दुबईमधील 'तेजस'चा -अपघात : विस्तृत विश्लेषण

    07-Dec-2025
Total Views |
Tejas at Dubai Air Show
 
स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ विमानाचा दुबई येथील ‘एअर शो’मध्ये झालेल्या अपघातामुळे सर्व भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला. ‘तेजस’ हे विमान भारताच्या प्रदीर्घ तपस्येचे फळ आहे. मात्र, या अपघाताच्या पार्श्वभूमीवर भारताच्या तपस्येवरच संशय घेण्याचा एककलमी कार्यक्रम पाकिस्तान आणि चीनपुरस्कृत काही समाजमाध्यमांनी उचलला. हा अपघात का झाला? त्याने ‘तेजस’चे नुकसान काय? माहितीयुद्धाचा यात झालेला वापर, भारतीयांनी घ्यायची काळजी अशा विविध पैलूंतून या दुर्दैवी घटनेचा घेतलेला आढावा....
 
‘तेजस’ हे अजूनही त्या लढाऊ श्रेणीतील एक सुरक्षित लढाऊ विमान आहे, हे सर्वप्रथम लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. ‘दुबई एअर-शो’मध्ये झालेल्या अपघातामुळे, ‘तेजस‘च्या सुरक्षितेविषयी अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. जगभरातली अनेक ‘एअर-शो’ प्रदर्शने धोकादायक असतात, कारण तिथे जास्तीतजास्त चपळाई आणि कौशल्य दाखवावे लागते. या अपघातात, ‘निगेटिव्ह-जी’ युद्धाभ्यास, खूप कमी उंचीवर केल्यामुळे पायलटला सावरण्यापुरती उंची मिळाली नाही. अशा कसरतींमध्ये काही क्षणांतच निर्णायक घडतं. यावेळीही तसेच काहीसे घडले. विमान अत्यंत वेगाने खाली आल्याने, वैमानिकाला इजेशनला पुरेसा वेळच मिळाला नाही. हा अपघात सिस्टम किंवा डिझाईनच्या दोषामुळे झालेला नाही .
 
भारतीय आकाशातील ‘तेजस’ हे एक राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे. ‘भारतीय वायूदला’ने विकसित केलेल्या या हलया लढाऊ विमानाने, जागतिक पातळीवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. २०२५च्या ‘दुबई एअर-शो’मध्ये ‘तेजस’चा अपघात घडल्यानंतर विविध चर्चा, आरोप-प्रत्यारोप आणि रणनीतिक विचारांचा महापूर उसळला. त्यामुळे या घटनेच्या मागील वास्तव समजून घेणं आवश्यक आहे.
 
‘तेजस’चा सुरक्षा रेकॉर्ड
 
‘तेजस’ हे त्याच्या श्रेणीतील सर्वात सुरक्षित विमान मानलं जातं. २१व्या शतकातील लढाऊ विमानाच्या मानकांना पूर्ण करत, या विमानाने दोन दशकांत हजारो सुरक्षायुक्त उड्डाणे केली आहेत. त्याचा अपघाताचा दर अत्यंत कमी आहे. दुबईतील अपघात हे या दीर्घ आणि सुरक्षित प्रवासातील एक अपवाद म्हणता येईल.
 
‘एअर-शो डेमोन्स्ट्रेशन’चे स्वरूप आणि धोके - एअर-शो हे नेहमीच आकर्षक असतात; पण तेच जितके मोहक, तितकेच धोकादायकही असतात. प्रदर्शनातील लढाऊ विमान ’डिस्प्ले’ करताना, त्यांच्या चपळाईचे प्रदर्शन केले जाते. यात विमान व पायलटवर प्रचंड ताण येतो. ‘निगेटिव्ह-जी’ युद्धाभ्यास अत्यंत कमी उंचीवर करण्याचा प्रयत्न दुबईत झाला. अशा कसरतीमध्ये, अत्यल्प क्षणांमध्येच अपघाताची शयता वाढते आणि जागतिक दर्जाच्या पायलटलाही सावरण्याची संधी मर्यादित असते.
 
अपघाताची वस्तुस्थिती
 
दुबईमधील अपघात एका ‘निगेटिव्ह-जी’वरेल कसरती दरम्यान झाला. भौतिकशास्त्राची कडवी मर्यादा, कमी उंची, वेग वाढलेला आणि सावरण्याची जागा कमी मिळाल्याने, इजेशनच्या प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच विमान जमिनीवर आदळलं. हे डिझाईन, सिस्टम किंवा स्ट्रचरल फेल्युअरमुळे घडलं नव्हतं. हा एअर-शो डेमोन्स्ट्रेशनचा धोका होता, जो यावेळी दुर्दैवाने जिंकला.
 
घटनेनंतरचे राजकारण आणि प्रचार
 
या प्रकरणामधील धूर निवळण्यापूर्वीच, पाकिस्तान आणि चीनच्या समाजमाध्यमांवरच्या तथाकथित संरक्षणतज्ज्ञांनी, लगेचच नेहमीसारखी प्रतिक्रिया देऊन, अपघात चर्चेचा मुद्दा बनवला. यामध्ये जुनेच आरोप नव्याने करण्यात आले. यामध्ये भारताची विमाने सुरक्षित नाहीत, भारतीय पायलट अपुरे प्रशिक्षित आहेत आणि भारताच्या लढाऊ विमानांवर विश्वास ठेवता येत नाही, असे वातावरण निर्माण करण्यात आले. पूर्वीही ‘राफेल’ विमानांबद्दल खोटे दावे पसरवले आणि चिनी विमानांची सगळीकडेच प्रशंसा करण्यात आली होती, तसेच काहीसे.
 
मुळात याच चिनी प्लॅटफॉर्म्सनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये अपयश अनुभवले आहे, जिथे त्यावेळी त्यांची कामगिरी अपेक्षित प्रमाणात झाली नव्हती. ‘तेजस’च्या अपघातावरच चर्चा करताना, त्या लोकांनी आनंदाने भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने, समाजमाध्यमांवरच्या अशा भ्रामक प्रचाराला बरेच लोक बळी पडतात. त्यांना वाटतं आजच्या काळात एअर-शोमध्ये अपघात हा फारच क्वचित होतो; पण ते बरोबर नाही. असे अपघात खूपच जास्त वेळा घडतात.
 
चीन जो आज जगाला निनावी समाज माध्यम खात्यांमधून आणि सरकारी माध्यमांतून विमानांचे धडे देतो, त्यानेदेखील आपली काही जेट विमाने सार्वजनिक प्रदर्शनात गमावली आहेत. २०११ मध्ये त्यांच्या ‘शान्शी-शो’मध्ये एक, ‘जेएच-७ फ्लाईंग लेपर्ड’ कोसळले होते. २०१६ मध्ये त्यांच्या ‘बा यी एरोबॅटिस टीम’च्या, ‘जे-१० एस’ विमानाचाही सरावात अपघात झाला होता.
 
‘तेजस’चा अपघात होताच, चीन आणि पाकिस्तानच्या समाजमाध्यमांवर, भारतीय विमानांच्या गुणवत्तेबद्दल कुजबुज सुरू झाली. अशा अपघातांच्या आधारे, भारतीय लढाऊ विमाने असुरक्षित असल्याचा आणि वैमानिक अपुरे प्रशिक्षित असल्याचा प्रचार झाला. हे पूर्वी ‘राफेल’च्या बाबतीतही झाले होते.
 
जगभरातील चिनी विमाने अपघात, तांत्रिक समस्या आणि विश्वासार्हतेच्या त्रुटी यांना सतत सामोरे जात आहेत. त्यांच्या ‘जेएफ-१७’ विमानातही वारंवार अपघात झाले आहेत आणि इतर चिनी विमानांही सातत्याने तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे.
 
जागतिक घटनांची तुलना
 
जगभरात एअर-शो प्रदर्शनांदरम्यान अपघात होत राहतात. अमेरिकेचे ‘ब्लू एंजल्स’ आणि ‘थंडरबर्ड्स’ जे जागतिक दर्जाचे मानले जातात, त्यांनीही अपघाती परिस्थितीचा सामना केला आहे.
 
अमेरिकेल विमान उडवण्यासाठी, जगात सर्वाधिक सुरक्षित देश मानलं जातं. पण, तिथेसुद्धा मोठ्या एअर-शोमध्ये अपघात झाले आहेत. ‘ब्लू एंजल्स’ आणि ‘थंडरबर्ड्स’ या जगप्रसिद्ध एरोबॅटिस टीम्सचीही विमाने, ‘हाय-जी’ युद्धाभ्यासामध्ये (म्हणजे जोरदार वळणे किंवा जोराचा भार असताना) कोसळली आहेत. अशावेळी वैमानिकावर खूप ताण येतो. २००३ साली एका ‘थंडरबर्ड’ वैमानिकाचा ‘एफ-१६’ अपघात झाला. मात्र, जेट जमिनीवर आदळायच्या एका क्षणापूर्वी पायलटला बाहेर फेकण्यात यश आलं होतं.
 
खरं पाहिलं तर, जगभरातल्या प्रगत पातळीवरच्या एअर-शो संघटनाही आणि कितीही सुरक्षित आणि विश्वासू विमाने असली तरी, प्रत्येक वेळेस अशा प्रदर्शनात मोठा धोका असतो. अगदी अनुभवी वैमानिक आणि कसून तपासलेलं विमान असलं तरीही हा धोका असतोच. कारण प्रदर्शनात खूप उंच कोनावरून, वेगात किंवा अतिशय कठीण आणि धाडसी युद्धाभ्यास सादर करावा लागतो आणि तिथेच धोका वाढतो.
 
‘तेजस’च्या निर्यातक्षमतेवर परिणाम
 
अपघातामुळे काही देश तात्पुरते थांबू शकतात, चौकशीच्या अहवालाची वाट पाहू शकतात किंवा नवा निर्णय घेण्यामध्ये साशंक राहू शकतात. पण, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ‘तेजस’ने दीर्घकाळ विश्वासार्ह आणि सुरक्षित सेवा दिली आहे. विमानाचे डिझाईन आधुनिक आहे, अपग्रेड शय आहेत आणि किंमतही परवडणारी आहे. सुरक्षा रेकॉर्ड स्वच्छ असल्याने, खर्‍या माहितीच्या आधारे निर्णय घेणं महत्त्वाचं आहे.
 
भारतीय वायुसेनेवरचा मानसिक परिणाम
 
भारताच्या सर्वोच्च मानकांपर्यंत प्रशिक्षित वैमानिकाने, सार्वजनिक मंचावर आपले जीवन गमावले आहे. वैमानिक, स्क्वाड्रन, अभियंते आणि ‘तेजस’च्या कुटुंबासाठी हा चटका लावणारा क्षण आहे; पण ही घटना भारतीय ‘एरोस्पेस’ क्षेत्राच्या उत्क्रांतीला रोखू शकत नाही.
 
पुढील दिशा
 
जास्तीतजास्त काळ चौकशी करा, नियम कठोर पाळा, प्रशिक्षण प्रोफाईल आणि सुरक्षा बफर सुधारित करा; पण विमानाचे नियमित संचालन चालू ठेवा. एअर-शोमधील अपघात ही जगासमोरील स्थायी अनिश्चितता आहे. एका अपघाताने, या दशकांतील भारतीय प्रयत्नांना गालबोट लागू नये. ‘तेजस’ हे भारताच्या हवाईमार्गातील, एक शौर्य आणि प्रगतीचे प्रतीक आहे. अपघाताचं विश्लेषण करताना, फक्त प्रचार आणि भावनांना बळी पडू नका. शास्त्रीय आणि ऐतिहासिक वास्तव लक्षात घेऊन,या लढाऊ विमानावरील विश्वास कायम ठेवावा. अपघात हे केव्हाही दुर्दैवीच; पण काहीतरी शिकवणारे आहेत. त्यामुळे आधुनिक पिढीच्या भविष्यातल्या सुरक्षेसाठी आणि ‘तेजस’च्या भूमिका अधिक सशक्त करण्यासाठी ठोस पावलं उचलण्यात यावीत.
‘तेजस’ने आतापर्यंत हजारो वेळा उड्डाण केलं आहे आणि केवळ दोन अपघात झाले आहेत, त्यांपैकी एक हा दुबईमधला. त्यामुळे तेजसचा सुरक्षा रेकॉर्ड अजून स्वच्छच आहे. वैमानिकांचे प्रशिक्षण, विमानावरील विश्वास, आणि सलग काम या सगळ्यामुळे ‘तेजस’वर विश्वास ठेवणं योग्य आहे. लढाऊ विमानांमध्येही जर अजून काही त्रुटी असतील, तर त्या चौकशीतून सुधाराव्यात आणि विमाने उड्डाण करतच राहावीत, भारताने मागे हटू नये.
 
‘एअर-शो’चे धोके असतातच आणि त्यात कधीकधी यंत्राच्या मर्यादा, वैमानिकाच्या क्षमतेपेक्षा पुढे जातात हे मान्य केलंच पाहिजे. पण एखाद्या एकट्या अपघातामुळे आपल्या दीर्घ प्रयत्नांना गालबोट लागू देऊ नये. लढाऊ विमाने तयार करणे हे अत्यंत आव्हानात्मक कार्य असून, यात वेळ हा लागतोच. पण, आत्मनिर्भर बनण्यासाठी आपले प्रयत्न अखंडपणे सुरू ठेवले पाहिजेत. अडचणी नक्की येतील मात्र, त्यावर मात करण्याचा दृढसंकल्प असला पाहिजे.
- (नि.) ब्रि. हेमंत महाजन