सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रात स्वयंसेवकांचे निःस्वार्थी योगदान

Total Views |
 
Prabuddhajan Sangoshti
 
मुंबई : ( Prabuddhajan Sangoshti ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात 'प्रबुद्धजन संगोष्टी' कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जम्मू शहरातील कॅनॉल रोडवरील कन्व्हेन्शन हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे म्हणाले की, संघाचे मुख्य ध्येय नेहमीच एक मजबूत, आत्मविश्वासू, सांस्कृतिकदृष्ट्या जागरूक आणि एकसंध भारत निर्माण करणे हे राहिले आहे. स्वयंसेवकांनी सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये अनेकदा शांतपणे आणि निःस्वार्थपणे योगदान दिले आहे.
 
ते म्हणाले की, गेल्या शंभर वर्षांपासून संघाने दैनंदिन शाखा, सेवा उपक्रम, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. संघाचे शताब्दी वर्ष हा संघाचा शेवटचा थांबा नाही, तर एका दीर्घ प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतर समाज आणि राष्ट्रासाठी अधिक समर्पणाने पुढे जाण्याची गरज आहे. पर्यावरण संरक्षण, कुटुंब संस्था आणि समाजाने भारतीय मूल्ये मजबूत केली पाहीजेत आणि प्रत्येक नागरिकाचे राष्ट्र उभारणीत सक्रिय योगदान हवे, असे ते म्हणाले.
 
या कार्यक्रमात निवृत्त मुख्य न्यायाधीश ताशी राबस्तान प्रमुख पाहुणे म्हणून होते. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समाजातील रचनात्मक भूमिकेवर प्रकाश टाकला. यावेळी प्रांत संघचालक डॉ. गौतम मैंगी आणि विभाग संघचालक सुरिंदर मोहन हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच समाजातील बुद्धिजीवी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, विविध व्यवसायातील लोक आणि समाजाच्या विविध घटकांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.