बालकांचे चारित्र्य घडवणे ही कोणत्याही देशाच्या भविष्यामध्ये केलेली एक गुंतवणूक ठरते. ज्या देशाची तरुण पिढी राष्ट्राभिमानी असते, त्या देशाचे भविष्य आपसूकच उज्ज्वल ठरते, यात शंका नाही. त्यासाठी नव्या पिढीला राष्ट्राभिमानाचे बाळकडू पाजणे अनिवार्य ठरते. यासाठी देशाचे वैभव, परंपरा, महान व्यक्तिमत्वे यांची ओळख बालपणी झाल्यास, विचारांची पकड घट्ट होते. अनेक माध्यमातून हे करता येणे शक्य आहे, बालनाट्य त्यापैकीच एक! राष्ट्रनिर्मितीच्या या अव्याहत चालणार्या यज्ञात बालनाट्य काय आणि किती परिणामकारक भूमिका निभावू शकते, याचा घेतलेला आढावा...
मागच्या रविवारी आम्ही बालकलाकारांना घेऊन ’थिएटर एक्स’ नावाने एक कार्यक्रम केला. नावावरून नेमकं काय असेल याची, ‘जेन-झी‘ आणि त्यांच्या पालकांना उत्सुकता होतीच. बालकलाकारांनी त्यांच्यातला ‘द‘ फॅटर, म्हणजेच वेगळेपण शोधणं आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं असा या कार्यक्रमाचा हेतू होता. आता चिमुकल्यांनी त्यांच्यातलं वेगळेपण ओळखण्यासाठी, त्यांना ‘स्व‘ची ओळख होणं गरजेचं. त्याकरिता नाटक हे एक प्रभावशाली माध्यम आहे; पण ही प्रक्रिया अविरत आहे. आपण स्वतःला आजही शोधत असतो; पण त्याची सुरुवात जर बालपणी झाली, तर ती पुढील आयुष्यासाठी महत्त्वाची ठरते. वयोगट पाच ते १५ मधील मुलांना, त्यांचीच त्यांच्याशी ओळख करून देण्याची प्रक्रिया कठीण, जिकरीचं काम.
त्यासाठी मी ‘स्वगतां’चा आधार घ्यायचं ठरवलं. जी थोर, उदात्त, उत्तुंग व्यक्तिमत्त्वं होऊन गेली, त्यांना रंगमंचावर आपल्या हालचाली, वेशभूषा, आवाज आणि शब्दांचा आधार घेऊन प्रस्तुत करायचं असं ठरलं. व्यक्तिमत्त्व रेखाटताना आपसूकच त्यांचे विचार, त्यांचं जीवन समजून घेणं आलं आणि त्यातूनच त्यांचा स्वतःशी तुलनात्मक भाव उत्पन्न झाला. मी कसा आहे पासून, ते कसे आहेत, साम्य आणि वेगळेपण ओळखणं, हा या नाट्यप्रक्रियेच्या मागचा विचार यामागे होता. मग, त्यासाठी व्यक्तिमत्त्व शोधून काढणं आणि ते मुलांना शोभतील असे असावेत, तसंच व्यक्तिमत्त्व ‘योगस्थ कुरु कर्माणि’ असावं. नाही ना कळलं! म्हणूनच नाट्य प्रस्तुतिचं नावसुद्धा हे ठेवलं नाही.
’थिएटर एक्स’ असं ठेवल्यावर ते निदान समजेल, असं उगाच वाटतं. भाषेचा वर्ख जरी इंग्रजी असला, तरी मिठाई ही शुद्ध मलाई, साजूक तुपातली लागते. त्यामुळे आपल्या मातीमधलेच महात्मे घेण्याचे मी ठरवलं. त्यासाठी मी आधार घेतला ‘भारत भारती’चा. नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून मी ही पुस्तकं घेतली होती, कधीतरी कामी येतील या विचाराने. जसं की प्रभू श्रीराम, संत तुकाराम, महाकवी कालिदास, तुलसीदास, डॉ. हेडगेवार, अभिमन्यू, लोकमान्य टिळक, ध्रुवबाळ, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, मादाम कामा, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, श्रीकृष्ण, झाशीची राणी इत्यादि. पुढे ३५ मुलांना प्रत्येकी तीन मिनिटं दिली सादरीकरणासाठी. अनेक मुलांना इतिहासातली ही माणसे माहितीच नव्हती; पण ती त्यांनी जाणून घेतली. पालकांनी यात पुढाकार घेतला आणि त्यांचा अभ्यास केला आणि मुलांकडून पाठही करून घेतलं. मुलं गोड दिसत तर होतीच; पण त्यांच्या विचारांमध्ये प्रगल्भता येते आहे, हे सुद्धा जाणवत होतं.
‘योगस्थ कुरु कर्माणि’ म्हणजे नेमकं काय?
यश-अपयशाची चिंता याचा विचार न करता, अनासक्त होऊन काम करत राहणं. आपलं कर्तव्य निष्ठेने करणं, यालाच योग म्हटलं आहे.
‘मेरा या और मुझे या’च्या जगात, एवढा मोठा विचार मुलांना शिकवला जाऊ शकतो! तर, शिकवला जाऊ शकतो सोप्पा करून. नाटकाच्या माध्यमातून ते शय होताना मी पाहिलं आहे. यानिमित्ताने थोर माणसं या मुलांना भेटली आणि त्यांच्याशी बोलू लागली. नाटकाने शिक्षण देण्याचं आणि प्रसारमाध्यम होऊन मुलांमध्ये विचारांचं बीजारोपण करण्याचं कामही केलं. ‘नाटक’ एक समृद्ध कला आहे आणि ‘बालनाट्य’ एक सशक्त प्रक्रिया आहे.
मी जेव्हा बालनाट्य शिकवायचं ठरवलं, तेव्हा माझ्या मनात तीन शब्द आले - अॅक्ट, क्रिएट परफॉर्म ; पण जेव्हा सातत्याने मी हे करत होते आणि मुलांकडून करून घेत होते, तेव्हा मला लक्षात आलं की, ‘बालनाट्य’ हे या तीन शब्दांच्याही पलीकडलं आहे. ते फक्त मुलांना फक्त कृती, कल्पकता आणि सादरीकरण शिकवत नाही, तर यातून तयार होतात अॅक्टर, कॅरॅक्टर आणि पर्सनालिटी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवतांच्या भाषणात त्यांना ऐकलं. संघाचं धोरण ‘व्यक्तिनिर्माण से राष्ट्रनिर्माण तक’ आहे आणि आम्ही, म्हणजे मी आणि माझ्याही आधी माझे गुरू, माझे वडील संजय पेंडसे गेले ४५ वर्षे ‘बालनाट्य चळवळ’ चालवता-चालवता, कलानिर्मिती ते भूमिकानिर्मितीचं काम करत आलो आहोत.
बालनाट्य म्हणजे तरी काय हो! मानसशास्त्रात सांगितलेल्या तीन शब्दांशी निगडित आहे. मनात आलेले विचार, त्यातून उत्पन्न झालेले भाव आणि त्यातून तयार झालेली कृती म्हणजे नाट्य असंही म्हणता येईल. पण विचार काय येता आहेत किंवा एक नाट्य प्रशिक्षक म्हणून कोणता विचार देतो आहोत, यावर ते अवलंबून आहे. माझ्या वडिलांनी नाटकाची उपलब्धी देव, देश आणि धर्माला पोषक ठरेल अशीच कायम ठेवली. यात अनेक अडथळे आले पण हटलो नाही, पुढे जात राहिलो याचं आम्हाला समाधान आहे.
बालनाट्य म्हणजे निखळ मनोरंजन आहेच आणि ते सातत्याने करत आलो; पण कधीतरी नाटकातून शिक्षण मिळावे म्हणूनही काम केलं. नाटक आंतरविद्याशाखेय माध्यम आहे. यात कला आणि विज्ञानाचा मिलापही आहे; पण काही विषयांना आजही मागे खेचलं जातं. निदान त्याबाबत भय आणि उदासीनता दिसून येते. ‘सियावर रामचंद्र की जय’ हे बाल महानाट्य एक मेरूबिंदू कलाकृती. त्याचे प्रयोग लावण्यासाठी आम्ही एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीकडे गेलो. आमचा प्रयोग घ्या म्हणून आम्ही त्यांना सांगितले. पण त्यांनी नाही घेतला, का? कारण रामाचा विषय म्हणजे धार्मिक; पण त्याच कंपनीत त्यांच्या एका शाखेत ‘प्रेयररूम’ आहे. काय विरोधाभास आहे बघा, असो. सध्या ‘राजे शिवबा’ हे बाल महानाट्य घेतलं आहे बसवायला. त्यात काही महत्त्वाच्या व्यक्तींना अगदी जुजबी भूमिकेत दाखवलं आहे. का? कारण वाद होईल, त्यातून उगाच संघर्ष निर्माण होईल. तेढ निर्माण होईल अशी कोणतीही कृती टाळणेच शहाणपणाचं ठरेल.
नाटक ही सांघिक कला आहे. कोणाच्याही मनाला ठेच पोहोचवणं, हे नाटकाचे काम नाही. ते विचारांच्या शक्तीने चालतं. संवादातून हृदयापर्यंत पोहोचणं हेच नाटकाचे काम. भिन्नभिन्न जाती, धर्म आणि परंपरा असलेल्या लोकांना एका छत्राखाली आणून त्याचं मनोरंजन करणं, हे त्याचं मुख्य काम.
डाव्या विचासरणीच्या लोकांची मनोरंजन, शिक्षण आणि प्रसारमाध्यम क्षेत्रावर अनेक वर्षे पकड होती. ती आता सैल होताना दिसते आहे. पाश्चात्त्य संस्कृती आणि पुरोगामी विचारसरणीचा पगडा प्रत्येकाच्या मनावर आहे, यातून लहान मुलंही सुटलेली नाहीत. मी तर हा आपल्या संस्कृतीवर केलेला आघातच म्हणेन. आमच्या ’थिएटर एक्स’ चं प्रयोजन आपल्या मातीमधल्या ‘योगस्थ कुरु कर्माणि’ अशा व्यक्तींची प्रकृती, परिस्थिती, प्रवृत्ती, त्यांचे परिश्रम याच्याशी ओळख करून देतं. मुलं किमान काही दिवस तरी, त्यांच्या उशाशी या व्यक्तींच्या विचारांना घेऊन झोपले असतील. त्याचा परिणाम आपल्याला भविष्यात नक्की दिसेल. आज जेवढी एका अभिनेत्याची गरज समाजाला आहे, तितकीच गरज किंबहुना मी तर म्हणेन, त्याहीपेक्षा जास्त गरज नेत्यांची आहे. या कामात बालरंगभूमी मैलाचा दगड ठरेल.
- रानी राधिका देशपांडे