केलेली मांडणी तरुणांना विशेष आकर्षित करत होती. अनेक युवकांनी स्टॉलला भेट देऊन भारताच्या संविधानाबद्दल माहिती घेतली, उपक्रमांविषयी रस दाखवला आणि पुढील कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’चे प्रा. नरेंद्र काकडे व त्यांचे सहकारी, ‘सामाजिक समस्या मंचा’चे संयोजक नागेश धोंडगे व सहकारी, ‘विवेक विचार मंचा’चे संयोजक जयवंत तांबे व सहकारी, शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख, समस्त ककैया समाजाचे सेक्रेटरी सूर्यकांत इंगळे या सर्व मान्यवरांनी स्टॉलला भेट दिली.