
चित्रपटाच्या ट्रेलरवरूनच लक्षात येते की, हा चित्रपट हेरगिरीविषयी आहे आणि हे मिशन आहे, ‘मिशन धुरंधर.’ पाकिस्तानमधील निरनिराळ्या ठिकाणी हे मिशन राबविण्यात आले होते. ‘धुरंधर’ची कथा दि. ३० डिसेंबर १९९९ पासून पुढे सुरू होते, म्हणजे कंदहारला एअर इंडियाचे विमान ‘हायजॅक’ करण्यात आले होते, तेव्हाचा प्रसंग आणि ओलिसांना सोडविण्याच्या एक दिवस आधी; जेव्हा भारताने मसूद अझहर, ओमर शेख आणि मुश्ताक अहमद झर्गर या तीन दहशतवाद्यांची सुटका करण्याची अट मान्य केली होती. चित्रपटात गुप्तचर विभागातील अधिकारी अजय सन्याल (अभिनेता आर. माधवन) पहिल्या काही मिनिटांतच आपल्याला दिसतात. दहशतवाद्यांच्या सुटकेला ते ठाम विरोध करतात; परंतु प्रशासनाचा निर्णय आणि अडथळ्यांपुढे ते काहीही करू शकत नाहीत; पण पुढे परिस्थिती गंभीर बनल्यानंतर परराष्ट्र मंत्री - ज्यांचे व्यक्तिमत्त्व जसवंत सिंग यांच्याशी साधर्म्य राखते; पण चित्रपटात त्यांचे नाव देवव्रत कपूर असे दाखवण्यात आले आहे. पुढे अजय सन्याल यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाते आणि दोघेही एका गुप्त मोहिमेचा प्रारंभ करतात आणि हेच ते ‘मिशन धुरंधर!’
या मिशनअंतर्गत अशा ‘धुरंधर शस्त्राला’ म्हणजेच, हेराला पाकिस्तानच्या कराची शहरातील लियारी या गँगलॅण्डमध्ये उतरवण्यात येते. भारताहून अफगाणिस्तान आणि बलुचिस्तानमार्गे पाकिस्तानातल्या कराचीत हा भारतीय हेर पोहोचतो आणि त्याचे नामकरण होते ‘हमजा अली मझारी.’ ज्याचे मूळ नाव असते ‘जसकीरत सिंग रंगील’. उंच, गोरा आणि धिप्पाड जसकीरत हा अगदी अफगाणी पठाणांप्रमाणे शरीरयष्टी असलेला. सुरुवातीचे वर्षभर फक्त पाकिस्तानात आपला जम बसवण्यासाठी तो खर्च करतो; पण या ‘शस्त्रा’ला लियारीतच का पाठवण्यात येते? तर त्याचे कारण असे की, लियारीवर राज्य करणारा कराचीवर सत्ता गाजवतो आणि कराचीवर राज्य करणारा संपूर्ण पाकिस्तानवर! इथूनच सगळ्या गुंडांचे अड्डे आणि त्यांना पोसणार्या राजकारण्यांचे कारनामे चालतात. हमजा तिथल्या मातीशी स्वतःला अगदी एकरूप करून घेतो. पाकिस्तानातील गँग, राजकारणी आणि ‘आयएसआय’ कसे एकमेकांशी हातमिळवणी करून भारताविरूद्ध दहशतवादाचे जाळे उभे करतात, याचे विस्तृत चित्रण या चित्रपटात पाहायला मिळते. तसेच, पाकिस्तानातील स्थानिक पंजाबी किंवा उर्दू भाषी लोक आणि बलुच समुदाय यांच्यातील तणावालाही चित्रपटात स्पर्श करण्यात आला आहे. गुंड, राजकारणी आणि ‘आयएसआय’च्या संगनमताने भारताविरोधी कारवाया, तसेच भारतीय गुप्तचर यंत्रणांनी त्यांचे उधळलेले मनसुबे, याचा थरार पुढे चित्रपटात उलगडत जातो.
चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन आदित्य धार यांनी केले आहे. ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटानंतर सुमारे सहा वर्षांनी आदित्य यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक म्हणून पुनरागमन केले. आदित्य यांच्या संशोधनाची व्याप्ती, विषयाची सखोल तयारी आणि एकूणच संवेदनशीलता ‘धुरंधर’मध्ये ठळकपणे दिसून येते. चित्रपटात अनेक पात्रे असली, तरी प्रत्येक पात्राला अगदी बारकाईने दाखवण्यात आले आहे. याशिवाय, पाकिस्तानमध्ये बनावट भारतीय नोटा छापण्याचा मुद्दा त्यांनी प्रभावीपणे मांडला आहे. मुंबई हल्ल्यांचे पाकिस्तानमध्ये केलेले सेलिब्रेशन आणि सगळ्या घटनांचा तंतोतंत तपशील चित्रपटात पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी खरे फुटेजेससुद्धा दाखवण्यात आलेली आहेत. तसेच, भारतीय गुप्तचर यंत्रणेने त्याकाळी दहशतवाद्यांचे फोन टॅप करून मिळवलेले रेकॉर्डिंग्स, असा बराच खरा दस्तऐवज चित्रपटात मांडण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटाला अगदी मूर्त स्वरूप प्राप्त होते.
चित्रपटात पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ आणि स्थानिक गुंड आणि संघटनांमधील साटेलोटेही खुबीने चित्रीत करण्यात आले आहे. तसेच चित्रपटातील अनेक हिंसात्मक दृश्ये प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणतील. एकूणच चित्रपटाच्या पटकथेचे लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही बाबी आदित्य धर यांनी प्रभावीरीत्या साकारल्या आहेत, असेच म्हणावे लागेल.
चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगसह संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांसारख्या कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळते. याशिवाय, लहान भूमिकांमध्येही बरेच कलाकार चित्रपटामध्ये झळकले आहेत. त्यामुळे कलाकारांची फौज अगदी तगडी जमून आलेली आहे आणि सगळ्यांचीच मेहनत दिसून येते. रणवीर सिंग अनेक दिवसांनंतर मोठ्या पडद्यावर दिसला असून, त्याने नेहमीप्रमाणे संपूर्ण ऊर्जा ओतून संपूर्ण चित्रपटात कमाल केली आहे. त्याची वेशभूषा असेल किंवा संवादफेक, अॅशन सिन्स, सगळीकडेच रणवीर पुन्हा एकदा चमकलेला दिसतो.
‘धुरंधर’च्या संगीताने प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. शाश्वत सचदेव यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आणि इर्शाद कामिल यांच्या लेखणीतून साकारलेला अल्बम समाजमाध्यामंवरही सध्या चांगलाच गाजत आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाचे शीर्षकगीत हे १९९५ मधील लोकप्रिय ‘ना दिल दे परदेसी नू’ या गाण्याचा रिमेक असून, ‘इश्क जलाकर‘ (कारवाँ) हे ‘बरसात की रात’मधील प्रसिद्ध कव्वाली ‘ना तो कारवाँ की तलाश हैं’चे रिमेक सध्या टॉप ट्रेण्डिंगमध्ये आहे. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’च्या भव्य यशानंतर ‘धुरंधर’ हा दिग्दर्शक आदित्य धार यांचा दुसरा दिग्दर्शित केलेला चित्रपट म्हणूनही विशेष चर्चेत आहे. चित्रपटाची लांबी जास्त असली, तरीही तो कुठेच रेंगाळलेला नाही.
चित्रपटाला ’सेन्सॉर बोर्डा’ने ‘ए’ प्रमाणपत्र दिले आहे. कारण, चित्रपटात बरेच हिंसक आणि हादरवणारी दृश्ये आहेत. तसेच हा चित्रपट हुतात्मा सैन्याधिकारी मेजर मोहित शर्मा यांच्या जीवनावर आधारित असल्याच्या चर्चांना देखील आता पूर्णविराम मिळाला आहे. दिग्दर्शक आदित्य धार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत, याविषयी स्पष्टपणे नकार दिला आहे. मेजर शर्मा यांच्या पालकांनी चित्रपटातील कथानकावर आक्षेप घेतल्याने ‘केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळा’(‘सीबीएफसी’)कडून चित्रपटाचे पुनर्परीक्षण करण्यात आले. त्यानंतर निर्माते आणि दिग्दर्शक यांनी चित्रपट कोणाचेही आत्मचरित्र नसल्याचे जाहीर केले. दिल्ली उच्च न्यायालयानेही ‘सीबीएफसी’ला कुटुंब आणि त्यांचे मत विचारात घेण्याचे निर्देश दिले होते. पुनर्परीक्षणानंतर मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी मंडळाने आपला निर्णय जाहीर करत, ‘धुरंधर’ हा पूर्णपणे काल्पनिक चित्रपट असून, त्याचा मेजर शर्मा यांच्या जीवनाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आणि चित्रपटाला प्रदर्शनाची परवानगी दिली.
त्यामुळे राष्ट्रभक्ती, सैन्यशक्ती आणि हेरगिरी यांवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरेल, अशी आशा करायला हरकत नाही.
दिग्दर्शन, लेखन : आदित्य धार
कलाकार : रणवीर सिंग, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, राकेश बेदी
निर्मिती : जिओ स्टुडिओस, बी ६२ स्टुडिओस